युक्रेनमधील एका रशियन हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, युक्रेनचे आणखी एक F-16 लढाऊ विमान कोसळले, ज्यात वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. रशियाच्या या हवाई हल्ल्यात शेकडो ड्रोन, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. रशिया-युक्रेन युद्धाच्या सलग चौथ्या वर्षी रशिया रात्रीच्यावेळी अधिक तीव्रतेने हवाई हल्ले करत आहे.
राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, यांनी वैमानिक मॅक्सिम उस्तिमेन्कोच यांना श्रद्धांजली अर्पण करत, त्यांना मरणोत्तर “हीरो ऑफ युक्रेन” या देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरवले.
झेलेन्स्की यांनी या हल्ल्यानंतर, युक्रेनच्या हवाई संरक्षणासाठी वॉशिंग्टन आणि पाश्चिमात्य सहयोगी देशांकडून अधिक मदतीची मागणी केली. ‘या हल्ल्यात अनेक घरे आणि पायाभूत सुविधा ध्वस्त झाल्या असून, किमान 12 जण जखमी झाले आहेत,’ असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
कीव्हमध्ये त्या रात्री हवाई सायरन वाजल्यानंतर, अनेक कुटुंबांनी जीव वाचवण्यासाठी मेट्रो स्थानकांत आश्रय घेतला. युक्रेनची राजधानी कीव्ह आणि पश्चिमेकडील ल्वीव्ह शहरात, मशीनगनचे आवाज आणि स्फोट ऐकू आले, जिथे अशा प्रकारचे हल्ले तुलनेत कमी प्रमाणात होतात.
ल्वीव्ह प्रांताचे राज्यपालांनी सांगितले की, ‘हल्ल्याचा उद्देश अत्यावश्यक पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे हा होता.’
युक्रेनने गेल्यावर्षीपासूनअमेरिकन बनावटीच्या F-16 विमानांचा वापरणे सुरू केल्यानंतर, आतापर्यंत 3 विमाने गमावली आहेत. कीव्हने आपल्या F-16 ताफ्याचा आवाका उघड केला नसला, तरी ही विमाने युक्रेनच्या संरक्षणात प्रमुख भूमिका बजावत आहेत.
हल्ला झाल्यानंतर, वैमानिकाने प्रभावित F-16 विमान रहिवासी भागापासून दूर नेले, परंतु त्याला स्वत:ला बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू झाले, असे युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले.
“वैमानिकाने आपली सर्व अस्त्रे वापरून रशियाची सात हवाई टार्गेट्स हाणून पाडली. मात्र, शेवटच्या टार्गेटचा नाश करताना, F-16 विमानाला गंभीर नुकसान झाले आणि त्याचे नियंत्रण डगमगू लागले,” असे हवाई दलाने टेलीग्रामद्वारे सांगितले.
युक्रेनचे लष्करी तज्ञ रोमन स्वितान यांनी याआधी सांगितले होते की, F-16 विमाने सर्व लढाईसाठी उपयुक्त नाहीत, विशेषतः ड्रोन हल्ले परतवण्यासाठी, कारण ती जलद गतीच्या लक्ष्यांवर अधिक प्रभावी आहेत.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले की, “2014 मध्ये पूर्व युक्रेनचा काही भाग ताब्यात घेणाऱ्या रशियन-वित्तपुरवठादार फुटीरतावाद्यांविरुद्ध सुरू झालेल्या मोहिमेपासून, मृत वैमानिक उस्तिमेन्कोच ही उड्डाण मोहिमा चालवत होते. त्यांनी चार प्रकारच्या विमान उड्डाणांमध्ये प्रभुत्व मिळवले होते आणि आज युक्रेनचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. अशा लोकांना गमावणे वेदनादायक आहे.”
युक्रेनियन सैन्याने सांगितले की, “रशियाने रात्रभर युक्रेनवर 477 ड्रोन्स आणि विविध प्रकारची 60 क्षेपणास्त्रे सोडली, ज्यापैकी 211 ड्रोन्स आणि 38 क्षेपणास्त्रे युक्रेनियन सैन्याने नष्ट केली.” “सुमारे 225 हून अधिक ड्रोन एकतर इलेक्ट्रॉनिक युद्धामुळे गमावले गेले किंवा ते स्फोटके वाहून नेणारे डिकॉय होते,” असेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर लिहिताना झेलेन्स्की यांनी म्हटले: “रशिया सक्षम असेपर्यंत हे मोठ्या प्रमाणावरील हल्ले थांबणार नाहीत.” त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यातच रशियाने सुमारे ११४ क्षेपणास्त्रे, १२७० ड्रोन आणि ११०० ग्लाइड बॉम्ब डागले आहेत.
रशियाच्या RIA Novosti या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे लुहान्स्कच्या रशियन-नियंत्रित भागात एक व्यक्ती ठार झाली. दोन्ही देश सामान्य नागरिकांना लक्ष्य करत नसल्याचा दावा करतात.
युक्रेनच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या अलीकडील हल्ल्यांमुळे आम्हाला वॉशिंग्टनकडून अधिक मदतीची गरज भासत आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली, अमेरिका युक्रेनला नवीन लष्करी मदत पुरवण्यासाठी अजूनही वचनबद्ध झालेली नाही.
गेल्या बुधवारी, ट्रम्प यांनी NATO परिषदेत झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर, अमेरिका युक्रेनच्या अतिरिक्त Patriot क्षेपणास्त्र यंत्रणेसाठीच्या विनंतीचा विचार करत असल्याचे सांगितले.
“हे युद्ध संपले पाहिजे, आक्रमकावर दबाव आवश्यक आहे आणि संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे, युक्रेनला आपली हवाई संरक्षण प्रणाली बळकट करण्याची गरज आहे, कारण तीच नागरिकांचे प्राण वाचवू शकते,” असे झेलेन्स्की यांनी X प्लॅटफॉर्मवर लिहीले.
“युक्रेन अमेरिकन संरक्षण प्रणाली खरेदी करण्यास तयार आहे आणि अमेरिकेचे नेतृत्व, राजकीय इच्छाशक्ती आणि सहयोग याची युक्रेनला आवश्यकता आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
अलीकडील आठवड्यांत रशियाने युक्रेनच्या शहरांवर सातत्याने हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, डझनभर नागरिक ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहेत.
या अलीकडील हल्ल्यात कीव्ह, ल्वीव्ह, पोल्टावा, मायकोलायिव, निप्रोपेत्रोव्हस्क, चेरकासी आणि इव्हानो-फ्रान्कीव्हस्क प्रांतात स्फोट झाले, असे साक्षीदार व स्थानिक राज्यपालांनी सांगितले. युक्रेनच्या लष्कराने सांगितले की सहा ठिकाणी हवाई हल्ले नोंदवले गेले.
चेरकासी प्रांतात, दोन लहान मुलांसह एकूण अकरा जण जखमी झाले असल्याची माहिती, राज्यपालांनी दिली. तिथे तीन बहुमजली इमारती आणि एक कॉलेज ध्वस्त झाले. इव्हानो-फ्रान्कीव्हस्क प्रांतात एक महिला जखमी झाली.
चेरकासीमध्ये बचाव पथकाने जळलेल्या भिंती आणि तुटलेल्या खिडक्यांच्या अपार्टमेंटमधून रहिवाशांना बाहेर काढले.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)