दक्षिण चीन समुद्रावरील वादाच्या पार्श्वभूमीवर, US-China ऑनलाईन संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही देशांच्या दूतावासांमध्ये फेसबुकवर झालेल्या सार्वजनिक वादानंतर, “आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर देशांतर्गत भावना भडकवू नयेत,” असे आवाहन सिंगापूरने परकीय दूतावासांना केले आहे.
“विदेशी दूतावासांनी, तिसऱ्या देशांशी संबंधित आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर देशांतर्गत भावना भडकवण्याचा प्रयत्न करू नये. अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांचे निराकरण योग्य राजकीय मार्गांनी करणेच इष्ट आहे,” असे सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने, बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेचा चीनला टोला
मंगळवारी, सिंगापूरमधील अमेरिकन दूतावासाने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये चीनच्या दक्षिण चीन समुद्रावरील भूमिकेची तुलना सिंगापूरमधील सार्वजनिक गृहनिर्माण संकुलांतील गैरवर्तनाशी केली गेली होती, जसे की इतर रहिवाशांच्या अपार्टमेंटसमोर किंवा सार्वजनिक जागांमध्ये वस्तूंची साठवणूक करणे.
या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते की: “चीनच्या मते, त्यांचा जवळपास संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर मालकी हक्क आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय कायदे याला मान्यता देत नाहीत.”
“2016 मध्ये, हेग न्यायालयाने बीजिंगच्या दाव्यांना कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीसुद्धा चीनकडून या भागात बांधकाम करणे, गस्त घालणे आणि दबाव आणणे असे प्रकार सुरूच आहेत. लष्करीकरण केलेल्या बेटांपासून ते ‘ग्रे झोन’ रणनीतीपर्यंत — हे फक्त सागरी वाद नाहीत, तर आंतरराष्ट्रीय नियमावली, स्थिरता आणि शांततेचीही कसोटी आहे,” असे 20 मे रोजी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते.
चीनचा अमेरिकेविरोधात ‘दडपशाही, बळजबरीचा’ आरोप
या व्हिडिओला प्रच्युत्तर म्हणून, चीनच्या दूतावासाने बुधवारी, फेसबुकवर जाहीर प्रतिक्रिया दिली. त्यांनी अमेरिकेवर ‘आंतरराष्ट्रीय नियमांपेक्षा स्वतःच्या हितसंबंधांना प्राधान्य देणे, आंतरराष्ट्रीय करार व संस्थांमधून माघार घेणे, टॅरिफ्ससारख्या मुद्द्यांवर इतर देशांवर दबाव आणणे, तसेच पनामा कालवा व ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा बाळगणे,’ असे विविध आरोप केले.
अमेरिकेची समर्थनात्मक भूमिका
माध्यमांच्या चौकशीला उत्तर देताना, अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने त्यांच्या स्वत:च्या सोशल मीडिया पोस्टचे समर्थन केले.
“या व्हिडिओद्वारे अमेरिकेचे धोरण आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील आमचे दृष्टिकोन आम्ही मांडले आहेत. स्थानिक सिंगापूर संदर्भातील उदाहरण देत, संपूर्ण जगाला समजेल अशा पद्धतीने या वादाचे आम्ही स्पष्टीकरण देण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
चीनच्या दूतावासाने यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)