Washington DC येथील, कॅपिटल ज्यूइश म्युझियममध्ये एका कार्यक्रम स्थळाबाहेर, बुधवारी रात्री झालेल्या गोळीबारात इस्रायली दूतावासाचे दोन कर्मचारी ठार झाले. याप्रकरणी एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकृत निवेदनात आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले असून, स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची पुष्टी केली आहे.
‘अतिशय जवळून’ गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, कॅपिटल ज्यूइश म्युझियम, FBIचे फील्ड ऑफिस आणि यूएस ऍटर्नी ऑफिसजवळील 3rd आणि F स्ट्रीट्स नॉर्थवेस्ट परिसरात, एक पुरुष आणि एका महिलेवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
वॉशिंग्टन पोलीस प्रमुख पामेला स्मिथ यांनी सांगितले की, “कार्यक्रमाच्या आधी म्युझियमबाहेर फेरफटका मारणाऱ्या एका संशयितला ताब्यात घेतले असून, त्याने पकडले जाताच “फ्री पॅलेस्टाईन, फ्री पॅलेस्टाईन” अशा घोषणा दिल्या.”
वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासाचे प्रवक्ते- ताल नाइम कोहेन यांनी सांगितले की, “कार्यक्रमादरम्यान म्युझियममध्ये उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर अतिशय जवळून गोळीबार करण्यात आला.”
इस्रायली दूतावासाने हल्लेखोर, पीडित किंवा या हल्ल्यामागील उद्देशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
गृहसुरक्षा विभाग व FBI ची सखोल चौकशी
अमेरिकेच्या गृहसुरक्षा मंत्री क्रिस्टी नोएम, यांनी इस्रायली दूतावासाचे दोन कर्मचारी मृत झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली.
“आपण सध्या सक्रिय आणि सखोल तपास करत आहोत आणि घटनेबाबत अधिक माहिती गोळा करत आहोत,” असे त्यांनी ‘X’द्वारे लिहिले. “या क्रूर गुन्हेगाराला योग्य ते शासन देऊ,” असेही त्यांनी यात नमूद केले.
एफबीआयचे संचालक काश पटेल, यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “त्यांना व त्यांच्या टीमला या गोळीबाराविषयी माहिती देण्यात आली असून, आम्ही मेट्रोपॉलिटन पोलिस विभागासोबत समन्वय साधत आहोत. तपास सुरू आहे. पीडित व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्वांनी प्रार्थना करा.”
‘ज्यूविरोधी दहशतवादी कृत्य’
संयुक्त राष्ट्रांतील इस्रायलचे राजदूत- डॅनी डॅनॉन यांनी, या हल्ल्याला ‘ज्यूविरोधी दहशतवादी कृत्य’ असे संबोधले.
“राजकीय अधिकारी व ज्यू समुदायावर हल्ला करणे म्हणजे मर्यादा ओलांडणे,” असे त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले.
“या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्यांवर अमेरिकन प्रशासन कठोर कारवाई करेल, यावर आम्हाला विश्वास आहे,” असेही त्यांनी जोडले.
घटनास्थळी अटर्नी जनरल पॅम बॉंडी आणि वॉशिंग्टन डीसीसाठीच्या यूएस अटर्नी जीनिन पिरो उपस्थित होत्या.
मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाने, या घटनेवर तात्काळ टिप्पणी करण्यास नकार दिला असून, याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याचे सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)