परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, यांनी मंगळवारी कोपनहेगनमध्ये डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली. भारत-डेन्मार्क ‘हरित धोरणात्मक भागीदारी’ (Green Strategic Partnership) पुढे नेण्यासाठी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले.
सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असलेल्या एस. जयशंकर यांनी, दहशतवादाविरोधातील एकात्मता आणि पाठिंब्यासाठी डेन्मार्कचे आभार मानले.
बैठकीनंतर जयशंकर यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की: “कोपनहेगनमध्ये माझे आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांचे आभार.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वैयक्तिक शुभेच्छा पोहोचवल्या असून, दहशतवादाविरोधातील लढ्यात दाखवलेल्या एकात्मतेसाठी आणि पाठिंब्यासाठी डेन्मार्कचे आभार मानले आहेत,” असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
ही टिप्पणी जम्मू-काश्मीरमधील अलीकडील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होती, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता.
“भारताचे मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे “पाकिस्तान समर्थित” दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले आणि मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.
या हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी, ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि पाकिस्तान व पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य केले.
पाकिस्तानने त्यानंतर काही दिवसांत ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे भारतातील अनेक शहरांना लक्ष्य केले. भारताने त्याला प्रत्युत्तर देत हे हल्ले निष्प्रभ केले.
चार दिवसांच्या तणावानंतर, 10 मे रोजी या दोन अणुशक्तीधारी देशांमध्ये युद्धविराम झाला.
नेदरलँड्स दौरा
डेन्मार्कमध्ये आगमनापूर्वी, जयशंकर यांनी नेदरलँड्सचा दौरा केला आणि तेथील वरिष्ठ नेतृत्वाशी भेट घेतली.
या भेटीत, त्यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान डिक स्कूफ यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या धोरणात्मक सहकार्याच्या वाढीव संधींबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आणि नियमित उच्चस्तरीय भेटी आणि संवादातून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवण्यात आली.
दहशतवादाविरोधी लढ्यात नेदरलँड्सकडून मिळालेल्या समर्थनाबद्दल, जयशंकर यांनी भारताच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
जयशंकर यांनी, त्यांच्या समकक्ष परराष्ट्र मंत्री कास्पर वेल्डकॅम्प यांच्यासोबत बैठक घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “व्यापार आणि अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, शेती व आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकहिताचे संबंध यासह विविध क्षेत्रांतील प्रगतीबद्दल, मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.”
त्याचबरोबर डिजिटल तंत्रज्ञान, सेमिकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या नव्या व उदयोन्मुख क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली.
जयशंकर यांनी, संरक्षण मंत्री रुबेन ब्रेकेलमन्स यांचीही भेट घेतली आणि संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात सहकार्य पुढे नेण्याच्या संधींबाबत चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला.
जयशंकर यांचा हा तीन देशांचा दौरा असून, अखेरीस ते जर्मनीला भेट देणार आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुटसह)