प्रजासत्ताक पक्षाचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी, शुक्रवारी लॉस एंजेलिसमध्ये तैनात जवानांना भेट दिली. ही भेट, सध्या इमिग्रेशन रेड्सविरोधी निदर्शने सुरू असतानाच झाली. त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांनी राज्य आणि शहर पातळीवरील डेमोक्रॅटिक नेत्यांवर टीका केली आणि त्यांच्यावर अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतराला चालना देण्याचा आरोप केला.
ष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये तैनात केलेल्या 700 यू.एस. मरीन आणि 4,000 नॅशनल गार्ड जवानांपैकी काहीजणांना व्हान्स यांनी भेट दिली आणि डेमोक्रॅट नेत्यांवर स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थांना पाठिंबा न दिल्याचा आरोपही केला.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, या महिन्याच्या सुरुवातीला डेमोक्रॅट गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या इच्छेविरुद्ध कॅलिफोर्नियाच्या नॅशनल गार्डला लॉस एंजेलिसमध्ये तैनात केले होते, कारण इमिग्रेशन अॅजन्सी ICE कडून झालेल्या वर्कप्लेस रेड्समुळे निदर्शने भडकली होती.
गुरुवारी, अमेरिकेच्या अपील न्यायालयाने ट्रम्प यांना कॅलिफोर्नियाच्या नॅशनल गार्डवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे, ‘अमेरिकेतील लष्कराचा देशांतर्गत वापर’ या विषयावर राष्ट्रीय चर्चेला सुरुवात झाली आणि देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येच्या शहरात राजकीय तणाव वाढला.
व्हान्स म्हणाले की, “न्यायालयाचा निर्णय हे स्पष्ट करतो की ट्रम्प यांनी केलेली जवानांची तैनाती “संघीय कायदा अंमलबजावणीचा पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य वापर होता.”
‘सैनिक आणि मरीन अजूनही आवश्यक आहेत’
व्हान्स यांनी, मरीन आणि नॅशनल गार्ड लॉस एंजेलिसमधून कधी परत जातील, याबाबत स्पष्ट माहिती दिली नाही, उलट ते काही काळ शहरात राहू शकतात, असे संकेत दिले.
“लोकांना भीती आहे की आंदोलन पुन्हा भडकू शकते, त्यामुळे सैनिक आणि मरीन अजूनही येथे आवश्यक आहेत,” असे व्हान्स यांनी स्पष्ट केले.
त्यांनी गव्हर्नर न्यूसम आणि लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बास, यांच्यावर आरोप केला की: “त्यांनी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली नाही, तसेच स्थानिक आणि राज्य पोलीस यंत्रणांना पुरेसा पाठिंबा दिला नाही.”
“त्यांनी बॉर्डर पॅट्रोल आणि सीमा सुरक्षा संस्थांकडे एखाद्या बेकायदेशीर शक्तीप्रमाणे पाहिले आहे, जे की खरे तर अमेरिकन जनतेसाठी कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आहेत,” असे व्हान्स म्हणाले.
गव्हर्नर न्यूसम यांचे नाव 2028 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर होण्याची शक्यता असून, ते व्हान्स यांच्या विरोधात उभे राहू शकतात.
न्यूसम यांच्या प्रवक्त्या डायना क्रॉफ्ट्स-पेलेयो यांनी व्हान्स यांच्या आरोपांना “पूर्णतः खोटे” असे म्हटले.
“गव्हर्नर नेहमीच हिंसेचा निषेध करत आले आहेत आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे,” असे त्या म्हणाल्या.
त्यांनी न्यूसम यांच्या X वरील, 9 जून रोजीच्या पोस्ट्सचा संदर्भ दिला, ज्यात म्हटले होते की, “ट्रम्पच्या गोंधळाचा गैरफायदा घेणाऱ्या आंदोलकांना पूर्णत: जबाबदार धरले जाईल.”
ट्रम्प यांच्या सैन्य तैनातीनमुळे निदर्शनांची तीव्रता वाढली, तणाव वाढला आणि हे सर्व असंवैधानिक आहे, असे न्यूसम यांचे म्हणणे आहे.
लॉस एंजेलिसचे महापौर- बास यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “व्हान्स यांनी असत्य पसरवले आहे” आणि सैन्य तैनातीला “चिथावणी” म्हटले आहे ज्यामुळे “आमच्या शहरात दहशत आणि भीती पसरली आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)