संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी आवश्यक असणाऱ्या खरेदीला मंजुरी दिल्यानंतर, संरक्षण मंत्रालय लवकरच एअरबस सी-295 विमानाच्या 15 सागरी प्रकारांच्या खरेदी प्रस्तावासाठी विनंती (आरएफपी) जारी करण्याची अपेक्षा आहे. या मंजुरीअंतर्गत – आवश्यकतेची स्वीकृती (एओएन) – नौदलाला मध्यम पल्ल्याच्या सागरी हेरगिरीसाठी तयार केलेली नऊ सी-295 विमाने मिळतील, तर तटरक्षक दल सहा सी-295 बहु-मिशन सागरी विमाने खरेदी करता येतील.
मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “ही एअरबस सी-295 मध्यम पल्ल्याची विमाने भारतीय नौदलाच्या सागरी हेरगिरीच्या गरजा पूर्ण करतील आणि मोहिमेच्या आवश्यकतेनुसार सोनोबॉय, पाणबुडीविरोधी युद्धासाठी टॉरपीडो आणि पृष्ठभागावरील युद्धांसाठी जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतील.”
करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर, फ्रेंच कंपनी एअरबस आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रमाद्वारे भारतात या विमानांची निर्मिती करण्यात येईल. भारतीय हवाई दलाने यापूर्वीच 56 सी-295 वाहतूक विमानांसाठी करार केला आहे. त्यातील पहिल्या 16 विमानांचे उत्पादन सध्या स्पेनमध्ये केले जात आहे, तर उर्वरित युनिट्स गुजरातमधील वडोदरा येथील टाटाच्या अंतिम असेंब्ली लाइनवर तयार केली जातील.
सी-295 चा हा नवा, शस्त्रसज्ज प्रकार भारताच्या सागरी गस्त क्षमता लक्षणीयरीत्या बळकट करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हे नौदलासाठी मध्यम पल्ल्याचे सागरी टेहळणी (एमआरएमआर) विमान आणि तटरक्षक दलासाठी बहु-कामगिरी सागरी विमान (एमएमएमए) म्हणून काम करेल. हे प्रकार कारवायांसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जे एकाच हवाई चौकटीत पाळत ठेवणे, हेरगिरी आणि हल्ला करण्याची क्षमता एकत्रित करून एक अष्टपैलू उदाहरण म्हणून स्वतः ला सिद्ध करतील.
सी-295 विमानाच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या सागरी पाळत ठेवण्याच्या क्षमतेतील मोठी कमतरता भरून निघेल अशी अपेक्षा आहे. सध्या, नौदल लांब पल्ल्याच्या सागरी हेरगिरीसाठी (एलआरएमआर) बोईंग पी-8आय विमानावर आणि कमी पल्ल्याची गस्त घालण्यासाठी डॉर्नियर डी. ओ.-228 विमानावर अवलंबून आहे, परंतु प्रभावी मध्यम पल्ल्याच्या विमानांची असणारी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी नौदलाकडे विमाने नाहीत.
सी-295 विमाने ही कमी भरून काढतील. ती प्रगत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतील तसेच सोनोबॉय आणि हलक्या वजनाच्या टॉरपीडोसह (टीएएल) पाणबुडीविरोधी युद्धासाठी तयार केली जातील. याव्यतिरिक्त, ती डीआरडीओच्या एनएएसएम-एसआर (लघु-श्रेणी) आणि एनएएसएम-एमआर (मध्यम-श्रेणी) जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असू शकतात, त्यामुळे पृष्ठभागावरील हल्ल्याच्या मोहिमांमधील त्यांची परिणामकारकता वाढेल. या अद्ययावतीकरणामुळे नौदलाच्या ताफ्याला लक्षणीय बळकटी मिळेल आणि विविध मोहिमांमध्ये सागरी गस्त आणि संरक्षण क्षमता वाढतील.
भारतीय नौदलाचे माजी प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी नमूद केले की, “विशेष आर्थिक क्षेत्राच्या (ईईझेड) पलीकडे आणि हिंद महासागर क्षेत्रातील (आयओआर) भारताच्या आवडीच्या क्षेत्रांच्या जवळ असलेल्या सी लाइन्स ऑफ कम्युनिकेशनच्या (एसएलओसी) बाजूने कार्यक्षमतेने काम करू शकणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या विमानाची अनुपस्थिती हा भारतीय नौदलाच्या पाळत ठेवण्याच्या क्षमतेतील सर्वात मोठा अडथळा आहे. “इतर वेगवेगळ्या भूमिकांसाठी तयार केलेली आपली सध्याची विमाने या गरजेशी विसंगत होती. मात्र या विमानाच्या समावेशामुळे केवळ आपली सागरी क्षेत्रातील जागरूकताच बळकट होणार नाही तर आपल्या लांब पल्ल्याच्या विमानांचे इंजिन तासही वाचतील,” असेही ते म्हणाले.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये भारताचे सागरी हितसंबंध विस्तारत असल्याने, एक मजबूत, कायमस्वरूपी हेरगिरीची गरज वाढली आहे. सुधारित सी-295, त्याच्या विस्तारित मोहीम क्षमतांसह, वास्तविक-वेळेची बुद्धिमत्ता आणि लक्ष्यित माहिती प्रदान करेल, जी भारतीय नौदल आणि तटरक्षक दल या दोघांसाठीही भारताचे सागरी क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचे सिद्ध होईल.
रवी शंकर