युक्रेनने देशाच्या खनिज संसाधनांच्या विकासावरील कराराच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून अमेरिकेबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याचे युक्रेनने गुरुवारी जाहीर केले. हा करार व्हावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला.
फेब्रुवारीमध्ये नैसर्गिक संसाधनांवरील सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी दोनही देश तयार असताना, ट्रम्प आणि युक्रेनचे नेते व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीचे रूपांतर खडाजंगीत झाल्यानंतर हा करार पुढे ढकलण्यात आला.
युक्रेनच्या पहिल्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री युलिया स्विरीडेन्को यांनी स्वाक्षरीनंतर सोशल मिडियावर सांगितले की, “आमच्या अमेरिकन भागीदारांसोबत स्वाक्षरी झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.”
गुरुवारी झालेल्या memorandum मुळे आर्थिक भागीदारी करार आणि युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी गुंतवणूक निधी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे त्या म्हणाल्या.
2022 मध्ये युक्रेनवर पूर्ण प्रमाणात आक्रमण करणाऱ्या रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनला अमेरिकेच्या पाठिंब्याची गरज आहे हे ओळखून ओव्हल ऑफिस प्रकरणानंतर कीवमधील अधिकाऱ्यांनी संबंध सुधारण्यासाठी काम केल्यानंतर ही स्वाक्षरी करण्यात आली आहे.
युक्रेनमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, खनिजांबाबतचा करार हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
पूर्ण करार अद्याप अंतिम टप्प्यात नाही
या करारावर पुढील आठवड्यात स्वाक्षऱ्या होऊ शकतात असे ट्रम्प यांनी सांगितले, मात्र युक्रेनच्या बाजूने संपूर्ण करार कधी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे याबद्दल कोणतेही संकेत दिले गेलेले नाहीत.
अमेरिकेने एक नवीन, अधिक विस्तृत करार देऊ केल्यानंतर युक्रेनच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्याच्या शेवटी चर्चेसाठी वॉशिंग्टनचा दौरा केला. प्रारंभिक आराखडा करारावर सहमती झाली होती, परंतु त्यावर कधीही स्वाक्षऱ्या झाल्या नाहीत.
“आमच्याकडे खनिजांचा जो करार आहे, ज्यावर गुरुवारी स्वाक्षऱ्या केल्या जातील, असे मला वाटते,” असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले.
माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात पुरविलेल्या लष्करी मदतीची परतफेड म्हणून त्यांनी अमेरिकेला युक्रेनची नैसर्गिक संसाधने आणि महत्त्वपूर्ण खनिजांमध्ये विशेष प्रवेश मिळवून देणाऱ्या करारावर भर दिला आहे.
ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्या शेजारी बसलेल्या कोषागार सचिव स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, “आम्ही अजूनही तपशीलांवर काम करत असून पुढील शुक्रवारपर्यंत यावर स्वाक्षऱ्या होऊ शकतात.”
“हे तपशील बरेचसे असे आहे ज्यावर आम्ही पूर्वी सहमती दर्शविली होती. “जेव्हा राष्ट्रपती येथे होते, तेव्हा आमच्यात सामंजस्य करार होता. आम्ही थेट मोठ्या कराराकडे गेलो आणि मला वाटते की हा 80 पानांचा करार आहे आणि त्यावरच आम्ही स्वाक्षरी करणार आहोत,” असेही ते म्हणाले.
कराराची वेळ आणि त्यातील मजकुराबाबत अधिक तपशील देण्याच्या विनंतीला व्हाईट हाऊसने प्रतिसाद दिलेला नाही.
झेलेन्स्की यांनी सांगितले होते की दोन्ही बाजूने ऑनलाईन स्वाक्षरी होऊ शकते.
“हे memorandum of intent आहे आणि आमचा हेतू सकारात्मक, रचनात्मक आहे,” असे त्यांनी कीव येथे पत्रकारांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या बाजूने सर्वसमावेशक करारापूर्वी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्यासाठी युक्रेनच्या संसदेची मान्यता आवश्यक असेल.
तत्पूर्वी, स्विरीडेन्को म्हणाल्या की, करारावर चर्चा करताना कीव आणि वॉशिंग्टनने केलेल्या लक्षणीय प्रगतीची नोंद घेण्याचा हा पहिला टप्पा आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)