पंजाबमधील 14 दहशतवादी हल्ल्यांमध्ये कथितपणे सहभागी असलेल्या गँगस्टर गुरप्रीत सिंग उर्फ हॅपी पासियाला शुक्रवारी अमेरिकेत अटक करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी एफबीआय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
हॅपीला कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामेंटो येथे अटक करण्यात आली.
बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केलेल्या गुंडाने अटक टाळण्यासाठी बर्नर फोनचा (अतिशय स्वस्तातील प्रीपेड फोन) वापर केला.
एका एक्स पोस्टमध्ये, एफबीआय सॅक्रामेंटोने लिहिले, “आज, भारतातील पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या कथित दहशतवाद्याला सॅक्रामेंटोमध्ये #FBI & #ERO द्वारे अटक करण्यात आली. दोन आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंधित असलेल्या त्याने बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला आणि पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी बर्नर फोनचा वापर केला.”
पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हॅपी 17 गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वॉन्टेड आहे.
एनआयएचे आरोपपत्र
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अलीकडेच पंजाबच्या चंदीगडमध्ये झालेल्या 2024 च्या ग्रेनेड हल्ल्याशी संबंधित आरोपपत्रात त्याचे नाव घेतले आहे.
एनआयएने म्हटले आहे की, अमेरिकेतील हॅपी आणि पाकिस्तानमधील दहशतवादी हरिंदर सिंग संधू उर्फ रिंडा हे या ग्रेनेड हल्ल्यासाठी जबाबदार होते.
या दोघांनी पंजाबमधील ग्राउंड ऑपरेटर्सना लागणारी दळणवळण मदत, दहशतवादी निधी, शस्त्रे आणि दारूगोळा पुरवला.
पंजाबच्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यात असलेल्या घरावर हा हल्ला करण्यात आला.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पंजाब पोलिसांनी पाकिस्तान-आयएसआयच्या पाठिंब्याने हॅपी आणि शमशेर उर्फ हनी नावाच्या आणखी एका कार्यकर्त्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला.
बटाला आणि गुरुदासपूर येथील पोलीस आस्थापनांवर ग्रेनेड हल्ला केल्याप्रकरणी मास्टरमाइंड अभिजीत सिंगसह पाच जणांना अटक करण्यात आली होती.
तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याचे अमेरिकेकडून भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर काही आठवड्यांतच सिंगला अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानमध्ये जन्मलेला पण आता कॅनडाचा नागरिक असलेला 64 वर्षीय राणा हा भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारांतर्गत कारवाई सुरू होण्यापूर्वी अमेरिकेत न्यायालयीन कोठडीत होता.
10 एप्रिल रोजी एका विशेष विमानाने राणाला नवी दिल्लीत आणण्यात आले आणि विमानतळावर उतरताच तपास संस्थेने त्याला अटक केली.
पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा परिचित सहकारी असलेल्या राणा याच्यावर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मदत केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये 166 लोक ठार झाले होते.
सरकारी साक्षीदार बनलेल्या हेडलीने अमेरिकेच्या न्यायालयात साक्ष दिली की राणाने त्याला 2007 ते 2008 दरम्यान मुंबईतील प्रमुख ठिकाणांची हेरगिरी करण्यास मदत केली होती.
2011 मध्ये अमेरिकेत राणाला 26/11 हल्ल्यांमध्ये थेट सहभाग असल्याच्या आरोपातून मुक्त करण्यात आले असले, तरी लष्कर-ए-तोयबाला आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल तसेच डेन्मार्कमधील दहशतवादी कटाला मदत केल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले होते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)