Wednesday, March 25, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi पाकिस्तान जगातील सर्वाधिक प्रदूषित, भारतीय शहरांचाही यादीत समावेश

पाकिस्तान जगातील सर्वाधिक प्रदूषित, भारतीय शहरांचाही यादीत समावेश

0
पाकिस्तान

जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार, 2025 मध्ये पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक प्रदूषित देश असून येथे ‘PM2.5’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोकादायक सूक्ष्म कणांचे प्रमाण सध्या जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शिफारस केलेल्या पातळीपेक्षा 13 पटींनी अधिक आहे. या अहवालानुसार जगातील पाच सर्वाधिक प्रदूषित देश पुढीलप्रमाणे: पाकिस्तान (67.3 μg/m³), बांगलादेश (66.1 μg/m³), ताजिकिस्तान (57.3 μg/m³), चाड (53.6 μg/m³), आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो (50.2 μg/m³).

जगातील 25 सर्वाधिक प्रदूषित शहरे ही केवळ भारत, पाकिस्तान आणि चीन या देशांमधील असल्याचेही या अहवालात नोंदवले गेले आहे. 2025 मध्ये भारतातील ‘लोनी’ हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले; येथे PM2.5 ची सरासरी पातळी 112.5 मायक्रोग्राम इतकी होती. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीनच्या वायव्येकडील शिनजियांग प्रांतातील ‘होतान’ हे शहर आहे, जिथे ही पातळी 109.6 मायक्रोग्राम इतकी नोंदवली गेली.

हवेच्या गुणवत्तेवर देखरेख करणाऱ्या ‘IQAir’ या स्विस संस्थेने आपल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे की, गेल्या वर्षी 13 देश आणि प्रदेशांनी PM2.5 ची सरासरी पातळी WHO च्या मानकानुसार, म्हणजेच 5 मायक्रोग्राम प्रति घनमीटरपेक्षा कमी राखण्यात यश मिळवले; 2024 मध्ये अशा देशांची संख्या सात होती. या अहवालानुसार, ज्या 143 देश आणि प्रदेशांच्या हवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यात आली, त्यापैकी एकूण 130 देश आणि प्रदेशांना WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात अपयश आले आहे.

अमेरिकेने बंद केला जागतिक देखरेख कार्यक्रम

सांख्यिकीयदृष्ट्या, 2024 मधील सर्वाधिक प्रदूषित देश म्हणून ‘चाड’ची नोंद करण्यात आली होती. मात्र यंदा चौथ्या क्रमांकावर असलेल्या या देशातील PM2.5 पातळीत झालेली घट ही कदाचित ‘माहितीतील त्रुटीं’मुळे (data gaps) असावी, असा अंदाज आहे.

गेल्या मार्चमध्ये, अमेरिकेने आपला एक जागतिक देखरेख कार्यक्रम बंद केला. आपल्या विविध दूतावास आणि वाणिज्य दूतावास इमारतींमधून संकलित केलेली प्रदूषणाची माहिती या कार्यक्रमाद्वारे एकत्रित केली जात असे; मात्र, अर्थसंकल्पीय मर्यादांचे कारण देत अमेरिकेने हा कार्यक्रम थांबवला.

“मार्चमध्ये ही माहिती उपलब्ध होणे थांबल्यामुळे (चाडमध्ये) PM2.5 पातळीत लक्षणीय घट झाल्याचे भासत होते; परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, नेमके काय घडले आहे हे आपल्याला ठाऊक नाही,” असे ‘IQAir’ अहवालाच्या मुख्य लेखिका ख्रिस्टी चेस्टर श्रोडर यांनी सांगितले.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे, धुराचा (smog) मोठा धोका असलेल्या अनेक देशांसाठी माहितीचा एक प्रमुख स्रोतच संपुष्टात आला. माहितीतील त्रुटींमुळे बुरुंडी, तुर्कमेनिस्तान आणि टोगो या देशांनाही 2025 च्या अहवालातून वगळण्यात आले आहे.

केवळ 14 टक्के शहरांनीच केली WHO च्या निकषांची पूर्तता

2025 मध्ये जगातील केवळ 14 टक्के शहरेच WHO च्या (जागतिक आरोग्य संघटना)  मानकांची पूर्तता करू शकली आहेत; 2024 मध्ये हे प्रमाण 17 टक्के होते. कॅनडातील वणव्यांमुळे अमेरिका आणि अगदी युरोपपर्यंतच्या विस्तृत पट्ट्यात ‘PM2.5’ कणांचे प्रमाण वाढल्यामुळे या संख्येत घट झाली आहे.

2025 मध्ये या मानकांची पूर्तता करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, आइसलँड, एस्टोनिया आणि पनामा यांचा समावेश आहे. दरम्यान, लाओस, कंबोडिया आणि इंडोनेशिया या देशांनी मागील वर्षांच्या तुलनेत प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट नोंदवली आहे. ‘ला निना’ (La Niña) हवामानामुळे निर्माण झालेली अधिक पर्जन्यवृष्टी आणि वाऱ्याची वाढलेली गती हे या घटीचे मुख्य कारण ठरले. मंगोलियामध्येही प्रदूषणाच्या सरासरी पातळीत 31 टक्के घट होऊन ती 17.8 मायक्रोग्रॅम्स प्रति घनमीटर इतकी खाली आली.

‘IQAir’ च्या अहवालानुसार, एकूण 75 देशांनी 2025 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ‘PM2.5’ ची पातळी कमी असल्याचे नोंदवले, तर 54 देशांमध्ये प्रदूषणाची सरासरी पातळी वाढल्याचे दिसून आले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleभारताबाबत पाकिस्तानचा अविवेकी दृष्टिकोन आणि राजनैतिक अधिकाऱ्यांवर होणारा परिणाम
Next articleट्रम्प यांचा मोदींना फोन, मात्र शांतता वाटाघाटींबाबत परस्परविरोधी संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here