भारत आणि चीन सीमारेषेवर (एलएसी) परिस्थिती आता तरी स्थिर आणि नियंत्रणात आहे, मात्र तरीही पुढे काय होईल, ते सांगता येत नाही, असे सांगून लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले, पूर्वेकडील भागात चीनने सैन्य तैनातीत काही प्रमाणात वाढ केली आहे. तथापि, भारताचे सैन्य देखील पुरेशा प्रमाणात तिथे तैनात असल्याचे लष्करप्रमुखांनी सांगितले. लष्कर दिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जनरल मनोज पांडे यांनी ही माहिती दिली.
कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपल्या सीमारेषेवर आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येत असून पुरेशा प्रमाणात सैन्य आणि शस्त्रास्त्रसज्जता आहे. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपले सीमारेषेवरील सैन्य सज्ज आहे, असे त्यांनी आश्वास्त केले.
भारत आणि चीन सीमारेषेवर परिस्थिती जरी अनिश्चित असली तरी तूर्तास तरी स्थिर आहे, असे सांगून जनरल पांडे म्हणाले, सातपैकी पाच मुद्द्यांचे निराकरण करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. लष्करी आणि राजनैतिक स्तरांवर आमची चर्चा सुरूच आहे. कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शत्रू सैन्याने कोणतीही आगळीक केली तर, त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज आहेच, त्याशिवाय तेथील परिस्थिती ‘जैसे थे’ राहील, यावर भर दिला जाईल, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.
डोकलामबाबतीत जनरल मनोज पांडे म्हणाले की, आम्ही तेथील परिस्थितीवर आणि तिथल्या घडामोडींवर नजर ठेवून आहोत.
भारत – चीन सीमारेषेवर लागणाऱ्या आवश्यक त्या पायाभूत सुविधा वाढविण्याबाबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, मागील तीन वर्षांत, लडाखमध्ये लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि निवासी व्यवस्थेसाठी सुमारे 1300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मागील दोन वर्षांत पूर्व लडाखमध्ये साधारण 55000 सैन्यतुकड्या आणि 400 गन्स पुरविल्या आहेत.
जम्मू – काश्मीर परिस्थिती संदर्भात बोलताना जनरल मनोज पांडे म्हणाले की, पाकिस्तानसमवेत फेब्रुवारी 2021मध्ये शस्त्रसंधी करण्यात आली होती आणि तिचे योग्य रीतीने पालन होत आहे, ही समाधानाची बाब आहे. परंतु तरीही सीमारेषेपलीकडून अतिरेकी कारवाया सुरूच आहेत. हिंसाचाराचे प्रमाण कमी आहे, पण तरीही ते पूर्णपणे बंद न झाल्यामुळे आपल्याला कायमच सावध आणि सज्ज राहिले पाहिजे.
ईशान्य भारताबद्दल ते म्हणाले की, तेथील (ईशान्य भारतातील) बहुसंख्य राज्यांमध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झालेली आहे. आर्थिक व्यवहारांना चालना तसेच तिथे होणाऱ्या विकासकामांचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
रशियन बनावटीच्या अत्याधुनिक एके 203 या बंदुका भारतीय सैन्याच्या हाती येणार आहेत. त्याबाबत लष्करप्रमुख म्हणाले, साधारण 5000 बंदुका तयार करण्यासाठी लागणारी सामग्री अंदाजे येत्या मार्चपर्यंत भारताला उपलब्ध होईल. रशियाच्या सहयोगाने भारत सहा लाख बंदुकींचे उत्पादन करणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने यंदा 15 जानेवारी या लष्करदिनाला विशेष महत्त्व आहे. राष्ट्राचे जे व्हिजन आहे, त्याच्याशी आम्ही पूर्णपणे बांधिल आहोत आणि त्याअनुरूप आम्ही परिवर्तन करण्याचे निश्चित केले आहे, असे ते म्हणाले.
जनरल पांडे यांनी अशीही माहिती दिली की नजीकच्या काळात भारतीय सैन्यदलाच्या तोफखाना विभागात महिलांची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे, अशी माहिती देखील लष्करप्रमुख जनरल पांडे यांनी दिली.
(अनुवाद : चित्रा दिवेकर)