डसॉल्ट एव्हिएशनने अलीकडेच, पाकिस्तानकडून राफेल विमानांबाबत करण्यात आलेल्या दाव्यांना ठामपणे फेटाळले आहे, ज्यामध्ये म्हटले होते की, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय वायुदलाची तीन राफेल लढाऊ विमाने पाडली गेली होती. डसॉल्टचे CEO एरिक ट्रॅपियर यांनी हे आरोप ‘बिनबुडाचे’ असल्याचे म्हटले आहे. राफेल ही आजच्या काळातील सर्वात सक्षम लढाऊ विमानांपैकी एक असल्याचे सांगत, ट्रॅपियर यांनी पुन्हा एकदा राफेलचे महत्व अधोरेखित केले.
पॅरिस एअर शोच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत ट्रॅपियर यांनी, मे महिन्यात झालेल्या तीव्र संघर्षादरम्यान भारतीय हवाई दलाच्या (IAF) कारवायांभोवतीच्या अटकळींवर भाष्य केले. “आमच्याकडे याविषयी कुठलेही तपशील नाहीत, कारण भारताने अधिकृतपणे तसे जाहीर केलेले नाही. मात्र पाकिस्तान तीन राफेल नष्ट झाल्याचा जो दावा करत आहे, त्याला कुठलाही आधार नाही,” असे त्यांनी चॅलेंजेस मासिकाशी बोलताना सांगितले.
पाकिस्तानने यापूर्वी दावा केला होता की, प्रत्युत्तरात्मक हवाई कारवाईदरम्यान भारताची सहा विमाने पाडण्यात आली, त्यात तीन राफेलही होते. ही लढत राफेलच्या २०२० मधील समावेशानंतर भारतीय वायुदलाची पहिली मोठ्या प्रमाणावरची तैनाती ठरली आणि त्यामुळे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरली.
ट्रॅपियर यांनी स्पष्ट केले की, कोणतीही लढाऊ कारवाई यशस्वी झाली की नाही, हे केवळ विमानांनी परत येण्यातूनच ठरत नाही, तर उद्दिष्टे साध्य झाली का हे अधिक महत्त्वाचे असते. “झिरो लॉसेस (शून्य नुकसान) हे नेहमीच आदर्श असते, पण ते एकमेव निकष नाही,” असे ते म्हणाले. “दुसऱ्या महायुद्धातही सहयोगी सैन्याला मोठे नुकसान सोसावे लागले — पण याचा अर्थ त्यांच्या मोहिमा अपयशी ठरल्या असे होत नाही.”
भारत जेव्हा अधिकृतरित्या ऑपरेशनचे तपशील सामायिक करेल, तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल, असेही ट्रॅपियर यांनी सांगितले. “आपल्याला शेवटी समजेल की काही नुकसान झाले होते का आणि उद्दिष्टे गाठली गेली होती का. तेव्हा कदाचित काही लोकांना आश्चर्य वाटेल,” असे त्यांनी सूचित केले.
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल अनिल चौहान यांनीदेखील पाकिस्तानचे दावे “पूर्णपणे चुकीचे” असे म्हणत उघडपणे फेटाळले आहेत. वायुदलाला काही प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र “ऑपरेशनचे मुख्य उद्दिष्ट पूर्ण झाले,” हेही त्यांनी ठामपणे सांगितले.
ऑपरेशन सिंदूर हे इस्लामाबादकडून भारताला उकसवण्याठी केलेल्या कारवायांनंतर सुरु करण्यात आले. या मोहिमेत भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या आतल्या भागात अचूक हवाई हल्ले करत दहशतवादी पायाभूत संरचना आणि लष्करी टार्गेट्सवर प्रहार केला. यामध्ये राफेलच्या लांब पल्ल्याच्या अचूक क्षमतेचे आणि त्याच्या बहुउद्देशीय भूमिकेचे प्रभावी प्रदर्शन झाले.
ट्रॅपियर यांनी स्पर्धात्मक लढाऊ विमानांशी तुलना करताना, राफेलच्या क्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. “राफेल हे F-35 पेक्षा सरस आहे आणि आज सेवा देत असलेल्या कोणत्याही चिनी विमानांपेक्षा ते खूपच सक्षम आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले आणि विविध युद्ध रंगभूमीवरील त्याच्या सिद्ध कामगिरीचे उदाहरण दिले.
स्वतंत्र संरक्षण विश्लेषकांनीही पाकिस्तानच्या दाव्यांविषयी शंका व्यक्त केली असून, उपग्रह चित्रे, रडार डेटा किंवा विमानांचे अवशेष यासारखा कोणताही पुरावा अद्याप पाकिस्तानने सादर केलेला नाही.
भारतीय सरकारने यावर सध्या संयम राखलेला असला, तरी ट्रॅपियर यांच्या निवेदनामुळे पाकिस्तानच्या दाव्यांविषयी वाढत चाललेल्या संशयाला आणखी बळ मिळाले असून, राफेलच्या विश्वासार्हतेबाबत जागतिक पातळीवरील खात्रीही अधिक दृढ झाली आहे.
टीम भारतशक्ती