नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) गुरुवारी सांगितले की, या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातामागील घटनांची मालिका समजून घेण्यासाठी आणि त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 260 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
12 जून रोजी, लंडनकडे जाणारे बोइंग 787 ड्रीमलाइनर विमान, अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. यामध्ये विमानातील 242 पैकी 241 प्रवासी मरण पावले. ही गेल्या दहा वर्षांतील सर्वात भीषण विमान अपघातातील दुर्घटना ठरली आहे.
डेटा मिळवण्याचे काम सुरू
अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स- कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) हे अपघाताच्या काही दिवसांनंतर सापडले. त्यापैकी एक 13 जून रोजी अपघातस्थळी असलेल्या एका इमारतीच्या छपरावरून मिळाला, तर दुसरा 16 जून रोजी ढिगाऱ्याखाली सापडला.
तपासणीसाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला हलवण्यात आले, जिथे भारताच्या विमान अपघात तपास यंत्रणेच्या (Aircraft Accident Investigation Bureau) नेतृत्वाखालील एका टीमने डेटा मिळवण्याचे काम सुरू केले, असे मंत्रालयाने आपल्या निवेदनात सांगितले.
“ब्लॅक बॉक्समधील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) सुरक्षितरित्या काढण्यात आले असून, मेमरी मॉड्यूलमधील डेटा यशस्वीरीत्या डाऊनलोड करण्यात आला आहे. सध्या CVR आणि FDR डेटा चे विश्लेषण सुरू आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
CPM हा ब्लॅक बॉक्सचा मुख्य भाग असून, अपघाताच्यावेळी रेकॉर्ड झालेला डेटा सुरक्षित ठेवण्याचे तो काम करतो.
भारतीय अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण कुठे करायचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यांच्याकडून मिळालेल्या डेटावरून विमानाच्या कामगिरीबद्दल आणि अपघातापूर्वी वैमानिकांमधील कोणत्याही संभाषणाबद्दल महत्त्वपूर्ण संकेत मिळू शकतात.
या दुर्घटनेमुळे, भारतातील एअरलाईन्सकडून नियमांचे वारंवार होणारे उल्लंघन पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
विमानात हे दोष वारंवार आढळून आले
भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सांगितले की, मुंबई आणि दिल्ली या दोन सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांवर विमानांमधील एकाच प्रकारचे दोष वारंवार दिसून आले आहेत.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, DGCA ने एअर इंडियाला यापूर्वीच अनेकदा सतर्कतेचा इशारा दिला होता. अपघातानंतर एअर इंडियाची चौकशी वाढली आहे. यामध्ये काही विमाने आपत्कालीन उपकरणांची तपासणी प्रलंबित असतानाही उड्डाणासाठी परवानगी देण्यात आल्याची बाब समोर आली होती.
पायलट्सचे ड्युटी वेळापत्रक आणि देखरेखीत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलही एअर इंडियाला तंबी देण्यात आली होती.
यावर एअर इंडियाने म्हटले आहे की, “त्यांनी DGCA च्या सूचनांची अंमलबजावणी केली असून, सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.”
एअर इंडियाने सांगितले की, “देखभाल नोंदींची पडताळणी जलद गतीने सुरू असून, लवकरच ती पूर्ण केली जाईल.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)