पहिली स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘INS Arnala’ नौदलात सहभागी

0

भारताच्या समुद्री सुरक्षेला आणि किनारी संरक्षण क्षमतेला चालना देणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हणजे, स्वदेशी बनावटीच्या 16 पाणबुडीविरोधी (अँटी सबमरिन) युद्धनौकांपैकी, ‘INS Arnala’ ही पहिली युद्धनौका 18 जून रोजी, भारतीय नौदलात सामील होणार आहे. या समारंभ विशाखापट्टणम येथे पार पडणार असून, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ- जनरल अनिल चौहान याचे अध्यक्षपद भूषवतील.

ही युद्धनौका 8 मे रोजी, भारतीय नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. हा महत्वपूर्ण टप्पा ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भारताच्या स्वावलंबनाला अधोरेखित करतो.

‘INS Arnala’ श्रेणीची ही पाणबुडीविरोधी युद्धनौका (Anti-Submarine Warfare Shallow Water Craft – ASW-SWC), किनारी भागातील आणि उथळ पाण्यातील सबमरिन धोक्यांना ओळखून त्यांचा सामना करण्यासाठी डिझाईन केली आहे. या नव्या श्रेणीच्या नौका जुन्या ‘अभय’ श्रेणीच्या कॉर्व्हेट्सची जागा घेणार असून, भारताच्या 7,500 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचे आणि किनारपट्टीजवळील मालमत्तांचे संरक्षण करण्याची नौदलाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवणार आहेत.

या युद्धनौका, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (GRSE), कोलकाता आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL), कोची यांनी संयुक्तपणे निर्माण केल्या आहेत. या प्रकल्पात 80% पेक्षा अधिक स्वदेशी घटकांचा समावेश असून, भारताच्या संकटमुक्त आणि प्रगत नौदल जहाजबांधणी व संरक्षण प्रणाली निर्माण क्षमतेचे हे प्रतीक आहे.

INS Arnala अत्याधुनिक अंडरवॉटर युद्ध तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामध्ये हल-माउंटेड सोनार (अभय), लो-फ्रिक्वेन्सी व्हेरिएबल डेप्थ सोनार (एलएफव्हीडीएस) आणि अंडरवॉटर अकॉस्टिक कम्युनिकेशन सिस्टम्स (यूडब्ल्यूएसीएस) यांचा समावेश आहे. हे सेन्सर्स, आधुनिक कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम (सीएमएस) आणि इंटिग्रेटेड एएसडब्ल्यू कॉम्प्लेक्ससह (आयएसी) एकत्रित केले आहेत, जेणेकरून पाण्याखालील धोका शोधणे आणि प्रतिसाद देणे सोपे होईल.

आयएनएस अर्नाळाच्या शस्त्रास्त्र संचामध्ये – हलके टॉर्पेडो, एएसडब्ल्यू रॉकेट, माइन-लेइंग सिस्टम आणि अँटी-टॉर्पेडो डिकॉय सिस्टम समाविष्ट आहेत, ज्यामुळे पाणबुडीविरोधी ऑपरेशन्ससाठी ती एक शक्तिशाली व्यासपीठ बनते. जहाजाच्या डिझाइनमुळे ते उथळ पाण्यात उच्च मॅन्युव्हरेबिलिटीसाठी देखील सक्षम होते, ज्यामुळे ते किनारपट्टीवरील देखरेख, प्रतिबंध आणि मानवतावादी मदतकार्य मोहिमा हे सर्व समान सहजतेने पार पाडू शकते.

एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी फ्लीटच्या समावेशामुळे, हिंद महासागरी प्रदेशातील (Indian Ocean Region) भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल तयारीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, जे प्रादेशिक आणि बाह्य-प्रादेशिक शक्तींद्वारे पाण्याखालील क्रियाकलापांमध्ये वाढ होत असलेले धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र आहे.

‘आयएनएस अर्नाळा’ चा भारतीय नौदलातील सहभाग, हे केवळ एक रणनीतिक बळकटीकरण नसून, तो एक मजबूत संदेश देखील आहे की – ‘भारत स्वदेशी तंत्रज्ञान व संसाधनांच्या आधारे फ्रंटलाईन युद्धनौका डिझाईन करण्यास आणि त्यांची निर्मिती करण्यात सक्षम आहे.’ ही निर्मिती देशाचे परकीय पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करते आणि राष्ट्रीय संरक्षणाला अधिक स्वयंपूर्ण आणि टिकाऊ बनवते.

INS Arnala हे त्याच्या श्रेणीतील पहिले जहाज, भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्धनौकेसाठी एक परिवर्तनकारी अध्यायाची सुरुवात आहे आणि सोबतच पूर्णत: स्वावलंबी सागरी शक्ती बनण्याच्या दिशेने भारताच्या स्थिर वाटचालीचे प्रतीक आहे.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleModi-Carney Meet: भारत-कॅनडा संबंध नव्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न
Next articleIran: भारतीयांच्या सुटकेसाठी अर्मेनियाचे प्रयत्न; भारतीय सशस्त्र दले सज्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here