भारत आणि कॅनडाच्या सर्वोच्च नेत्यांनी, मंगळवारी आपली पहिली द्विपक्षीय बैठक घेतली, जी एका महत्त्वपूर्ण राजनैतिक घडामोड मानली जात आहे. दोन्ही नेत्यांनी या बैठकीचे वर्णन ‘फलदायी’ असे केले. 2023 मध्ये, तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी एका कॅनेडियन शीख विभाजकाच्या हत्येमध्ये भारताच्या सहभागाचा आरोप केला होता, त्यानंतर झालेली ही पहिलीच भेट होती.
ट्रुडो यांच्या आरोपामुळे, जवळपास दोन वर्षांपासून भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव कायम होता. परंतु कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अल्बर्टा येथे आयोजित, ग्रुप ऑफ सेव्हन (G7) शिखर परिषदेत, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समकक्ष म्हणून स्वागत केले, त्यामुळे हा तणाव दूर झाल्याची चिन्हे दिसत आहेत.
बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याचे, दोन्ही नेत्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कार्नी यांच्या कार्यालयाने सांगितले की, ‘तणाव वाढत असताना दोन्ही देशांनी, मागे घेतलेल्या राजदूतांच्या जागी नवीन राजदूत नियुक्त करण्यास त्यांनी सहमती दर्शविली आहे.’
भागीदारी बळकट करण्यावर भर
भारताने, हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा कॅनडाचा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला. सध्याच्या व्यापारातील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे पारंपरिक आंतरराष्ट्रीय आघाड्या पुन्हा आकार घेत असून, त्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा हे दोन्ही देश, जागतिक स्तरावर नव्या भागीदाऱ्यांची उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कार्नी, ज्यांनी भारताला G7 चा सदस्य नसतानाही आमंत्रित केले, त्यांनी यामागे ‘भारताची जागतिक पुरवठा साखळीत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका’ हे कारण असल्याचे नमूद केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे,” असेही ते म्हणाले.
कार्नी यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दोन्ही नेत्यांनी भारत-कॅनडा संबंधांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले असून, हे संबंध परस्पर सन्मान, कायद्याचे राज्य आणि सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वांवर आधारित असावेत, यावर भर देण्यात आला.”
ट्रुडो यांनी, कॅनडाच्या भूमीवर हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या सहभागाचा आरोप करून निर्माण झालेल्या वादाचा कार्नी यांनी कोणताही उल्लेख केला नाही.
मोदी सरकारने या हत्येमध्ये सहभाग असण्याचे आरोप फेटाळले आहेत आणि त्याऐवजी कॅनडावर शीख विभाजकांना सुरक्षित आश्रय देत असल्याचा आरोप केला आहे.
‘उत्कृष्ट बैठक’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “ही बैठक उत्कृष्ट झाली.. लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य या मूल्यांवर भारत आणि कॅनडामध्ये असलेल्या मजबूत विश्वासाला दुजोरा मिळाला” असे मत X पोस्टद्वारे व्यक्त केले. ही गेल्या दशकातील त्यांची पहिली कॅनडा भेट होती.
भारत हा कॅनडासाठी तात्पुरत्या परदेशी कामगारांचा आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा स्रोत आहे, तसेच एक महत्त्वाची बाजारपेठही आहे.
‘पल्स कॅनडा’ या कृषी उद्योग समूहाचे अध्यक्ष ग्रेग चेरेविक यांनी सांगितले की, ‘कॅनडातील शेतकरी भारतात जास्त प्रमाणात कृषी उत्पादने, विशेषतः मसूर (लेंटिल्स) निर्यात करण्याच्या अपेक्षेत आहेत.’
तथापि, मोदी यांच्या कॅनडा दौऱ्यावर आक्षेप नोंदवला गेला. काही नागरिकांनी सरकारकडे असा सवाल उपस्थित केला की, भारतीय पंतप्रधानांना निमंत्रण देण्यापूर्वी अटी का घातल्या गेल्या नाहीत.. दौऱ्यादरम्यान, कॅल्गरी शहरातील मध्यवर्ती भागात काही शीख आंदोलकांनी भारतीय ध्वज फाडून आंदोलन केले.
मागील वर्षी, कॅनडाने हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येच्या प्रकरणात सहा भारतीय मुत्सद्द्यांना देशाबाहेर काढले आणि कॅनडातील भारतीय असंतुष्टांवर कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. या हत्येप्रकरणी चार जणांवर खूनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)