आज भारताने फ्रान्ससोबत, 26 राफेल-मरीन (Rafale-M) फायटर जेट्स खरेदीसाठी 64,000 कोटींहून अधिक मूल्याच्या बहुप्रतिक्षित करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे भारतीय नौदलाच्या विमानवाहू क्षमतेत ऐतिहासिक वाढ होणार आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रातील वाढत्या सुरक्षात्मक तणावाच्या पार्श्वभूमीवर, राफेलची ही खरेदी अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
हा स्वाक्षरी समारंभ, दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला. याआधी 9 एप्रिल रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने (CCS) या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली होती.
कराराचे तपशील
या कराराअंतर्गत, भारतीय नौदलासाठी 22 सिंगल सिटर Rafale-M विमाने आणि 4 ट्विन सिटर प्रशिक्षण विमाने खरेदी केली जातील. ट्विन सिटर विमाने विमानवाहू नौकांवर उतरू शकत नाहीत, मात्र ती पायलट प्रशिक्षण आणि तैनाती तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
BharatShakti ने आधी दिलेल्या अहवालांनुसार, या पॅकेजमध्ये अत्याधुनिक शस्त्रप्रणाली, सिम्युलेटर, सुटे भाग, प्रशिक्षण मॉड्यूल्स, दस्तऐवजीकरण आणि 5 वर्षांसाठीच्या लॉजिस्टिक्स सपोर्ट यांचा समावेश आहे.
डिलिव्हरी टाईमलाइन
या खरेदीसाठी सरकार-ते-सरकार (Inter-Governmental Agreement – IGA) कराराच्या माध्यमातून कार्यवाही होणार असून, मध्यस्थांशिवाय थेट पुरवठा केला जाणार आहे.
फ्रान्सने नेहमी वेळेआधी उपकरणे पुरवण्याची पारंपरिक क्षमता दाखवली आहे आणि त्यामुळे 2019 पासून जेट्सचा पुरवठा सुरू होईल, तर 2031-32 दरम्यान त्यांची डिलिव्हरी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
पार्श्वभूमी व निवड प्रक्रिया
जुलै 2023 मध्ये, संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर होते आणि हे भारत-फ्रान्स धोरणात्मक सहकार्याचे मोठे संकेत मानले गेले होते.
Rafale-M आणि बोईंगच्या F/A-18 सुपर हॉर्नेट यांच्यात कठोर चाचण्या घेण्यात आल्या. दोन्ही विमानं नौदलाच्या आवश्यकतांनुसार फिट बसत होती, मात्र भारतीय हवाई दलाकडे आधीच असलेल्या राफेल विमानांशी होणारी त्याची ऑपरेशनल सुसंगती आणि लाइफसायकल खर्चात होणारी बचत, यामुळे Rafale-M निवडले गेले.
MiG-29K ला निरोप
ही खरेदी, भारतीय नौदलाच्या MiG-29K विमानांच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर केली जात आहे. तांत्रिक आणि विश्वासार्हतेच्या समस्यांमुळे, भारतीय नौदल आपल्या जुन्या MiG-29K विमानांना निरोप देत आहे.
Rafale-M विमाने, आता INS विक्रमादित्य आणि स्वदेशी INS विक्रांत या विमानवाहू नौकांवर कार्यरत होतील. हा टप्पा स्वदेशी Twin Engine Deck-Based Fighter (TEDBF) तयार होईपर्यंत ‘स्टॉपगॅप सोल्यूशन’ म्हणून काम करेल.
आधुनिक युद्धसज्ज क्षमता
राफेल-M ही मल्टीरोल कॅरियर-ऑपरेशनल फायटर असून ती खालील प्रगत शस्त्र प्रणालींनी सज्ज आहे:
- SCALP लाँग-रेंज क्रूज क्षेपणास्त्र
- AM39 Exocet अँटी-शिप क्षेपणास्त्र
- Meteor BVR (Beyond Visual Range) हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
फ्रेंच नौदलाच्या चार्ल्स डे गॉल, या विमानवाहू जहाजावरून प्रत्यक्ष युद्धात सिद्ध झालेली ही क्षमता, आता भारताच्या सागरी सामर्थ्यात निर्णायक फरक घडवून आणेल, विशेषतः चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या नौदलाच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर.
“Buddy-Buddy” इंधन रिफ्युएलिंग
या करारात, 10 भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांमध्ये ‘Buddy to Buddy’ एअरियल रिफ्युएलिंग पॉट्स बसवणे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यामुळे भारतीय नौदल आणि हवाई दलाच्या विमानांची एकत्र ऑपरेशनल श्रेणी वाढणार असून, संयुक्त अभियानात समन्वय वाढवण्यास मदत होणार आहे.
धोरणात्मक महत्त्व
राफेल-M ची निवड, ही रणनीतिक आवश्यकता आणि धोरणात्मक गुंतवणूक आहे. चीन हिंद महासागरात आपला नौदल विस्तार वाढवत असताना, भारत राफेल-एम सारख्या बहुमुखी, दुहेरी-ऑपरेशन प्लॅटफॉर्मसह आपले सागरी वर्चस्व मजबूत करत आहे, जे वाहक आणि जमिनीवरील तळांवरून दोन्ही ठिकाणी प्रक्षेपित केले जाऊ शकते.
या करारामुळे, भारताचे रशियावरील अवलंबत्व कमी होईल, जिथे पुरवठा साखळीतील अडचणी आणि देखभाल समस्यांमुळे आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली होती. यासंदर्भात CAG (Comptroller and Auditor General) ने MiG-29K च्या कार्यक्षमतेबाबत आधीच प्रश्न उपस्थित केले होते.
या करारामुळे भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्य आणखी दृढ होईल. तसेच भविष्यातील सहनिर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण, आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत औद्योगिक भागीदारीच्या संधीही खुल्या होतील.
Rafale-M ही भारतीय नौदलासाठी केवळ एक लढाऊ विमान नाही, तर ते एक ‘फोर्स मल्टिप्लायर’ (शक्ती दायक साधन) आहे, जे वाढत्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारताच्या सागरी वर्चस्वाला नवसंजीवनी देईल.
-Ravi Shankar