पंतप्रधान मोदींचा अर्जेंटिना दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्जेंटिना दौऱ्यात, भारत एका महत्त्वाच्या नवीन क्षेत्राकडे आपले लक्ष वळवणार आहे, ज्यामध्ये देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आवश्यक असलेल्या लिथियम आणि अन्य महत्त्वाच्या खनिजांचा साठा सुरक्षित करण्यावर भर दिला जाईल.
जागतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या “Lithium Triangle”चा मुख्य भाग असलेले अर्जेंटिना, या प्रयत्नात भारताचा एक प्रमुख भागीदार ठरणार आहे.
भारत-अर्जेंटिना संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने, पंतप्रधानांचा हा दौरा एक धोरणात्मक पाऊल मानला जात असून, ऊर्जा, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याबरोबरच महत्त्वाच्या खनिजांचा विषय चर्चेच्या अग्रभागी असेल.
अर्जेंटिनाच्या लिथियम संपत्तीवर भारताची नजर
अर्जेंटिनामध्ये जागतिक स्तरावर अजूनही न वापरले गेलेले लिथियमचे काही मोठे साठे आहेत, आणि त्याशिवाय सध्या तेथे 50 पेक्षा अधिक खाण प्रकल्प (माईनिंग प्रोजेक्ट) विकासाच्या टप्प्यात आहेत. कॅटामार्का, साल्टा आणि जुजुय हे प्रांत “लिथियम ट्रँगल”च्या मध्यभागी असून, जगातील सुमारे दोन तृतीयांश लिथियम साठे येथे आहेत. लिथियम ही इलेक्ट्रिक वाहने आणि नवीकरणीय ऊर्जा संचयनासाठी बॅटऱ्या तयार करण्यासाठी अत्यावश्यक आहे.
भारताने आधीच, या खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या प्रदेशाशी याबाबत संवाद सुरू केला आहे. ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) ने ‘क्रिटिकल मिनरल्स डिव्हिजन’ तयार केला असून अलीकडेच अर्जेंटिना, चिली आणि बोलिविया येथे एक शिष्टमंडळ पाठवले आहे. OIL, कोल इंडिया आणि ONGC विदेश यांच्यासह लिथियम ब्लॉक्ससाठी औपचारिक बोलीसाठी तयारी करत आहे.
कॅटामार्कामध्ये KABIL आघाडीवर
भारताची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी- ‘खनिज बिदेश इंडिया लिमिटेड (KABIL)’ या क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यांनी कॅटामार्का प्रांतीय सरकारसोबत सामंजस्य करार (MoU) केला असून, यात लिथियमसाठीच्या पाच संमती घेतल्या आहेत.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) पी. कुमारन यांच्या मते, “KABIL आणि कोल इंडिया लिमिटेड यांनी अर्जेंटिनामध्ये एकत्रितपणे चार संमती घेतल्या आहेत. ते कॅमिएन (CAMYEN) या प्रांतीय सार्वजनिक उपक्रमासोबत काम करत असून, हे प्रकल्प विकसित करून त्यातून लिथियम भारतात आणण्याचा उद्देश आहे.”
ते पुढे म्हणाले की, “भारत- लिथियम ट्रँगलमध्ये येणाऱ्या चिली, बोलिविया आणि पेरू या इतर देशांशी देखील संवाद साधत आहे, जेणेकरून लिथियम, मॉलिब्डेनम आणि इतर हरित उत्पादनांसाठी महत्त्वाच्या खनिजांच्या खाण हक्कांवर कार्य करता येईल.”
खाजगी क्षेत्रही शर्यतीत उतरले
फक्त सार्वजनिक उपक्रमच नव्हे, तर खाजगी भारतीय कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आहेत. सचिव कुमारन यांनी सांगितले की, ‘ग्रीन कॉरिडोअर आणि वर्ल्ड मेटल अलॉईज (यूएईतून चालवली जाणारी भारतीय कंपनी) यासारख्या कंपन्यांनीही या क्षेत्रात पावले टाकली आहेत.’
“खासगी क्षेत्राने देखील एक संमती घेतली आहे,” असे त्यांनी सांगितले आणि इतर भारतीय कंपन्या अर्जेंटिनामधील लिथियम खाण आणि शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये भागीदारीसाठी चर्चा करत असल्याचे नमूद केले. “या संदर्भात अधिक तपशील लवकरच शेअर करता येतील, अशी अपेक्षा आहे,” असेही ते म्हणाले.
अलीकडील घडामोडी
फेब्रुवारी महिन्यात, कॅटामार्काचे राज्यपाल राउल जलिल यांनी नवी दिल्लीला भेट दिली आणि KABIL, MECL आणि कोल इंडिया यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, ज्यामुळे खाण सहकार्य आणखी दृढ होण्याची अपेक्षा आहे.
सध्या अर्जेंटिनामध्ये दोन सक्रिय लिथियम खाणी आहेत—साल्टा येथील लिवेंट संचालित फेनिक्स खाण आणि कॅटामार्का येथील एफएमसी लिथियम संचालित हॉम्ब्रे मुएर्तो खाण. अर्जेंटिनाच्या खाण कंपन्यांच्या चेंबरनुसार (CAMAR), 14 हून अधिक लिथियम प्रकल्प प्रगत टप्प्यावर आहेत, आणि एकूण 50 पेक्षा अधिक प्रकल्प विकासाच्या टप्प्यात आहेत.
भारत सध्या ‘ऊर्जा विविधीकरण आणि पुरवठा सुरक्षिततेसाठी’ जोरदार प्रयत्न करत असल्याने, पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अर्जेंटिनाच्या परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या इच्छेचा आणि भारताच्या वाढत्या लिथियम, दुर्मीळ खनिजे आणि स्वच्छ ऊर्जा घटकांची गरज यांचा संगम भविष्यातील आर्थिक व धोरणात्मक संबंध मजबूत करण्यास मदत करू शकतो.
by- हुमा सिद्दकी