नुकतेच, लेबनॉनमधील युनायटेड नेशन्सच्या अंतरिम दलामध्ये (UNIFIL) सेवा देणाऱ्या, भारतीय लष्कराच्या दोन बटालियनमधील कमांडचे औपचारिक हस्तांतरण झाले.
मद्रास रेजिमेंटच्या जवानांचा समावेश असलेल्या INDBATT XXV दलाने, UNIFIL च्या पूर्व सेक्टरमधील बटालियन मुख्यालयात आयोजित एका औपचारिक कार्यक्रमात, ग्रेनेडियर्स रेजिमेंटच्या INDBATT XXVI दलाकडे सर्व अधिकार अधिकृतपणे हस्तांतरित केले.
नव्याने रुजू होणाऱ्या INDABATT XXVI ने, आता संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार नव्या निर्धारासह कमांड स्विकारली आहे. विशेष म्हणजे, यात भारताच्या संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे, ज्याअंतर्गत लेबनॉनमधील भारतीय बटालियनमध्ये प्रथमच एक ‘फीमेल एंगेजमेंट टीम’ (FET)’ तैनात करण्यात आली आहे. FET चा समावेश, हा भारताच्या जेंडर इक्वॉलिटीला असलेल्या ठाम पाठिंब्याचे प्रतीक असून, महिलांमध्ये शांती व सुरक्षेबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव क्रमांक 1325 च्या अंमलबजावणीचा एक भाग आहे.
हा कार्यक्रम सैनिकी शिस्तीत पार पडला. यामध्ये संचलन, औपचारिक ध्वज हस्तांतरण आणि ड्रिल सादरीकरण यांचा समावेश होता, ज्यातून भारतीय लष्कराच्या व्यावसायिकतेचे दर्शन घडले.
या कार्यक्रमाला UNIFIL चे वरिष्ठ अधिकारी, ज्यामध्ये सेक्टर ईस्ट कमांडर ब्रिगेडियर जनरल रिकार्डो एस्टेबान काब्रेजोस, तसेच लेबनीज सशस्त्र दलांचे (LAF) प्रतिनिधी, स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि समुदाय प्रमुख उपस्थित होते. ही बाब भारतीय शांतता सैनिक आणि स्थानिक लोकांमधील दृढ भागीदारी दर्शवते.
गेल्या वर्षभरात INDBATT XXV ने, आपल्या शिस्तबद्ध कामकाज आणि समुदायाशी उत्तम सहकार्यामुळे प्रशंसा मिळवली आहे. त्यांच्या योगदानामध्ये रोजची गस्त, मानवतावादी मदत आणि UNIFIL च्या सिव्हिल-मिलिटरी कोऑपरेशन (CIMIC) फ्रेमवर्क अंतर्गत नागरी लोकांशी सातत्यपूर्ण समन्वय यांचा समावेश होता. भारतीय लष्कराच्या प्रयत्नांनी स्थानिक स्थिरतेला मोठा हातभार लागला आणि UN च्या नेतृत्वासह स्थानिक हितधारकांकडूनही कौतुक झाले.
FET (फीमेल एंगेजमेंट टीम) स्थानिक महिलांशी संवाद वाढविणे आणि समुदायांमध्ये समावेशी संवाद व परस्पर विश्वास निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. यामुळे शांतता राखण्याच्या मोहिमांची परिणामकारकता आणि पोहोच दोन्ही वाढेल.
ब्रिगेडियर जनरल काब्रेजोस यांनी, दोन्ही बटालियनच्या अढळ व्यावसायिकतेचे आणि त्यांनी स्थानिक लोकांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासाचे कौतुक केले. INDBATT XXVI आपल्या पूर्वसुरींनी निर्माण केलेल्या उत्कृष्टतेच्या परंपरेला यशस्वीपणे पुढे नेत राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भारत जागतिक स्तरावर UN शांतता मोहिमांमध्ये, सर्वाधिक लष्करी योगदान देणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि लेबनॉनमधील त्याचे सातत्यपूर्ण नेतृत्व आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी त्याच्या चिरस्थायी वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
टीम भारतशक्ती