मंगोलियातील Multinational Military सरावात भारताचा सहभाग

0

भारताच्या संरक्षण मुत्सद्देगिरीला आणि जागतिक शांतता राखण्याच्या वचनबद्धतेला चालना देत, भारतीय सैन्याची एक तुकडी मंगोलियामध्ये दाखल झाली आहे. याठिकाणी आयोजित ‘Khaan Quest 2025’ या Multinational Military सरावात हे सैनिक सहभागी होणार असून, 14 ते 27 जून दरम्यान मंगोलियाची राजधानी उलानबाटर येथे तो पार पडणार आहे.

हा सराव, संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आला असून, तो सध्याच्या भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. विशेषतः चीनच्या संदर्भात, जो भारताच्या मंगोलियामधील वाढत्या लष्करी उपस्थितीकडे अस्वस्थपणे पाहत आहे.

बहुराष्ट्रीय सहकार्य आणि स्त्री-समावेशकतेला चालना

भारतीय लष्कराच्या तुकडीत एकूण 40 सैनिक आहेत, जे मुख्यत्वे कुमाऊँ रेजिमेंटमधून आहेत. विशेष बाब म्हणजे, या तुकडीत एका महिला अधिकारीसह दोन महिला सैनिकांचाही समावेश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लष्करी उपक्रमांमध्ये स्त्री-समावेशकतेबाबत भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार झाला आहे.

Khaan Quest सराव, यंदा आपल्या 22व्या आवृत्तीत दाखल झाला आहे. या सरावाची सुरुवात 2003 मध्ये, अमेरिका आणि मंगोलिया यांच्यातील द्विपक्षीय सरावाच्या रुपाने झाली होती. मात्र, 2006 पासून तो एक बहुराष्ट्रीय उपक्रम बनला आहे. हा सराव आता संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत (Chapter VII) नमूद केलेल्या शांतता मिशनसाठी, देशांना परस्पर सहकार्य करण्याचे व्यासपीठ प्रदान करतो.

वास्तविक शांतता राखण्याची परिस्थिती

या सरावामध्ये सहभागी देशांचे सैनिक अत्यंत दबावपूर्ण परिस्थितींमध्ये प्रशिक्षण घेतील, ज्यामध्ये स्थिर व हालचाल करणारे तपासणी नाके, गस्त घालणे, शोधमोहीम व प्रतिबंध कार्यवाही, आयईडी (स्फोटके) शोधणे व निकामी करणे, आणि जखमी सैनिकांवर उपचार अशा गोष्टींचा समावेश आहे. या उपक्रमामुळे एकत्रित कृतीक्षमता आणि जलद प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होईल.

धोरणात्मक संदर्भ: भारताचा विस्तार आणि चीनचे मौन निरीक्षण

जरी चीन या सरावाचा थेट भाग नसला तरी, मंगोलिया हे चीन आणि रशिया यांच्यामधील भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असल्यामुळे त्याचा प्रभाव जाणवतो. उलानबातरसोबत भारताचे वाढते संरक्षण सहकार्य हे भारताच्या ‘Act East’ धोरणाचा भाग मानले जात आहे, ज्याचे उद्दिष्ट म्हणजे हिंद-प्रशांत क्षेत्रातील सामरिक संबंध मजबूत करणे.

सध्या सुरू असलेला हा सराव, नुकत्याच 13 जूनला संपलेल्या Exercise Nomadic Elephant च्या पाठोपाठ आयोजित करण्यात आला आहे. हा भारत-मंगोलिया द्विपक्षीय सराव असून, तो दोन्ही देशांमध्ये पर्यायी पद्धतीने होतो. या सरावामध्ये विशेषतः उंच प्रदेशातील आणि अर्धनगरी युद्ध प्रशिक्षणावर भर दिला जातो, जे भारताच्या हिमालयीन सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

मानवी संवेदना असलेली संरक्षण मुत्सद्देगिरी

सामरिक प्रशिक्षणाच्या पलिकडे जाऊन, हे सराव सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि लोकांमधील परस्परसंबंध दृढ करतात. यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या बहुराष्ट्रीय शांतता मिशनमध्ये सहकार्य वाढवण्यास मोठी मदत होते.

एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्याने या सरावाचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की: “हे सराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्वजाखाली वास्तविक परिस्थितीचे अनुकरण करतात. आमचे सैनिक केवळ सामरिक तयारी सुधारत नाहीत, तर विविध लष्करी सिद्धांतांनुसार, गुंतागुंतीच्या परिस्थितीत एकत्र काम कसे करावे हेही शिकतात.”

जसजसे जागतिक सुरक्षेचे स्वरूप अधिकाधिक बहुध्रुवीय (multipolar) होत आहे, तसतशी उलानबातर ही शांत पण महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी जागा म्हणून उदयाला आली आहे, जिथे पुढील पिढीतील लष्करी सहकार्य आणि मुत्सद्देगिरी घडवून आणली जात आहे.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleIndonesia Picks Turkish KAAN Fighter Jets Over India’s LCA Tejas
Next articleLAC वरील पायाभूत सुविधा आता भारताच्या चीन धोरणाचा केंद्रबिंदू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here