इराणच्या आण्विक आणि लष्करी लक्ष्यांवर इस्रायलने केलेल्या अभूतपूर्व लष्करी हल्ल्यांनंतर उभय देशांमधील तणावाचे आता उघडपणे संघर्षात रूपांतर झाले आहे. त्यामुळे भारताने तीव्र चिंता व्यक्त करत तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय दोन्ही देशांना संघर्षापेक्षा राजनैतिकतेने प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे.
शुक्रवारी, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एक औपचारिक निवेदन जारी केले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, ते “इराण आणि इस्रायलमधील अलीकडील घडामोडींबद्दल गंभीरपणे चिंतित आहेत” आणि दोन्ही पक्षांना “कोणतीही तणावपूर्ण पावले टाळण्याचे” आवाहन केले आहे. परिस्थितीतील तणाव कमी करण्यासाठी आणि मूळ समस्या सोडवण्यासाठी “संवाद आणि राजनैतिकतेच्या विद्यमान माध्यमांचा” वापर करण्याची गरज या निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.
तेहरान आणि तेल अवीव या दोन्ही देशांशी धोरणात्मक संबंध राखणाऱ्या भारताने शांतता प्रयत्नांना “शक्य तो सर्व प्रकारचा पाठिंबा देण्याची” तयारी पुन्हा व्यक्त केली आहे. त्याच वेळी, तेहरान आणि तेल अवीवमधील भारतीय दूतावासांनी भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि वाढत्या शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जारी केले आहेत.
Operation Rising Lion: आतापर्यंत हाती आलेली माहिती
शुक्रवारी पहाटे, इस्रायलने Operation Rising Lion सुरू केले. ही एक व्यापक आणि समन्वित लष्करी मोहीम होती जी इराणच्या आण्विक पायाभूत सुविधा आणि क्षेपणास्त्र विकास सुविधांच्या प्रमुख घटकांना लक्ष्य करणारी होती. 1980 च्या इराण-इराक युद्धानंतर इराणी भूमीवर झालेल्या या हल्ल्यांचे वर्णन सर्वात महत्त्वाचा लष्करी हल्ला म्हणून केले जात आहे.
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की ही मोहीम “इस्रायलच्या अस्तित्वाला असलेल्या इराणी धोक्याला मागे टाकण्यासाठी करण्यात आलेली लक्ष्यित लष्करी कारवाई होती”, तसेच हे हल्ले “आवश्यक तितके दिवस चालू राहतील” असे त्यांनी सांगितले.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे (IDF) प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी जाहीर केले की या लष्करी कारवाईत अनेक महत्त्वाच्या उच्च-मूल्य असलेल्या प्रतिष्ठानांना यशस्वीरित्या लक्ष्य केले गेले. यामध्ये नतान्झ अणुसंवर्धन सुविधा तसेच तेहरान, इस्फहान, अरक, केरमानशाह, तब्रिझ आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये असणाऱ्या क्षेपणास्त्र विकास आणि कमांड सेंटरचा समावेश होता.
इराणी सैन्याचे मोठे नुकसान, वरिष्ठ कमांडर ठार
इस्रायली हल्ल्यात अनेक वरिष्ठ लष्करी आणि अणुऊर्जा क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मृत्युची इराणने पुष्टी केली आहे. मृतांमध्ये:
- इराणच्या सशस्त्र दलांचे प्रमुख जनरल मोहम्मद बघेरी
- इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) कमांडर-इन-चीफ मेजर जनरल हुसेन सलामी
- आयआरजीसीच्या एरोस्पेस विभागाचे प्रमुख सरदार अमीर अली हाजीजादेह
- ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. फेरेदून अब्बासी
- ज्येष्ठ अणुभौतिकशास्त्रज्ञ डॉ. मोहम्मद तेहरानची
- खातम अल-अंबिया मुख्यालयाचा कमांडर सरदार रशीद
याव्यतिरिक्त, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे वरिष्ठ सल्लागार अली शामखानी गंभीर जखमी झाले आहेत. इराणी राज्य माध्यमांनी वृत्त दिले आहे की तेहरानमधील निवासी भागांवर झालेल्या हल्ल्यात 20 हून अधिक वरिष्ठ कमांडर ठार झाले आणि 50 हून अधिक जण जखमी झाले, ज्यात काही नागरिकांचाही समावेश आहे.
इराणचे ड्रोन्सच्या मदतीने प्रत्युत्तर, प्रतिशोध घेण्याची प्रतिज्ञा
हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायली हवाई क्षेत्राला लक्ष्य करून 100 हून अधिक ड्रोन सोडले – इराण-इस्रायल संघर्षाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हवाई प्रतिसाद होता. जॉर्डनमधील इस्रायली आणि प्रादेशिक हवाई संरक्षण प्रणालींनी येणाऱ्या अनेक ड्रोन्सना रोखले, ज्यांचे लक्ष्य “इस्रायली सीमेपलीकडे” पर्यंत पसरले होते, असे आयडीएफने म्हटले आहे.
इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांनी कोममधील जमकरन मशिदीवर प्रतिशोधाचा प्रतीकात्मक लाल झेंडा फडकवला, ज्याचा अर्थ व्यापकपणे युद्धाची घोषणा म्हणून लावला जातो.
“या हल्ल्यांमुळे, झिओनिस्ट राजवटीने स्वतःला कटू आणि वेदनादायक प्रतिशोधाच्या मार्गावर उभे केले आहे,” असे खामेनी यांनी इशारा दिला. इराणी लष्कराचे प्रवक्ते अबोलफझल शेकार्ची म्हणाले, “इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल.”
भारताची राजनैतिक बांधिलकी
भारताने तटस्थता आणि राजनैतिकतेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असे नमूद केले आहे की त्यांचे दूतावास “भारतीय समुदायाशी सतत संपर्कात” आहेत आणि परिणामांवर, विशेषतः आण्विक पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक स्थिरतेला होणाऱ्या कोणत्याही धोक्यांवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने एक्सवर (पूर्वी ट्विटर) टाकलेल्या पोस्टमध्ये भारतीय नागरिकांना “घरी राहून आपत्कालीन तयारी करून ठेवा” असे आवाहन केले. तेल अवीवमधील भारतीय दूतावासानेही अशीच सूचना जारी केली.
भारतीय धोरणात्मक तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की दीर्घकाळ चालणारा संघर्ष आखाती प्रदेशात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या 8 दशलक्षांहून अधिक भारतीयांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतो. त्याचबरोबर भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि पर्शियन आखातातील शिपिंग मार्गांनाही धोका निर्माण करू शकतो.
ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली, मात्र अमेरिकेने हात झटकले
ट्रुथ सोशलवरील एका प्रक्षोभक पोस्टमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली कारवाईची त्यांना पूर्वकल्पना असल्याचा दावा केला. “काही इराणी कट्टरपंथी धाडसीपणे बोलले पण काय होणार आहे हे त्यांना माहित नव्हते. ते सर्व आता ठार झाले आहेत आणि परिस्थिती आणखी बिकट होईल,” असे त्यांनी लिहिले आणि इराणला “खूप उशीर होण्यापूर्वीच ते करा” असे आवाहन केले.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले की अमेरिका या हल्ल्यांमध्ये सहभागी नव्हती परंतु त्यांना पूर्व कल्पना मिळाली होती. “आमची प्राथमिकता या प्रदेशातील अमेरिकन सैन्याचे संरक्षण करणे आहे,” असे त्यांनी सांगितले आणि इराणला अमेरिकन कर्मचाऱ्यांना किंवा सुविधांना लक्ष्य न करण्याचा इशारा दिला.
आण्विक सुविधांना नुकसान झाल्याची पुष्टी
इराणच्या अणुऊर्जा संघटनेने नतान्झ समृद्धीकरण सुविधेच्या काही भागांचे नुकसान झाल्याचे मान्य केले परंतु कोणत्याही प्रकारची रेडिएशन गळती होत असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. IAEA चे महासंचालक राफेल ग्रोसी यांनीही हल्ल्याची पुष्टी केली आणि सांगितले की एजन्सी इराणी अधिकारी तसेच घटनास्थळी असणाऱ्या निरीक्षकांच्या संपर्कात आहे.
तब्रिझ, अरक, केरमानशाह आणि इस्फहानमधील संवेदनशील लष्करी आणि अणु संशोधन केंद्रांजवळही स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
जागतिक प्रतिक्रिया उमटल्या : संयमाचे आवाहन
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी “जास्तीत जास्त संयम” बाळगण्याचे आवाहन केले. मात्र इशाराही दिला की हल्ल्यांमध्ये आणखी वाढ झाल्यास व्यापक प्रादेशिक संघर्ष पेटू शकतो. इराण-अमेरिका चर्चेतील प्रमुख मध्यस्थ ओमान यांनी इस्रायली हल्ल्यांचा निषेध “बेपर्वा वाढ” आणि “आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन” म्हणून केला.
Operation Rising Lion बाबतची माहिती उघड होत असताना, जागतिक समुदाय याकडे सावधगिरीने पाहत आहे. भारतासाठी, केवळ प्रादेशिक भू-राजकीय संतुलन राखण्यासाठीच नव्हे तर पश्चिम आशियातील आपल्या कोट्यवधी नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देखील हा एक विलक्षण मोठा प्रश्न आहे.
इस्रायल स्वसंरक्षणाच्या अधिकारावर आग्रह धरत असताना आणि इराण प्रतिशोध घेण्याचे आश्वासन देत असताना, नवी दिल्लीचा संदेश स्पष्ट आहे: तणाव कमी करणे, मुत्सद्देगिरी आणि संवाद हेच केवळ स्वीकारार्ह मार्ग आहेत.
टीम भारतशक्ती