भारताच्या पाकिस्तान समस्येबद्दल एक निराशाजनक तथ्य आहेः की यावर कोणताही तोडगा दिसत नाही, किंवा विजय साध्य झाला आहे या आत्मविश्वासाने भारत या समस्येपासून दूर जाऊ शकेल असेही नाही. माजी जीओसी 15 कॉर्प्स लेफ्टनंट जनरल अता हसनैन यांनी दिल्लीत झालेल्या चर्चेत याबाबतचा सारांश थोडक्यात मांडला.
“आपण राजकीयदृष्ट्या खूप चांगले काम करत राहू शकतो, आपण आर्थिकदृष्ट्या खूप चांगले काम करत राहू शकतो, आपण काश्मीरमधील आर्थिक क्षमतेत 11 टक्के वाढ करू शकतो, परंतु शेवटी, लष्करीदृष्ट्या, आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण शेवटी साध्य केले आहे का?”
ठार झालेल्या अतिरेक्यांची संख्या पुरेशी नाही, असा इशारा त्यांनी दिला. भारताने 2001 मध्ये 2,100 दहशतवाद्यांना ठार केले; गेल्या वर्षी 85 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यामागे खरेतर कोणतेही ठोस कारण नव्हते. पण तरी हे एक मोठे यश आहे. अर्थात प्रत्येक परिस्थितीत विजय मिळवता येत नाही. संघर्षविराम साध्य झाला आहे, परंतु संघर्ष निराकरण आणि संघर्ष समाप्तीच्या दृष्टीने पुढील हालचाली दूरपर्यंत क्षितिजावर कुठेच दिसत नाहीत.
प्रशिक्षण शिबिरे आणि प्रक्षेपण केंद्रांसह पाकिस्तानची अप्रत्यक्ष युद्धाची रचना अजूनही अबाधित आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कलम 370 हटवून जम्मू आणि काश्मीरची स्थिती बदलण्याच्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानला प्रासंगिक राहण्यासाठी काहीतरी करण्यास भाग पाडले. त्यामुळे संकटाला चिथावणी देणे, आंतरराष्ट्रीय लक्ष वेधणे, काश्मीरला संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यावर परत आणणे आणि भारताला आक्रमक म्हणून चित्रित करणे हा उद्देश डोक्यात ठेवून पहलगाम हल्ला झाला.
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला आश्चर्यचकित केले असले तरी ते त्यामुळे थांबणारे नाही आणि काश्मीरमध्ये नेहमीच असे काही घटक आहेत जे त्यांना मदतीचा हात देत राहतील.
माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राजदूत पंकज सरन यांनी परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तान डेस्कदेखील हाताळला होता, त्यांच्या मते हे स्पष्ट आहे की रावळपिंडीतील सेनापती भारताला त्रास देण्याचे अनेक अपारंपरिक मार्ग शोधून काढतील.
त्याची दोन्ही साधने-दहशतवाद आणि आण्विक संकेत-कमकुवत होत आहेत. त्यामुळे ते आणखी उत्क्रांत होतील. “संभाव्य केंद्रांमध्ये अंमली पदार्थांचे जाळे, सायबर युद्ध, भारताच्या अंतर्गत दोष रेषांचा गैरवापर, अंतराळ-आधारित पाळत ठेवणे आणि अगदी डिजिटल चलनांचाही समावेश आहे.”
“पारंपरिक युद्धापासून ग्रे झोन डावपेचांकडे झालेले हे मोठे बदल आहेत, ज्याचे मूळ हेच आहे की भारत गिळण्यासाठी खूप मोठा राक्षस आहे.(भारतावर कब्जा करणे ही खूप मोठी गोष्ट आहे). त्यामुळे मोदी-मुनीर यांच्या भेटीची कल्पना अवास्तव आहे.
किमान सध्या तरी भारत पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारच्या मुत्सद्देगिरीचा विचार करत नाही. ऑपरेशन सिंदूर हे केवळ दंडात्मक नव्हते-ते निदानात्मक होते असे त्यांचे मत आहे.
“पाकिस्तानी सैन्याची लायकी किती आहे ते आपण शोधून काढले,” असे ते म्हणाले. “आपल्याला चीन-पाकिस्तान लष्करी-गुप्तचर संयोजनाचे स्पष्ट चित्र देखील मिळाले आणि भारत आणि पाकिस्तानबाबत अमेरिकेची भूमिकाही उघड झाली आहे. आपल्या दृष्टीने ही एक चांगली वास्तवता तपासणी होती. प्रत्यक्ष त्यावेळी काय घडत आहे याच्याविरुद्ध आपल्या गृहितकांची चाचणी घेणे महत्वाचे आहे.”
पण पाकिस्तानबरोबरचे भवितव्य आता अधिक लष्करी आणि अधिक कठोर तयारी करण्याबद्दल आहे. जे. एन. यू. मधील आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे अधिष्ठाता प्राध्यापक अमिताभ मट्टू म्हणतात की भारताने केवळ सूड उगवायचा या भावनेच्या पलीकडे जायला हवे. त्यात उद्देशाची सुसंगतता दिसून आली पाहिजे.
दहशतवाद हे आता कमी खर्चाचे धोरण राहिलेले नाही हे आपल्याला दाखवून द्यावे लागेल. दुर्दैवाने, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवरून असे सूचित होते की ते ऑपरेशन सिंदूरमधून कोणतेही धडे शिकले नाहीत.
म्हणूनच, भारताचा प्रतिसाद प्रतीकात्मकतेपेक्षा अधिक असायला हवा, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. “पहलगाममध्ये सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे परिणाम दाखवून द्यायलाच हवेत – मग ते क्षेपणास्त्र माऱ्यात असो, आपल्या स्मरणात असो किंवा लष्करी आदेशात. भारताला युद्ध नको आहे. पण तो सावधगिरीला बळीही पडणार नाहीत.
जर पाकिस्तानची रणनीती भारताला रक्तबंबाळ करण्याची असेल तर भारताचा नवीन संदेश असा आहेः रक्तबंबाळ होण्याचे युग संपले आहे. आता हिशेब चुकते करण्याचे युग सुरू झाले आहे.”
ऐश्वर्या पारीख