वेगवान आणि अनेकदा गुंतागुंतीच्या घडामोडींच्या जगात धोरणात्मक संवादाचे महत्त्व आणि मूल्य यावर भर देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन म्हणतात, “आजच्या जगात तुम्ही याबाबतीत मागे राहूच शकत नाही.”
जगातील अनेक देशांमधील भारताचे राजदूत विविध टीव्ही चॅनेल्सवर पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतरच्या घडामोडींबद्दल त्यांच्या यजमानांना माहिती देताना दिसत आहेत. या संदर्भात अकबरूद्दीन स्ट्रॅटन्यूजग्लोबलशी बोलत होते.
अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे ते म्हणाले, परंतु जेव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितीबद्दल एकंदर स्पष्टता असते तेव्हा ती मदत करणारी ठरते. त्यामुळे भारताचे राजदूत आत्मविश्वासाने बोलू शकतात आणि चुकीची किंवा तिरकस माहिती अथवा विचार कसे चुकीचे आहेत ते स्पष्ट करून सांगू शकतात.
“पूर्वी अनेकदा अशा माहितीतील स्पष्टतेचा अभाव असायचा. जर घटनेबद्दल स्पष्टता नसेल तर राजदूताला माहिती देणे कठीण होऊ शकते कारण, त्यांना आपल्या देशाची भूमिकाच माहित नाही असा अर्थ त्यातून काढला जाऊ शकतो,” असे अकबरुद्दीन म्हणाले.
या प्रकरणात, भारताने 7 मे रोजी दहशतवादी ठिकाणांवर हल्ला का केला याचीच केवळ माहिती प्रसारित केली नाही, तर कोणत्याही लष्करी पायाभूत सुविधांना यावेळी लक्ष्य केले नसल्याचे देखील सूचित केले होते. त्यांना तणाव वाढावा यात काडीचाही रस नव्हता परंतु पाकिस्तानच्या चिथावणीला प्रत्युत्तर देणे – जे त्यांनी केले – यात होता.
“पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यांचे महत्त्व खूप मोठे होते,” असे प्रवक्त्याच्या कार्यालयात काम केलेल्या आणखी एका माजी राजदूताने सांगितले. “म्हणून माध्यमांना काय सांगायचे याच्या सूचना दिल्लीतील परराष्ट्र खात्याच्या मुख्यालयातील संबंधित प्रादेशिक विभागांमधून सर्व भारतीय दूतावासांना दिल्या गेल्या असाव्यात.”
याचे प्रत्यंतर भारताचे नुकतेच इस्रायलमध्ये नियुक्त झालेले राजदूत जेपी सिंग यांनी स्थानिक टेलिव्हिजन चॅनेल आय24न्यूजला मुलाखत दिली तेव्हा आले. ऑपरेशन सिंदूरमागचे कारण स्पष्ट करताना, त्यांना पाकिस्तानला जाणारा सिंधू पाण्याचा प्रवाह थांबवण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल देखील विचारण्यात आले.
“गेल्या अनेक वर्षांपासून, आपण पाणीचा प्रवाह पाकिस्तानात जाईल याकडे लक्ष देत होतो. पण पाकिस्तान काय करत होता, ते दहशतवाद्यांना भारतात येऊ देत होते… या (पहलगाम) हल्ल्यानंतर आपले पंतप्रधान म्हणाले होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.”
त्याच स्पष्टतेमुळे जेपी सिंग यांना भारत आणि इस्रायल दहशतवादाविरुद्ध एकत्र कसे लढू शकतात याबद्दल वृत्त निवेदकाने विचारलेल्या एका प्रमुख प्रश्नाला उत्तर देता आले.
“दहशतवादावर, केवळ भारत आणि इस्रायलच नाही तर दहशतवादाचा सामना करणाऱ्या सर्व देशांनी एकत्र यावे. आम्ही हा सीमापार दहशतवाद स्वीकारणार नाही. आम्ही पुढे जाऊन जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दोन मुख्य गटांना आणि त्यांच्या प्रॉक्सींना नष्ट करू,” असे ते म्हणाले.
दहा दिवसांपूर्वी, भारताचे युकेमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी स्कायन्यूजवर पाकिस्तानी कसे काम करतात याबद्दल एक साधा मुद्दा मांडला होता.
“2016 मध्ये पठाणकोट हल्ल्यानंतर, आम्ही त्यांना हल्ला झालेल्या भारतीय हवाई दलाच्या तळावर अभूतपूर्व प्रमाणात प्रवेश देऊ केला. डी. एन. ए. चे नमुने, दूरध्वनी नोंदी, संपूर्ण कामे. हा एक संयुक्त तपास असणार होता, पण आम्हाला त्याच्या दुसऱ्या भागात कधीही आमंत्रित केले गेले नाही,” याकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले.
त्यांच्या आधी, अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी सीबीएस न्यूजला सांगितले की, “पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देण्याचा दीर्घ इतिहास आहे, केवळ भारताला लक्ष्य करून सीमेपलीकडून होणारा दहशतवादच नाही तर जगाच्या इतर भागांना लक्ष्य करून होणारा दहशतवादाचा देखील यात समावेश आहे.”
ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधील जनतेनेही ऑपरेशन सिंदूरबाबत तिथल्या भारताच्या राजदूतांना माध्यमांमधून भूमिका मांडताना पाहिले आणि ऐकले. कळीचा मुद्दा हा आहे की बीजिंगमधील राजदूत प्रदीप कुमार रावत यांना त्यांच्या देशाचे विचार मांडण्याची संधी मिळेल का ते पाहणं.
चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे आणि पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा चीनकडून केला जातो हे लक्षात घेता हे खूपच अशक्य आहे.
परंतु हे अकबरूद्दीन यांनी या मुद्द्यावर जोर दिला आहे की “सार्वजनिक संवादाला पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व दिले जात असून धोरणात्मक संवाद ही स्वतःच एक कला आहे.”
परराष्ट्र सेवेतील तरुण प्रोबेशनर्सना माध्यमांना कसे हाताळायचे याबद्दल काही सूचना मिळतात, परंतु अकबरूद्दीन असा युक्तिवाद करतात की संयुक्त सचिव/राजदूत दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्या कौशल्यांमध्ये प्रवीण असले पाहिजे. भारत जागतिक स्तरावर जसजसा वर येईल तसतसे त्याच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पूर्वी कधीही न पाहिलेल्या चाचणीला सामोरे जावे लागेल आणि एखादी व्यक्ती किती चांगली संवाद साधते हे विजय आणि पराजय यांच्यात जो फरक आहे तसा फरक पाडू शकते.
सूर्या गंगाधरन