नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस, यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या हंगामी सरकारने, भारताने Land Port Imports वर घातलेल्या नव्या निर्बंधांनंतर उद्भवलेल्या व्यापार तणावाचा तोडगा शोधण्याची मागणी केली आहे.
शनिवारी, भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने, विदेश व्यापार महासंचालनालयाच्या (DGFT) निर्देशांवर आधारित निर्बंध लागू केले.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, बांगलादेशच्या हंगामी सरकारचे वाणिज्य सल्लागार शेख बशीर उद्दीन यांनी, सचिवालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “भारताकडून याविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.”
“आम्हाला अधिकृत माहिती मिळाल्यानंतर आम्ही योग्य पावले उचलू. दरम्यान, कोणतीही अडचण उद्भवली तर दोन्ही देशांनी संवाद साधून त्यावर तोडगा काढावा,” असे त्यांनी United News of Bangladesh (UNB) या संस्थेला सांगितले.
बशीर उद्दीन यांनी सांगितले की, माध्यमे आणि सोशल मीडिया द्वारे भारताने आखौरा, डावकी आणि इतर काही सीमावर्ती बंदरांवर व्यापार मर्यादित केल्याची माहिती मिळाली आहे.
निर्बंधांमुळे निर्यातीवरील संभाव्य परिणामाबद्दल विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की- ‘सर्वच क्षेत्रे प्रभावित झालेली नाहीत.’
त्यांनी नमूद केले की, “बांगलादेशचा वस्त्र उद्योग (garment industry) जो देशाच्या निर्यातीचा मुख्य भाग आहे, आजही भारतीय आयातदारांमध्ये मागणीमध्ये आहे.”
“भारताचा स्वतःचा मजबूत कापड उद्योग असतानाही, आमच्या उत्पादनक्षमतेमुळे ते आजही आमचे वस्त्र आयात करत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
व्यापार दोन्ही देशांच्या ग्राहक आणि उत्पादकांच्या हिताचे आहे, त्यामुळे व्यापार टिकून राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यापार तणाव वाढले
भारताच्या नवीन निर्बंधांमुळे, सुमारे 770 दशलक्ष डॉलर्सच्या मालावर परिणाम होणार आहे. या निर्बंधांतून वस्त्रे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, आणि प्लास्टिकसारख्या महत्वाच्या वस्तूंना स्थलसीमा मार्गाने प्रवेश नाकारण्यात आला आहे, काहींना समुद्रमार्गाने वळवण्यात आले आहे, तर काहींना थेट बंदी घालण्यात आली आहे.
ANI च्या माहितीनुसार, ‘भारताने ही कारवाई गेल्या काही महिन्यांतील बांगलादेशच्या व्यापारी निर्बंधांच्या प्रत्युत्तरात केली आहे.’
या निर्बंधांमध्ये: एप्रिल 2025 पासून- प्रमुख स्थलसीमा बंदरांवरून भारतीय सूत आयातीवर बंदी, तांदळाच्या आयातीवर कडक नियंत्रण, भारतीय कागद, तंबाखू, मासे आणि दूध पावडर यावर थेट बंदी यांचा समावेश आहे. याशिवाय, भारतीय मालवाहतुकीसाठी बांगलादेशने प्रति टन प्रति किमी 1.8 टाका ट्रांझिट फी लागू केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, ‘भारताची ही कारवाई बांगलादेशकडून वाढत्या व्यापार निर्बंधांबरोबरच, चीनसोबतच्या वाढत्या धोरणात्मक जवळीकीचे उत्तर आहे. हे धोरण बांगलादेशाला विभक्त ठेवण्यापेक्षा तंतोतंत उत्तर देण्याचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.’
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)