भारतीय सुरक्षा यंत्रणांनी, नुकतीच एक व्यापक प्रतिगुप्तचर मोहीम राबवत, पाकिस्तानच्या गुप्तहेर आणि सायबर कारवायांना दणका दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ पाठोपाठ, ‘Operation Ghost SIM’ या नवीन मोहिमेअंतर्गत भारताने पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना मदत करणाऱ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
ऑपरेशन घोस्ट सिम: सायबर हेरगिरीचा पर्दाफाश
‘Operation Ghost SIM’ अंतर्गत, भारतीय मोबाईल नंबर वापरुन पाकिस्तानी सायबर एजंटना- Fake WhatsApp अकाउंट्स पुरवणारे नेटवर्क उजेडात आले. ही व्हॉट्सअॅप अकाउंट्स- फिशिंग स्कॅम, सोशल इंजिनीयरिंग अटॅक्स आणि भारतीय लष्करी हालचालींबाबत माहिती गोळा करण्यासाठी वापरली जात होती. याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून, 948 सिम कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत, ज्यापैकी बहुतेक सिमकार्ड्स ही फर्जी कागदपत्रे आणि बनावट ओळखींच्या आधारे मिळवली गेली होती.
पाकिस्तानचे डिजिटल फसवणूकीचे जाळे उघड
ही मोहीम लष्करी गुप्तचर विभाग, आसाम पोलिसांची विशेष शाखा आणि विशेष कार्यबल (STF) यांच्या संयुक्त नेतृत्वात राबवण्यात आली. तपासात उघड झाले की, पाकिस्तानी एजंट भारतीय सिम कार्ड वापरून स्थानिक नागरिक असल्याचे भासवत होते. हे एजंट सामान्य नागरिकांशी संपर्क साधून, सरकारी किंवा लष्करी अधिकारी असल्याचे भासवून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. या फ्रॉडला बळी पडलेल्या अनेकांना असेच वाटत होते की, ते भारतातल्या अधिकाऱ्यांशी बोलत आहेत, पण प्रत्यक्षात हे कॉल पाकिस्तानातून येत होते.
अनेक राज्यांमध्ये छापे – सखोल कारवाई
आसाम, राजस्थान आणि तेलंगणामध्ये समन्वयित छापे टाकण्यात आले. फसवणुकीच्या शेकडो सिम कार्ड्स व्यतिरिक्त, अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांव्यतिरिक्त आणखी 15 जण सध्या तपासाच्या निगराणीखाली आहेत. अटक झालेल्यांमध्ये सादिक, साजिश, आरिफ खान, अकीक, मोहिजील आणि झकारिया हे मुख्य आरोपी म्हणून ओळखले गेले आहेत.
गुप्तहेरगिरीचे प्रयत्न उधळले
22 एप्रिल रोजी, पहलगाममध्ये 26 नागरिकांच्या हत्येनंतर, भारतीय लष्कराकडून संभाव्य कारवाईची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी हालचाली वाढवल्या होत्या. ISI एजंटनी, कँटोन्मेंट परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधून, सैन्य तैनाती आणि लॉजिस्टिक्सविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अगदी टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही, बनावट लष्करी अधिकारी असल्याचे सांगून संपर्क साधण्यात आला.
मात्र, सतर्क नागरिकांनी संशयास्पद कॉल्सबाबत तक्रार केल्याने, भारतीय गुप्तचर यंत्रणांना वेळेवर कारवाई करता आली आणि महत्त्वाची माहिती गळती होण्यापासून रोखली गेली.
देशभर अटकेचा धडका
ही मोहीम फक्त ईशान्य भारतापुरती मर्यादित राहिली नाही. भटिंडा येथील कँटोन्मेंट परिसरात एका पेशेवर टेलरला गुप्तहेरगिरीप्रकरणी अटक करण्यात आली. तर, जालंधरमध्ये मोहम्मद मुर्तजा अलीला पाकिस्तानी एजंटन्सना गोपनीय माहिती पुरवताना पकडण्यात आले. जबलपूरमध्ये दोन व्यक्तींना लष्करी ठिकाणाचा व्हिडीओ शूट करताना अटक करण्यात आली आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागातही अनेक अटकसत्रे झाली.
बळकट व बुद्धिमान प्रति-गुप्तचर धोरण
ही जलद आणि समन्वयित कारवाई भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या क्षमतेचा दाखला देते, जिथे मानव गुप्तचर, सायबर फॉरेन्सिक्स आणि विविध यंत्रणांमधील समन्वय हे सर्व घटक प्रभावीपणे एकत्र येतात. पाकिस्तानी सायबर एजंट डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत असताना, भारत त्यांच्या कारवायांवर अचूक आणि प्रभावी प्रहार करत आहे.
टीम भारतशक्ती