CDS आणि लष्करप्रमुखांची अग्रिम तळांना भेट; जवानांच्या शौर्याचे कौतुक

0
CDS

संयुक्ततेचा आणि तात्काळ कृतीक्षमतेचा ठाम संदेश देत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान आणि लष्करप्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी, यांनी आज पश्चिम सीमेवरील अग्रिम लष्करी तळांना भेट दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी जवानांचे विशेष अभिनंदन केले.

जनरल चौहान यांनी, रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या सूरतगढ लष्करी ठाणे आणि नलिया हवाई दल स्टेशनला भेट दिली. त्यांच्यासोबत साउथ वेस्टर्न कमांडचे आर्मी कमांडर- लेफ्टनंट जनरल मंजींदर सिंग आणि साउथ वेस्टर्न एअर कमांडचे एअर मार्शल- नागेश कपूर हे देखील उपस्थित होते. जनरल चौहान यांनी सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या शौऱ्याचे आणि उत्तम मनोबलाचे कौतुक केले आणि बदलत्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सतत सज्जतेचे महत्त्व अधोरेखित केले.

आपल्या भाषणात, सीडीएस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये लष्कर, वायुसेना आणि इतर घटकांमधील उत्कृष्ट समन्वयाचे विशेष कौतुक केले. वरिष्ठ कमांडर्ससोबत रणनीतिक चर्चा देखील करण्यात आली. त्यांना ऑपरेशनदरम्यान तैनात करण्यात आलेल्या प्रगत एअर डिफेन्स प्रणालींची माहिती देण्यात आली. (CDS) जनरल अनिल चौहान यांनी जवानांचे धैर्य, जलद प्रतिसाद आणि व्यावसायिक कौशल्याचे कौतुक करत, ठोस कृती आणि नागरी-सैन्य सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला.

दुसरीकडे, जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कोणार्क कोअरच्या अंतर्गत येणाऱ्या वाळवंट विभागातील महत्त्वाच्या लोंगेवाला पोस्टला भेट दिली, जिथे त्यांनी ऑपरेशनल कामगिरीचा आढावा घेतला आणि घुसखोरी रोखणाऱ्या जवानांचे अभिनंदन केले. त्यांनी लष्कर, भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्यातील समन्वयाचे कौतुक केले, ज्यामुळे जैसलमेर–कच्छ परिसरात देखरेखीच्या साधनांची आणि शस्त्र प्रणालींची जलद तैनाती शक्य झाली.

जवानांशी संवाद साधताना, लष्करप्रमुखांनी शत्रूचे ड्रोन निष्प्रभ करणे आणि आंतरराष्ट्रीय सीमेला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेले धैर्य, सतर्कता आणि समर्पण याचे कौतुक केले. त्यांनी कमांडर्सच्या नेतृत्वगुणांचेही अभिनंदन करत लष्कराच्या राष्ट्रीय सार्वभौमत्व रक्षणाच्या दृढ निश्चयाची पुनरावृत्ती केली.

ऑपरेशन सिंदूरनंतरचा उच्चस्तरीय दौरा

‘ऑपरेशन सिंदूर’ ही पश्चिम सीमेवरील शत्रूच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी राबवलेली व्यापक आणि समन्वयित कारवाई होती. या मोहिमेने लष्करी सेवा शाखांमधील एकात्मतेचे आणि सज्जतेचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

CDS आणि लष्करप्रमुखांच्या या उच्चस्तरीय भेटी केवळ जवानांचे मनोबल वाढवणाऱ्या ठरल्या नाहीत, तर यानिमित्ताने अत्यंत कठीण परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करणाऱ्या देशाच्या सशस्त्र दलांविषयी असलेल्या कृतज्ञतेचाही पुनरुच्चार केला गेला.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleOperation Ghost SIM: भारताकडून पाकिस्तानी गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश
Next articleभारताचे Land Port Imports वर निर्बंध; बांगलादेशकडून तोडग्याची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here