भारतीय नौदलाने, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) कडून- प्रोजेक्ट 17A अंतर्गत, प्रगत स्टेल्थ फ्रिगेट लाइनमधील दुसरे जहाज ‘INS Udaygiri’ औपचारिकपणे स्विकारले. हिंद महासागर क्षेत्रात स्वदेशी नौदल क्षमता आणि सागरी वर्चस्व मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नात हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
नौदलाच्या ताफ्यात नव्याने सामील झालेली ही युद्धनौका, याआधीच्या शिवालिक वर्ग (प्रोजेक्ट 17) फ्रिगेट्सचा पुढचा पिढीतील विकसित प्रकार आहे, ज्यामध्ये सुधारित स्टेल्थ क्षमता, फायरपॉवर आणि स्वयंचलन यंत्रणा यांचा समावेश आहे.
‘आयएनएस उदयगिरी’ केवळ 37 महिन्यांच्या कालावधीत नौदलाला सुपूर्द करण्यात आली. यातून नौदल जहाजबांधणीतील एक नवीन कार्यक्षमता दिसून आली, जी मॉड्यूलर प्री-आउटफिटिंगवर भर देणाऱ्या एकात्मिक बांधकाम दृष्टिकोनामुळे शक्य झाली.
तांत्रिक प्रगती आणि लढाऊ सज्जता
प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या नौकांची रचना, 4.54% मोठ्या हुलसह करण्यात आली आहे, ज्यामध्ये रडारवर न दिसणाऱ्या स्टेल्थ-जिओमेट्रीचा समावेश आहे. या नौकेला कॉम्बाइंड डिझेल किंवा गॅस (CODOG) प्रपल्शन सिस्टीम आणि कंट्रोलेबल पिच प्रपेलर्स (CPP) द्वारे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तसेच, एक प्रगत इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (IPMS) यामध्ये बसवण्यात आली आहे.
INS Udaygiri च्या शस्त्रसाठ्यामध्ये: अतीवेगाने मारा करणारी अँटी-शिप क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, 76 मिमी लांबीचा मुख्य तोफ आणि अनेक क्लोज-इन वेपन सिस्टीम्स (CIWS) यांचा समावेश आहे, जे हवाई आणि समुद्री धोक्यांचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज आहेत.
स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना
आयएनएस उदयगिरी ही ‘आत्मनिर्भर भारत’ मिशनच्या दिशेने, संरक्षण क्षेत्रातील भारताच्या ठोस प्रगतीचे प्रतीक आहे. या नौकेतील 80% पेक्षा अधिक प्रणाली आणि निर्मिती घटक भारतीय उत्पादकांकडून घेतले गेले आहेत, ज्यामध्ये 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) सहभागी आहेत.
या प्रकल्पामुळे सुमारे 4 हजार थेट रोजगार निर्माण झाले असून, सुमारे 10 हजार अप्रत्यक्ष रोजगार सहायक उद्योगांमार्फत निर्माण झाले आहेत. या साखळी परिणामामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून एक सक्षम संरक्षण उत्पादन प्रणाली विकसित होत आहे.
पुढील वाटचाल
भारतीय नौदलासाठी अजून पाच P17A वर्ग फ्रिगेट्सचे बांधकाम सुरू असून, भारताची नौदल क्षमता आणखी बळकट होणार आहे. उर्वरित सर्व जहाजे 2026 च्या अखेरीस सुपूर्द केली जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे भारताची सागरी सुरक्षा स्थिती आणि धोरणात्मक स्वायत्तता बळकट होईल.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, ‘INS Udaygiri’ सारख्या व्यासपीठांमुळे भारताला आपले सागरी हितसंबंध आत्मविश्वासाने आणि विश्वासार्हतेने सुरक्षित ठेवण्यास नक्कीच सहाय्य मिळणार आहे.
– हुमा सिद्दकी