7 जुलैच्या सोमवारी नेतान्याहू यांना भेटण्याची ट्रम्प यांची योजना असून फ्लोरिडाच्या भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांना सांगितले की, गाझा युद्धबंदी जलद व्हावी या गरजेवर ते त्यांच्याशी “खूप ठाम” असतील, तर नेतान्याहू यांचीही अशीच इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.
इस्रायली अधिकारी रॉन डर्मर, या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये बैठकीपूर्वी चर्चा करण्यासाठी आले आहेत.
ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी जूनमध्ये इराणच्या आण्विक स्थळांविरुद्ध लष्करी कारवाईवर एकत्र काम केले होते ज्याचा शेवट अमेरिकन B-2 बॉम्बहल्ल्यांनी झाला होता. ट्रम्प म्हणाले की हल्ल्यांनी तेहरानची आण्विक क्षमता “नष्ट केली” आहे. मात्र इराणी आण्विक कार्यक्रमाला नेमके किती नुकसान पोहोचले आहे यावर अजूनही वादविवाद सुरू आहे.
युद्धबंदीच्या चर्चेला वेग
पुढील आठवड्यात इस्रायल आणि गाझामधील इराण समर्थित हमास दहशतवाद्यांमध्ये ओलिसांच्या दृष्टीने युद्धबंदी करार होईल अशी आपल्याला आशा असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
“आम्हाला आशा आहे की ते होईल. आणि आम्ही पुढच्या आठवड्यात कधीतरी ते होण्याची वाट पाहत आहोत,” असे त्यांनी व्हाईट हाऊसमधून फ्लोरिडाच्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी निघताना पत्रकारांना सांगितले. “आम्हाला ओलिसांची सुटका करायची आहे.”
हमासने म्हटले आहे की ते युद्ध संपवण्यासाठी कोणत्याही कराराअंतर्गत गाझामधील उर्वरित ओलिसांना मुक्त करण्यास तयार आहे, तर इस्रायलचे म्हणणे आहे की जर हमास संपूर्णपणे नि:शस्त्र झाले आणि त्यांची संघटना पूर्णपणे मोडून काढली तरच सुरू असणारा संघर्ष संपुष्टात येऊ शकतो. हमासने मात्र शस्त्रे ठेवण्यास नकार दिला आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला तेव्हा इस्रायली आकडेवारीनुसार गाझामध्ये युद्ध सुरू झाले, ज्यामध्ये बाराशे लोक मारले गेले आणि 251 नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की 7 ऑक्टोबरनंतर इस्रायलने केलेल्या लष्करी हल्ल्यात 56 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यामुळे उपासमारीचे संकट निर्माण झाले असून, गाझाची संपूर्ण लोकसंख्या अंतर्गतरित्या विस्थापित झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नरसंहाराचे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात युद्ध गुन्ह्यांचे आरोप लावण्यात आले आहेत. इस्रायलने हे आरोप नाकारले आहेत.
दरम्यान डर्मर यांच्या नियोजित बैठका आणि अजेंडा याबद्दल विचारले असता व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की: “रॉन डर्मर नियमितपणे व्हाईट हाऊसला भेट देतात.”
“राष्ट्रपती ट्रम्प इस्रायल आणि गाझा यांच्यात शांततेचा प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न करत असताना हे प्रकार सुरूच राहतील,” असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले. डर्मर त्यांच्या भेटीदरम्यान ट्रम्प यांच्या कोणत्या सहकार्यांना भेटतील याची अधिकृत माहिती मात्र अधिकाऱ्यांनी लगेच दिली नाही.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)