सोमवारी पहाटेच्या सुमारास, इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या तेल अवीव आणि बंदर शहर हैफा येथे केलेल्या हल्ल्यात अनेक निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या. या आठवड्यात संपन्न होणाऱ्या G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याने जागतिक नेत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय आपत्कालीन सेवेने सांगितले की, इराणी हल्ल्यांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे शुक्रवारपासून इस्रायलमधील मृतांची संख्या 18 झाली आहे. रात्रभर झालेल्या हल्ल्यात किमान 100 जण जखमी झाले आहेत. इस्रायलने इराणच्या अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांवर प्रतिहल्ला म्हणून तेहरानने करत असलेल्या हल्ल्यांच्या लाटेचा हा एक भाग आहे.
हैफामध्ये शोध आणि मदतकार्य सुरू झाले आहे. या हल्ल्यात सुमारे 30 नागरिक जखमी झाल्याचे आपत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितले, डझनभर कर्मचारी स्ट्राइक झोनमध्ये धावले. बंदराजवळील एका पॉवर प्लांटमध्ये आग लागल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
घरे उद्ध्वस्त
व्हिडिओ फुटेजनुसार तेल अवीववर अनेक क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याचे दिसून आले आहे. तेथे आणि जेरुसलेम येथे अनेक स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. शहरातील अमेरिकन दूतावासापासून काहीशे मीटर अंतरावर असलेल्या तेल अवीवच्या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील अनेक निवासी इमारती या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्या आहेत. अमेरिकेच्या राजदूतांनी सांगितले की दूतावासाच्या इमारतीला किरकोळ नुकसान झाले असले तरी कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
पहाटे 4 वाजल्यानंतर (01.00 GMT) सूचना आल्या तेव्हा गायडो टेटेलबॉन तेल अवीवमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये होते.
“नेहमीप्रमाणे, आम्ही रस्त्याच्या पलीकडे असलेल्या आश्रयस्थानी गेलो. आणि काही मिनिटांतच आश्रयस्थानाचा दरवाजा फुटला,” असे 31 वर्षीय स्वयंपाकी म्हणाले.
“काही लोक रक्ताळलेले, जखमी अवस्थेत बाहेर आले. त्यांची सर्वांची शरीरे कापल्यासारखी झाली होती. मग जेव्हा हल्ले थांबले असे वाटले तेव्हा आम्ही अपार्टमेंटमध्ये आलो, आम्हाला दिसले की तिथे फारसे काही शिल्लकच राहिले नव्हते… भिंती कोसळल्या होत्या, काचेच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या,” असे तो पुढे म्हणाला.
“ते सगळेच प्रचंड भयानक आहे कारण ते इतके अज्ञात आहे. ही एक दीर्घ अशा हल्ल्यांची सुरुवात असू शकते, किंवा ते आणखी वाईट होऊ शकतात, किंवा आशा आहे की ते चांगले होईल, परंतु हे अज्ञात आहे जे सर्वात भयानक आहे.”
पहाटेच्या क्षेपणास्त्रांनी तेल अवीवमधील शुक हाकार्मेल या लोकप्रिय बाजारपेठेजवळ देखील हल्ला केला, जिथे सामान्यतः ताजी फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी रहिवासी आणि पर्यटकांची मोठी गर्दी होते. याशिवाय लोकप्रिय बार आणि रेस्टॉरंट्सवरही हल्ला झाला. जवळच्या पेटाह टिक्वा येथील एक निवासी रस्ता आणि अति-ऑर्थोडॉक्स ज्यू शहर बेनी ब्राकमधील एका शाळेलाही हल्ल्याचा फटका बसला.
‘नवीन पद्धत’
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने म्हटले आहे की, या हल्ल्यात एक नवीन पद्धत वापरली गेली ज्यामुळे इस्रायलच्या बहुस्तरीय संरक्षण प्रणाली एकमेकांना लक्ष्य करू शकल्या आणि इराणला अनेक लक्ष्यांवर यशस्वीरित्या मारा करता आला.
इस्रायली संरक्षण दलाने हल्ल्यांबद्दल टिप्पणी करण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही. इस्रायली अधिकाऱ्यांनी वारंवार सांगितले आहे की त्यांची “आयर्न डोम” संरक्षण प्रणाली 100 टक्के सक्षम नाही आणि येणाऱ्या कठीण दिवसांचा सामना करण्याचा इशारा दिला आहे.
“तेहरानचा अहंकारी हुकूमशहा एक भित्रा खुनी बनला आहे जो इस्रायलमधील निवासी घरांना लक्ष्य करत आहे जेणेकरून आयडीएफला त्याच्या क्षमता नष्ट करणाऱ्या हल्ल्यांपासून रोखता येईल,” असे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एका निवेदनात म्हटले आहे. “तेहरानमधील रहिवाशांना त्याची किंमत लवकरच चुकवावी लागेल,” असा दावाही त्यांनी केला.
इराणमधील मृतांची संख्या आधीच किमान 224 झाली असून त्यात 90 टक्के नागरिक असल्याचे इराणी आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
इस्रायली सैन्याने सोमवारी सकाळी सांगितले की, त्यांनी रिव्होल्यूशनरी गार्ड आणि इराणच्या सैन्याच्या कमांड सेंटरवर पुन्हा हल्ला केला.
नेत्यांची बैठक
रविवारी कॅनेडियन रॉकीजमध्ये सात राष्ट्रांच्रा गटाचे सदस्य एकत्र येऊ लागलेले असताना इस्रायल-इराण संघर्षाला सर्वोच्च प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ म्हणाले की, या परिषदेसाठी त्यांची उद्दिष्टे म्हणजे इराणने अण्वस्त्रे विकसित करू नयेत किंवा बाळगू नयेत, इस्रायलला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार सुनिश्चित करणे, संघर्ष वाढू नये आणि राजनैतिक बातचितीच्या दृष्टीने जागा निर्माण करणे हे आहेत.
“हा मुद्दा G7 शिखर परिषदेच्या अजेंड्यावर खूप महत्वाचा असेल,” असे मर्झ यांनी पत्रकारांना सांगितले.
रविवारी शिखर परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले की ते परिस्थिती कमी करण्यासाठी काय करत आहेत. “मला आशा आहे की एक करार होईल. मला वाटते की कराराची वेळ आली आहे,” त्यांनी पत्रकारांना सांगितले. “कधी ना कधी त्यांना हे प्रश्न सोडवावे लागते.”
गेल्या आठवड्याच्या अखेरीस आशियाई व्यापारात सोमवारी ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.5 टक्क्यांवर होते. तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला असला तरी, आशियातील शेअर आणि चलन बाजारात फार हालचाल झाली नाही.
“या टप्प्यावर ही इक्विटी स्टोरीपेक्षा तेलाची स्टोरी जास्त आहे,” बॅलास्ट रॉक प्रायव्हेट वेल्थचे वरिष्ठ संपत्ती सल्लागार आणि पोर्टफोलिओ मॅनेजर जिम कॅरोल म्हणाले. “सध्या स्टॉक स्थिरावलेले दिसत आहेत.”
खोमेनींना लक्ष्य करण्याच्या योजनेसाठी ट्रम्प यांचा नकाराधिकार
वॉशिंग्टनमध्ये, दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की अलिकडच्या काळात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना मारण्याच्या इस्रायली योजनेसाठी ट्रम्प यांनी नकाराधिकार वापला.
इस्रायली नेते बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी फॉक्स न्यूजला सांगितले: “कधीही न झालेल्या संभाषणांच्या इतक्या खोट्या बातम्या येत आहेत आणि मला त्यात पडायचं नाही.”
“आम्ही जे करायला हवे ते करत आहोत,” असे त्यांनी फॉक्सच्या “स्पेशल रिपोर्ट विथ ब्रेट बायर” मध्ये सांगितले.
इस्रायलने शुक्रवारी अचानक हल्ला करून हल्ला सुरू केला ज्यामध्ये इराणच्या लष्करी कमांडचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी ठार झाले याशिवाय त्यांच्या आण्विक स्थळांचे नुकसान झाले. येत्या काळात ही मोहीम आणखी तीव्र होईल असे म्हटले आहे.
इराणने बदला म्हणून “नरकाचे दरवाजे उघडण्याची” (अधिक तीव्र स्वरूपाचे हल्ले करण्याची ) शपथ घेतली आहे.
ट्रम्प यांचा इराणला इशारा
ट्रम्प यांनी इस्रायलच्या हल्ल्याचे कौतुक केले आहे, तर या हल्ल्यांमागे अमेरिकेचा हात असल्याचे इराणचे आरोप फेटाळून लावले आहेत. याशिवाय तेहरानला अमेरिकेच्या लक्ष्यांना समाविष्ट करण्यासाठी हल्ल्यांची व्याप्ती वाढवू नये असा इशारा दिला आहे.
शुक्रवारी दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की अमेरिकन सैन्याने इस्रायलकडे जाणारे इराणी क्षेपणास्त्र पाडण्यास मदत केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार म्हणाले आहेत की इराण त्यांच्या अणुकार्यक्रमावर कठोर निर्बंध लादण्यास सहमती देऊन युद्ध संपवू शकतो. तर इराणच्या मते आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी आहे. मात्र पाश्चात्य देश आणि IAEA अणुऊर्जा नियंत्रक संस्थेच्या म्हणण्यानुसार या कार्यक्रमाचा उपयोग अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सोमवारी संसदेत सांगितले की देशाचा अण्वस्रे तयार करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र आपण अणुऊर्जा आणि संशोधनाच्या अधिकाराचा पाठपुरावा करत राहू असेही त्यांनी स्पष्ट केले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)