
आपल्या दीर्घकालीन शत्रूला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलने गेल्या शुक्रवारपासून इराणवर हल्ला करण्यास सुरुवात केली. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत त्याला प्रत्युत्तर दिले. इराणचा असा दावा आहे की आपला अण्वस्त्र कार्यक्रम शांततापूर्ण कारणांसाठी आहे.
ह्युमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीने म्हटले आहे की इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये ६३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांचा समावेश आहे. तर दुसरीकडे इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान दोन डझन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
पाश्चात्य आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायलने अण्वस्त्र कार्यक्रमांची ठिकाणे आणि क्षेपणास्त्र क्षमतांना लक्ष्य केले आहे. यामागे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.
“आपण राजवटीच्या पतनाला लक्ष्य करत आहोत का? कदाचित तो एक परिणाम असू शकतो, परंतु त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण प्रयत्न करणे हे सर्वस्वी इराणी लोकांवर अवलंबून आहे,” असे इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी सांगितले.
इराणने म्हटले आहे की ते इस्रायलमधील लष्करी आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करत आहे. अर्थात त्यांनी एक रुग्णालय आणि इतर नागरी ठिकाणांना देखील लक्ष्य केले आहे.
इस्रायलने गुरुवारी इराणवर क्लस्टर दारूगोळ्यांचा वापर करून जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला, जे अतिशय मोठ्या भागात लहान लहान बॉम्ब पसरवतात. संयुक्त राष्ट्रांमधील इराणच्या मिशनने टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.
कोणीही माघार घेणार नाही
कोणत्याही देशाने माघार न घेतल्याने, शुक्रवारी संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीचे परराष्ट्र मंत्री आणि युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जिनेव्हा येथे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी भेटणार आहेत.
“मध्य पूर्वेतील गंभीर परिस्थिती थांबवण्याची आणि ज्याचा कोणालाही फायदा होणार नाही अशा प्रादेशिक तणावाला रोखण्याची वेळ आली आहे,” असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी संयुक्त बैठकीपूर्वी ब्रिटिश परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी म्हणाले.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गुरुवारी लॅमी यांची भेट घेतली आणि संघर्षावर चर्चा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी स्वतंत्रपणे संपर्क साधला.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की रुबियो आणि इतर परराष्ट्र मंत्र्यांनी “इराण कधीही अण्वस्त्रे विकसित करू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही” यावर सहमती दर्शविली.
लॅमी यांनी एक्सवरही तेच सांगितले आणि मध्य पूर्वेतील परिस्थिती “धोकादायक राहिली आहे” तसेच “पुढील दोन आठवड्यात राजनैतिक तोडगा काढण्यासाठी आता एक पर्याय उपलब्ध आहे” असल्याचे म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोघांनीही इस्रायलचा निषेध केला आणि तणाव कमी करण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली, असे क्रेमलिनने गुरुवारी सांगितले.
अमेरिकेची भूमिका अनिश्चित आहे. ट्रम्प यांचे या प्रदेशातील विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी गेल्या आठवड्यापासून अराक्चीशी अनेक वेळा चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
ट्रम्प शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय सुरक्षा बैठकीत सहभागी होतील असे व्हाईट हाऊसने सांगितले. राष्ट्राध्यक्षांनी तेहरानला धमकावणे आणि संघर्षामुळे स्थगित झालेल्या आण्विक वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करणे यात बदल केला आहे
क्षेपणास्त्र हल्ले
शुक्रवारी पहाटे, इस्रायली सैन्याने इराणकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा नवीन इशारा दिला. इस्रायलच्या दक्षिणेकडील सर्वात मोठ्या शहर बीरशेबा येथे किमान एक थेट हल्ला झाला, जो अलिकडच्या काळात लक्ष्यित करण्यात आला आहे.
निवासी अपार्टमेंट, कार्यालयीन इमारती आणि औद्योगिक सुविधांजवळ हा हल्ला झाला, ज्यामुळे तिथे एक मोठा खड्डा पडला असून किमान एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा दर्शनी भाग उध्वस्त झाला तर इतर अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
“आमच्याकडे एका इमारतीजवळ थेट हल्ला झाला आहे. येथे झालेले नुकसान बरेच (व्यापक) आहे,” पॅरामेडिक शफीर बोटनर म्हणाले.
इस्रायलच्या कानने फुटेज प्रसारित केले ज्यामध्ये प्रचंड आगीत गाड्या भस्मसात झाल्या आहेत, धुराचे लोट उठले असून निवासी इमारतींच्या खिडक्या फुटल्या आहेत.
बॉटनर यांच्या म्हणण्यानुसार, स्फोटात किमान सहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. याशिवाय आपत्कालीन कर्मचारी अजूनही कोणी जखमी आहेत का याचा अपार्टमेंटमध्ये शोध घेत आहेत.
गुरुवारी, इस्रायलच्या दक्षिणेकडील सर्वात मोठे शहर बीरशेबा येथील एका प्रमुख रुग्णालयावर इराणने हल्ला केला. आपण रुग्णालयाजवळील इस्रायली लष्करी मुख्यालयाला लक्ष्य करत होतो असा इराणचा दावा आहे. मात्र इस्रायलने या भागात अशा कोणत्याही सुविधा असल्याचा इन्कार केला आहे.
मध्यरात्रीचे हल्ले
इस्रायलच्या लष्कराने असा दावा केला आहे की त्यांनी इराणच्या राजधानीच्या मध्यभागी रात्रीच्या वेळी अनेक हल्ले केले आहेत. लष्कराने म्हटले आहे की लक्ष्यांमध्ये क्षेपणास्त्र उत्पादन स्थळे तसेच अण्वस्त्र संशोधन आणि विकास सुविधांचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी इराणवर “बंकर बस्टर” बॉम्बने हल्ला करण्याचा विचार केला आहे. हा बॉम्ब जमिनीखाली खोलवर बांधलेल्या अण्वस्त्र स्थळांना नष्ट करू शकेल. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की युद्धात सहभागी व्हायचे की नाही या बाबतचा निर्णय पुढील दोन आठवड्यात ट्रम्प घेतील.
अर्थात ती निश्चितच अंतिम मुदत असू शकत नाही. ट्रम्प यांनी सामान्यतः निर्णय घेण्यासाठी “दोन आठवडे” ही संज्ञा वापरली आहे. तसेच इतर आर्थिक आणि राजनैतिक निर्णयांबाबतच्या अंतिम मुदती बाजूला सारल्या आहेत.
1979 च्या क्रांतीनंतर इस्लामिक रिपब्लिकला त्याच्या सर्वात मोठ्या बाह्य धोक्यांपैकी एकाचा सामना करावा लागत असल्याने, त्याच्या 46 वर्षांच्या राजवटीला थेट आव्हान देण्यासाठी कदाचित काही उठाव होण्याची शक्यता असेल.
परंतु मागील निषेधांमध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की ते मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण करण्यास तयार नाहीत, अगदी त्यांच्या राष्ट्रावर हल्ला होत असलेल्या व्यवस्थेविरुद्धही, ज्याचा त्यांना तिरस्कार आहे.
“लोकांनी रस्त्यावर का उतरणे अपेक्षित आहे? अशा भयानक परिस्थितीत, लोक केवळ स्वतः, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे देशबांधव आणि अगदी त्यांच्या पाळीव प्राण्यांनाही वाचवण्यावर लक्ष केंद्रित करतात,” असे इराण सोडण्यापूर्वी सहा वर्षे तुरुंगात घालवलेल्या प्रख्यात कार्यकर्त्या एटेना डेमी म्हणाल्या.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)