रविवारी इस्रायली लष्कराने दावा केला की, मागील महिन्यात राबवलेल्या मोहिमेनंतर दक्षिण गाझामधील एका रुग्णालयाखालील बोगद्यातून हमासचे लष्करी प्रमुख – मोहम्मद सिनवार याचा मृतदेह मिळाला आहे.
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते – ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी सांगितले की, “राफा ब्रिगेडचे कमांडर मोहम्मद शबाना, हेही मृत अवस्थेत सापडले. त्यांच्यासोबत आणखी काही अतिरेक्यांचे मृतदेहही सापडले असून, त्यांची ओळख अद्याप सुरू आहे.”
इस्रायली सैन्याने काही परदेशी पत्रकारांना, खान युनिसमधील युरोपियन हॉस्पिटलखाली सापडलेल्या बोगद्याचा दौरा घडवला. डेफ्रिन यांच्या म्हणण्यानुसार, हे बोगदे हमाससाठी एक महत्वाचे नियंत्रण आणि आदेश केंद्र होते.
“हे हमासच्या युद्धपद्धतीचे आणखी एक उदाहरण आहे, ज्यात सामान्य नागरिकांना मानवी ढाल म्हणून वापरणे, नागरी इमारती आणि रुग्णालयांचा गैरवापर करणे, याचा समावेश आहे,” असे डेफ्रिन म्हणाले.
“रुग्णालयाच्या खाली, अगदी आपत्कालीन विभागाच्या खाली काही खोल्या असलेले एक संकुल आम्हाला सापडले. त्यापैकी एका खोलीत मोहम्मद सिनवार होता, आणि आम्ही त्याला ठार मारले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, यांनी मागील महिन्यातच सिनवारच्या मृत्यूची घोषणा केली होती, पण डेफ्रिन यांनी सांगितले की, “आता त्यांच्याकडे सिनवारचे डीएनए पुरावे आहेत, जे त्यांची ओळख निश्चित करतात.”
हमासने अद्याप सिनवार किंवा शबाना यांच्या मृत्यूवर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
मोहम्मद सिनवार हा याह्या सिनवार याचा धाकटा भाऊ होता. याह्या सिनवार, हा ऑक्टोबर 2023 च्या इस्रायली हल्ल्याचा मास्टरमाइंड होता, ज्यामध्ये इस्रायलनुसार 1,200 लोक ठार झाले आणि नंतर गाझावर मोठ्या प्रमाणावर इस्रायली लष्करी कारवाई सुरू झाली.
मोहम्मद शबाना, हा हमासचा दक्षिण Gaza मधील अत्यंत अनुभवी आणि वरिष्ठ कमांडर होता. त्याने राफा शहराखालील बोगद्यांचे जाळे तयार करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावली होती, ज्याचा वापर छुप्या हल्ल्यांसाठी आणि सीमापार कारवायांसाठी केला जात होता.
महाविनाश
खान युनिस शहरात, इस्रायली लष्कराच्या वाहनांतून प्रवास करताना दिसून आले की, शहराचे प्रचंड नुकसान झाले आहे — अनेक इमारतींचा खच पडलेला आहे आणि रस्त्यांच्या बाजूला ढिगारे साचलेले आहेत.
या युद्धादरम्यान इस्रायली लष्कराने, अनेक रुग्णालयांवर छापे टाकले किंवा त्यांना वेढा घातला आहे. लष्कराचा आरोप आहे की, हमास रुग्णालयांचा वापर अतिरेकी लपवण्यासाठी आणि कारवाया राबवण्यासाठी करतो, मात्र हमासने हे आरोप वारंवार फेटाळले आहेत. काही घटनांमध्ये इस्रायलने पुरावे सादर केले आहेत, परंतु काही आरोप अद्याप निष्पन्न झालेले नाहीत.
डेफ्रिन यांनी सांगितले की, “युरोपियन हॉस्पिटलजवळ कारवाई अगदी अचूकपणे नियोजित केली होती, जेणेकरून रुग्णालयाला नुकसान होऊ नये.”
रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या समोर मोठा खड्डा खोदलेला होता, जो एका अरुंद सिमेंटच्या बोगद्याकडे जात होता. इस्रायली सैन्याच्या मते, हा बोगदा हमास लढवय्यांसाठी लपण्याची जागा होता.
तपासादरम्यान इस्रायली सैन्याने, हत्यारांचा साठा, गोळ्या-बारुद, रोकड आणि गुप्त दस्तऐवज हस्तगत केले आहेत, ज्यांचा आता गुप्तचर दृष्टीकोनातून अभ्यास केला जात आहे.
“आम्ही हमासला संपवणार, कारण अशा अतिरेकी संघटनेसोबत आपल्या सीमाशेजारी राहणे शक्य नाही,” असे डेफ्रिन यांनी सांगितले.
गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते,”इस्रायली कारवाईत 54,000 पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.” संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, गाझामधील 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी बहुतांश लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)