गुरूवारी रात्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांमध्ये पहिली डिबेट पार पडली. त्यातील जो बायडेन यांची निराशाजनक कामगिरी बघता त्यांनी राजीनामा द्यावा अशी बहुसंख्य मतदारांची इच्छा आहे. मात्र त्यांची जागा घ्यायला योग्य पर्यायी डेमोक्रॅटिक उमेदवार आहे याची अनेक मतदारांना खात्री वाटत नसल्याचे नवीन सर्वेक्षणात आढळून आले आहे.
मॉर्निंग कन्सल्ट पोलनुसार 60 टक्के प्रतिसादकर्त्यांच्या मते – त्यात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स या दोन्ही पक्षांच्या समर्थकांचा समावेश आहे – अध्यक्षपदाचा उमेदवार बदलला पाहिजे, तर 11 टक्के मतदार याबाबत साशंक आहेत.
त्याच सर्वेक्षणात असेही आढळून आले की बायडेन यांच्या लोकप्रियतेवर सध्यातरी गुरुवारी रात्री रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांचे अडखळणे आणि इतर गैरप्रकारांचा परिणाम झालेला दिसत नाही.
2016ची निवडणूक प्रभावित करण्यासाठी खोट्या व्यावसायिक नोंदी केल्याच्या 34 आरोपांखाली मे महिन्यात ट्रम्प यांना दोषी ठरवल्यानंतर मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात बायडेन यांनी ट्रम्पपेक्षा एका गुणाची (45 – 44%) आघाडी घेतली होती. ती आघाडी डिबेटनंतरही कायम आहे.
डेट फॉर प्रोग्रेस या डिबेटनंतर परत करण्यात आलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणात बायडेन यांच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळाली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ट्रम्प यांच्याविरुद्ध बायडेन व्यतिरिक्त इतर कोणताही डेमोक्रॅट उमेदवार अधिक चांगली कामगिरी करेल असे अनेक मतदारांना वाटत नाही.
इतर सर्व प्रमुख डेमोक्रॅटिक उमेदवार ट्रम्प यांच्याविरुद्ध समान किंवा वाईट कामगिरी करतील असे अनेक मतदारांना वाटते. मतदारांना विचारण्यात आलेल्या प्रमुख नावांमध्ये उपाध्यक्ष कमला हॅरिस (45-48), वाहतूक सचिव पेरे बटिगीग (44-47), कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम (44-47) आणि मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर (44-46) यांचा समावेश होता.
दुसरीकडे युगव्हच्या (Yougov) एका सर्वेक्षणात असं आढळून आलं की अनेक नागरिकांना ट्रम्प हे या डिबेटमध्ये जिंकले असं वाटतं. 30 टक्के डेमोक्रॅट्सना असं वाटलं की बायडेनव्यतिरिक्त इतर कोणी निवडणुकीसाठी उभं राहिलं तर पक्षाला नोव्हेंबरमध्ये जिंकण्याची सर्वोत्तम संधी मिळेल.
रिपब्लिकन आणि अपक्षांसह जवळपास 49 टक्के अमेरिकन मतदार असा विचार करतात. याउलट, केवळ 13 टक्के रिपब्लिकनांना असे वाटते की ट्रम्प व्यतिरिक्त इतर कोणाला उमेदवारी दिली तर त्यांच्या पक्षाला विजयाची सर्वोत्तम संधी मिळेल.
अटलांटा जर्नल-कॉन्स्टिट्यूशनने म्हटले, “बायडेन यांनी गेल्या अर्ध्या शतकापासून देशाची प्रशंसनीय सेवा केली असली तरी आता त्याच देशाच्या भल्यासाठी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले पाहिजे.” आता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना निवृत्त व्हावेच लागेल.
तर जॉर्जियाचे डेमोक्रॅटिक सेनेटर राफेल वार्नॉक एका कार्यक्रमात म्हणाले.”असे अजिबात नाही,” वाईट वादविवाद होतच असतात. प्रश्न असा आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःशिवाय इतर कोणासाठी किंवा त्यांच्यासारख्या लोकांसाठी काय केले आहे? मी जो बायडेनसोबत आहे आणि नोव्हेंबरमध्ये ते जिंकून येतील यासाठी प्रयत्न करणं हे आमचं काम आहे.
“बायडेन यांना पुढील चार वर्षे पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यात काही अडचण आहे असं मला तरी वाटत नाही,” असं दक्षिण कॅरोलिनाचे प्रतिनिधी आणि जो बायडेन यांचे प्रमुख समर्थक जिम क्लायबर्न म्हणाले.” गेल्या साडेतीन वर्षांत त्यांनी उत्तम प्रकारे नेतृत्व केले आहे. मी नेहमीच म्हणतो की भविष्यातील वर्तणुकीचा अंदाज हा मागील कामगिरीवरून लावला जात असतो.”
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्ससह)