युक्रेन युद्धात त्यांच्या बाजूने लढण्याची इच्छा असणाऱ्या पाश्चिमात्य सैन्याच्या संभाव्य प्रवेशासाठी रशिया सर्वोतोपरी सज्ज असल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सांगितले. आरआयए या सरकारी वृत्तसंस्थेने लावरोव्ह यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. “तो त्यांचा अधिकार आहे-जर त्यांना तो युद्धभूमीवर बजावायचा असेल, तर तो युद्धभूमीवर बजावला जाईल.”
फेब्रुवारीमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की त्यांनी रशियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी आपले सैन्य पाठवण्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लावरोव्ह बोलत होते. अर्थात मॅक्रॉन यांच्या या विधानावर जगभरातून टीका झाली. अर्थात अमेरिका, ब्रिटन आणि इतर नाटो देशांसारख्या प्रमुख देशांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने, रशियाला अशी चिंता आहे की या कल्पनेवर विचार केला जाऊ शकतो कारण युक्रेनला या युद्धात प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.
याशिवाय मॅक्रॉन यांचे आणखी एक विधान या सगळ्या घडामोडींसाठी कारणीभूत ठरले आहेत. मे महिन्यात ‘द इकॉनॉमिस्ट’ ला दिलेल्या मुलाखतीत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “माझे एक स्पष्ट धोरणात्मक उद्दिष्ट आहेः रशिया युक्रेनमध्ये जिंकू शकत नाही. युक्रेनमध्ये रशिया जिंकला तर युरोपमध्ये कोणीही सुरक्षित राहणार नाही. रशिया युक्रेनमध्येच थांबेल यावर कोण विश्वास ठेवू शकेल?”
मॅक्रॉन यांच्या वक्तव्यांमुळे रशियाची चिंता आणखी वाढली आहे कारण आता मनुष्यबळाची कमतरता असल्याचे युक्रेन उघडपणे कबूल करत आहे. युक्रेनने अलीकडेच नागरिकांच्या हालचाली नियंत्रित करणारा एक नवीन कायदा मंजूर केला आहे. याशिवाय देशाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते दिमित्री लाझुटकिन यांनी शनिवारी स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की युक्रेनियन लोकांनी “त्याग करणे” आणि “शांततापूर्ण जीवन जगणे विसरणे” आवश्यक आहे.
युक्रेनच्या संसदेने अलीकडेच मंजूर केलेल्या आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्वाक्षरी केलेल्या नव्या कायद्याने लढाऊ सैनिकांची संख्या वाढवण्यासाठी सैन्यभरतीमध्ये बदल केले आहेत.
या बदलांमध्ये भरतीचे वय 25 वर्षांपर्यंत कमी करणे, समन्स स्वयंचलित करणे आणि भरतीतून पळ काढणाऱ्यांवर विविध निर्बंध लादताना नोंदणी अधिकाऱ्यांना अतिरिक्त अधिकार देणे यांचा समावेश आहे. याशिवाय, देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्येक सक्षम युक्रेनियन नागरिकाने देशासाठी सेवा द्यावी यासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या पण लष्कर प्रवेशपात्र असणाऱ्या युक्रेनियन नागरिकांसाठी दूतावास सेवा बंद केल्या आहेत.
परंतु युक्रेनमधील मृत्यूचे वाढते प्रमाण (अधिकृत आकडेवारी अद्याप माहीत नसली तरी) आणि रशियाने युक्रेनचा मोठा भाग ताब्यात घेतल्यामुळे युद्धाच्या या नवीन टप्प्यावर पाश्चिमात्य देशांना काहीतरी महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागणार आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मार्चमध्ये पाश्चिमात्य देशांना इशारा दिला होता की रशिया आणि अमेरिकेच्या पुढाकार खाली नाटो लष्कर यांच्यातील थेट संघर्षाचा अर्थ असा होईल की जग आता तिसऱ्या महायुद्धापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
“हे सर्वांसाठी स्पष्ट आहे की जग तिसऱ्या महायुद्धापासून एक पाऊल दूर असेल. मला वाटते की यात क्वचितच कोणाला स्वारस्य आहे,” असे पुतीन यांनी त्यांच्या प्रचंड विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, त्यांचा असा विश्वास आहे की नाटोचे सैन्य आधीच युक्रेनमध्ये होते कारण रशियन सैन्यात फ्रेंच आणि इंग्रजी भाषा बोलली जात होती.”
“यात काहीही चांगले नाही, सर्वप्रथम त्यांच्यासाठी, कारण ते तिथे मोठ्या संख्येने मरत आहेत,”, असेही ते म्हणाले.
अश्विन अहमद
(रॉयटर्स आणि इतर वृत्तसंस्था)