मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील भारत-म्यानमार सीमेजवळील न्यू समताल गावाजवळ सुरू असलेल्या लष्करी कारवाईत किमान 10 संशयित दहशतवादी ठार झाल्याचे भारतीय लष्कराने गुरुवारी सांगितले.
पूर्व कमांडच्या निवेदनानुसार, 14 मे रोजी आसाम रायफल्सच्या तिसऱ्या कोर्प्स (स्पीअर कोर्प्स) अंतर्गत येणाऱ्या एका युनिटने या भागात सशस्त्र बंडखोरांच्या हालचालींबाबत विशिष्ट गुप्तचरांच्या माहितीवरून या कारवाईला सुरूवात केली.
“ऑपरेशन दरम्यान संशयित दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी त्याला जलद प्रत्युत्तर दिले, त्यानंतर आणखी काही जवान तिथे तैनात करण्यात आले आणि अत्यंत अचूक, नेमक्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले गेले,” असे निवेदनात म्हटले आहे.
त्यानंतर झालेल्या गोळीबारात, 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि शस्त्रास्त्रे तसेच दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. गुरुवारी सकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती.
अधिकाऱ्यांनी नमूद केले की ठार झालेल्यांची ओळख आणि संबंधांबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. म्यानमारला लागून असलेल्या मणिपूरच्या 398 किलोमीटरच्या सीमेवर वसलेला चंदेल जिल्हा हा प्रामुख्याने नागा समुदायाने वास्तव्य केलेला आदिवासीबहुल प्रदेश आहे.
मणिपूरमधील बंडखोर गटांवरील व्यापक कारवाईच्या अंतर्गत ही लष्करी कारवाई करण्यात आली आहे.
10 मे रोजी सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांनी संयुक्त कारवाईत किमान 13 अतिरेक्यांना अटक करण्यात आली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,हे सर्वजण बंदी घातलेल्या संघटनांचे सक्रिय सदस्य होते आणि खंडणीच्या कारवायांमध्ये सहभागी होते.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये निंगथौजाम किरण मेतेई, उर्फ बोईनाओ (29) आणि सोरोखैबाम इनाओचा सिंग (45) यांचा समावेश असून हे दोघेही इम्फाळ पश्चिमेचे रहिवासी आहेत. याशिवाय कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी – पीपल्स वॉर ग्रुप [केसीपी (पीडब्ल्यूजी)] गटाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्सह)