काँग्रेसचे खासदार शशी थरूर, जे इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि प्रभावी वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांनी नुकत्याच मॉस्को येथे झालेल्या एका बैठकीत, पाकिस्तानवर थेट फ्रेंच भाषेतून थेट टीका केली, ज्यामुळे सध्या त्यांना व्यापक प्रशंसा मिळत आहे. थरूर यांनी ही टीका, रशियाच्या आतंकवादविरोधी शिखर परिषदेतील पाकिस्तानच्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर केली आहे.
मॉस्कोमध्ये, रशियाच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष लिओनिड स्लट्स्की यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान, थरूर यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले.
या अनपेक्षित फ्रेंच भाषिक संवादात, शशी थरूर यांनी स्लट्स्की यांना सांगितले की, “दहशतवादी गटांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”
स्लट्स्की यांनी जेव्हा फ्रेंचमध्ये संभाषण केले, तेव्हा थरूर यांनीही त्याच भाषेत त्यांना प्रवाही प्रतिसाद दिला. या क्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, थरूर यांच्या बहुभाषिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आतंकवादविरोधी परिषद
या विशेष बैठकीदरम्यान स्लट्स्की यांनी थरूर यांना सांगितले की, “रशिया लवकरच एका शिखर परिषदाचे आयोजन करत आहे, ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, इराण आणि तुर्कस्तान या सहा देशांच्या संसदप्रमुखांचा सहभाग असणार आहे. या परिषदेचा मुख्य विषय आतंकवादाविरोधातील लढा असणार आहे.”
स्लट्स्की म्हणाले की, “रशियाने याआधी अशा प्रकारच्या सहा परिषदांचे आयोजन केले आहे. मात्र, या आगामी परिषदेची तारीख आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. हे आयोजन पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.”
“याविषयावर फक्त परस्पर दृष्टिकोनांची देवाणघेवाण न करता, प्रत्यक्षात आतंकवादविरोधात कृती करायची असेल, तर आपण याविषयाकडे अत्यंत गंभीरतेने पाहणे आवश्यक आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
थरूर यांचा स्पष्ट इशारा
बैठकीदरम्यान थरूर यांनी, अत्यंत सुशिक्षित फ्रेंच भाषेत आपली ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले की, “एक देश आहे, जो दुर्दैवाने या दहशतवादी गटांना सुरक्षित आश्रय देतो. त्यांच्याकडे दहशतवादी गटांची मुख्यालये आहेत, जिथे ते भरती, प्रशिक्षण, शस्त्रसज्जता आणि आर्थिक सहाय्य या सर्वाचे नियोजन करतात, आणि नंतर हेच गट इतर देशांमध्ये हल्ले घडवून आणतात.”
थरूर पुढे म्हणाले की, “म्हणूनच पाकिस्तान या गटांना देत असलेल्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करणे आपल्याला शक्य नाही.”
थरूर यांनी याआधीही पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादातील सहभागावर वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे, आणि या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे.
थरूर यांचा या बैठकीतील सहभाग ‘ऑपरेशन सिंदूर‘ या भारताच्या जागतिक राजनैतिक उपक्रमाचा भाग होता, ज्याचा उद्देश जागतिक स्तरावर दहशतवादविरोधी संसदीय संवाद आणि सहकार्य मजबूत करणे आहे.
स्लट्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर थरूर यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की: “रशियाचे माझे समकक्ष श्री. स्लट्स्की यांना पुन्हा एकदा भेटून आनंद झाला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका रशियन प्रतिनिधीमंडळासह भारताच्या संसदेला भेट दिली होती. आम्ही प्रादेशिक शांतता, #OperationSindoor आणि भविष्यातील संसदीय सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा केली.”
टीम स्ट्रॅटन्यूज