युक्रेनियन ड्रोन हल्ल्याने रशियन इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमधील उत्पादन थांबले

0

युक्रेनच्या सीमेपासून सुमारे तेराशे किमी (800 मैल) अंतरावर असलेल्या चुवाशियाच्या रशियाच्या व्होल्गा नदी प्रदेशातील इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील उत्पादन तात्पुरते थांबवण्यात आल्याचे प्रादेशिक प्रमुखांनी सोमवारी सांगितले. प्रकल्पाच्या आवारात दोन ड्रोन कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

चुवाशियाचे गव्हर्नर ओलेग निकोलायेव यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा हल्ला-युद्धाच्या तीन वर्षांहून अधिक काळानंतर युक्रेनच्या ड्रोनद्वारे रशियातील सर्वात आतील प्रदेशांमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यांपैकी एक असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नुकसानीचे मूल्यांकन

ज्या VNIIR एंटरप्राइझमध्ये ड्रोन पडले त्या कंपनीतील “कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उत्पादन तात्पुरते थांबवण्याचा जबाबदार निर्णय घेण्यात आला,” असे निकोलायेव म्हणाले.

ड्रोनमुळे काही नुकसान झाले की नाही हे लगेच स्पष्ट झालेले नाही. निकोलायेव म्हणाले की आणखी एक ड्रोन या प्रदेशाची राजधानी चेबोकसरी येथील शेतात पडला.

रशियन संरक्षण मंत्रालयाने – जे युक्रेनने किती ड्रोन सोडले याचा अहवाल देत नाही – टेलिग्रामवर म्हटले आहे की त्यांच्या युनिट्सनी चुवाशियावरील दोन ड्रोन पाडले. एकूण, हवाई संरक्षण प्रणालींनी रशियावर रात्रीतून ४९ युक्रेनियन ड्रोन पाडले.

रशियाची युद्धसामग्री नष्ट करणे

अनधिकृतपणे रशियन आणि टेलिग्राम न्यूज चॅनेलवरील फोटो आणि व्हिडिओंनुसार, ड्रोनमुळे व्हीएनआयआयआर प्लांटमध्ये आग लागली. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी लागणारे घटक तयार करतो असे त्यांचे म्हणणे आहे. रॉयटर्स स्वतंत्रपणे‌ या  वृत्तांची पडताळणी करू शकले नाहीत.

युक्रेनकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कीवने अनेकदा म्हटले आहे की रशियामधील त्यांचे हल्ले मॉस्कोच्या युद्ध प्रयत्नांसाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या उद्देशाने आहेत आणि युक्रेनवरील रशियाच्या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून आहेत.

यूएस ट्रेझरी वेबसाइटनुसार, चुवाशियामध्ये प्रायोगिक उत्पादनासह व्हीएनआयआयआर रशियन सायंटिफिक रिसर्च डिझाइन अँड टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ रिले इंजिनिअरिंग अमेरिकेने टाकलेल्या निर्बंधांच्या यादीत आहे.

युक्रेनच्या सीमेवर असलेल्या व्होरोनेझ प्रदेशात युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे गॅस पाइपलाइनचे नुकसान झाले आणि 22 ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडित झाला, असे प्रदेशाचे गव्हर्नर अलेक्झांडर गुसेव्ह यांनी टेलिग्रामवर सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleDRDO ने केले 9 संरक्षण प्रणालींचे तंत्रज्ञान हस्तांतरीत
Next articleदक्षिण गाझातील मदत केंद्राजवळील इस्रायच्या हल्ल्यात चारजण ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here