अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD Vance यांनी सोमवारी, आपल्या चार दिवसीय भारत दौऱ्याचा प्रारंभ केला, जिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. हा दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा नवी दिल्ली अमेरिकेच्या वाढीव शुल्कांना टाळून ट्रम्प प्रशासनाशी संबंध मजबूत करण्याकरता लवकरात लवकर व्यापार करार करण्याच्या प्रयत्नात आहे.
दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी, व्हान्स त्यांच्या कुटुंबीयांसह आग्र्यातील ताजमहलला भेट देतील आणि जयपूरमध्ये एका लग्नाला देखील उपस्थित राहतील, अशी माहिती या प्रकरणाशी परिचित लोकांनी दिली.
व्हान्स यांची पत्नी उषा या दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश इथल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत.
व्हान्स यांनी ईस्टर संडेला, पोप फ्रान्सिस यांच्याशी रोममध्ये खाजगी बैठक घेतली होती. त्यानंतर सोमवारी त्यांचे नवी दिल्लीतील पालम विमानतळावर आगमन झाले.
व्यापार आणि संरक्षण चर्चेचा केंद्रबिंदू
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हान्स यांच्या बैठकीत, फेब्रुवारीमध्ये मोदींनी अमेरिका भेटीदरम्यान ठरवलेल्या द्विपक्षीय अजेंड्यावर पुनरावलोकन होण्याची शक्यता आहे. या अजेंड्यामध्ये दोन्ही देशांतील व्यापारामध्ये “समान न्याय” राखणे आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी वाढवणे यांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्या पदग्रहणानंतर भेट घेणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांपैकी मोदी हे एक होते.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, भारत सरकार अमेरिकेहून होणाऱ्या आयातींपैकी निम्म्याहून अधिक आयातींवरील कर (Tariff) कमी करण्यास तयार आहे. 2024 मध्ये या आयातींची एकूण किंमत 41.8 अब्ज डॉलर्स इतकी होती.
तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला “टॅरिफ गैरवापरकर्ता” आणि “टॅरिफ राजा” अशा दोन्ही उपाधींनी संबोधले आहे.
करारासाठी नवी दिल्लीचे प्रयत्न
“आम्हाला विश्वास आहे की या भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना मिळेल,” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.
‘अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. 2024 मध्ये, दोन्ही देशांमधील व्यापार $129 अब्ज डॉलरवर पोहोचला होता, ज्यामध्ये भारताच्या बाजूने $45.7 अब्ज डॉलरचा अधिशेष होता,’ अशी माहिती अमेरिकेच्या व्यापार विभागाच्या आकडेवारीनुसार समोर आली आहे.
ट्रम्प यांनी 9 एप्रिल रोजी, त्यांच्या मुख्य व्यापार भागीदारांसाठी (ज्यामध्ये भारतही आहे) टॅरिफ वाढीवरील 90 दिवसांची मुदतवाढ जाहीर केली. या कालावधीत भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार करार पूर्ण होण्याची आशा आहे.
व्हान्स यांचा भारत दौरा, ट्रम्प यांच्या यावर्षीच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ट्रम्प क्वाड गटाच्या शिखर परिषदेसाठी भारताला भेट देण्याची अपेक्षा आहे. Quad गटात भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.
भेटीचे महत्व अधिक
दिल्लीमधील, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन या थिंक टँकचे परराष्ट्र धोरण प्रमुख हर्ष पंत म्हणाले की, “व्हान्स यांचा भारत दौरा, सध्याच्या व्यापार चर्चांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे.”
“अमेरिका-चीन तणाव वाढत असल्यामुळे आणि व्हान्स हे अमेरिकन राजनैतिक धोरणात प्रमुख भूमिका बजावत असल्यामुळे, त्यांच्या या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे,” असेही ते म्हणाले.
‘व्हान्स यांच्यासोबत अमेरिकेच्या प्रशासनातील काही अधिकारी देखील आहेत. मात्र, या भेटीत कोणताही औपचारिक करार होण्याची शक्यता नाही,’ असे सूत्रांनी सांगितले.
भारत आणि अमेरिका यांच्यात यावर्षी संरक्षण भागीदारीसाठी एक रूपरेषा निश्चित होण्याची अपेक्षा आहे. तसेच भारताने जावेलिन अँटी-टँक क्षेपणास्त्रे आणि स्ट्रायकर इन्फंट्री कॉम्बॅट वाहनांसारख्या शस्त्रांची खरेदी आणि संयुक्त उत्पादन करण्याची योजना आखली आहे, अशी माहिती फेब्रुवारीत झालेल्या संयुक्त निवेदनात नमूद केली आहे.
‘या शस्त्रास्त्र खरेदीसंदर्भातील चर्चेला अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ, यांच्या पुढील काही महिन्यांमध्ये आयोजित भारत दौऱ्यादरम्यान आणखी पुढे नेले जाईल,’ असे सूत्रांनी सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)