ऑस्ट्रेलिया 13 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 या कालावधीत, ‘Talisman Sabre 2025‘ या आजवरच्या सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे आयोजन करणार आहे.
या सरावात 19 देशांतील 30 हजारांहून अधिक सैन्यदल सहभागी होणार असून, भारताचाही यात सहभाग असेल. या सरावादरम्यान, विविध लष्करी क्षेत्रांतील सहयोग व लढाऊ तयारीचे उच्च पातळीवर सादरीकरण केले जाईल.
या सरावाच्या इतिहासात प्रथमच, पापुआ न्यू गिनी देखील यजमानपद भूषवेल, जो देशाच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रादेशिक संरक्षण सहकार्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
‘Talisman Sabre’ सरावाची ही अकरावी आवृत्ती आहे. हा सराव, ऑस्ट्रेलियन संरक्षण दल (ADF) आणि युनायटेड स्टेट्स सैन्य यांच्यातील प्रमुख द्विपक्षीय प्रशिक्षण उपक्रम मानला जातो. ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, हा सराव आता अधिक व्यापक आणि गुंतागुंतीच्या स्वरूपात विकसित होत आहे, जो आघाडीतील भागीदारीतील समन्वय व संयुक्त क्षमतेचे सादरीकरण करतो.
यावर्षीचा सराव हा ऑस्ट्रेलियाचे Indo-Pacific भागीदारांशी वाढते सुरक्षा संबंधही अधोरेखित करतो. भारत, कॅनडा, फिजी, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, नेदरलँड्स, न्यूझीलंड, नॉर्वे, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड, टोन्गा आणि युनायटेड किंगडम येथील सैन्यदल अमेरिकन व ऑस्ट्रेलियन सैन्यासोबत या सरावात सहभागी होणार आहेत.
ब्रुनेई, मलेशिया आणि व्हिएतनाम निरीक्षक म्हणून सहभाग घेतील.
बहु-क्षेत्रीय लष्करी सराव
‘टॅलिस्मन सब्रे २०२५’ सरावामध्ये जमीन, हवाई, नौदल, सायबर आणि अवकाश क्षेत्रांमध्ये समाकलित ऑपरेशन्सची चाचणी घेण्यात येईल.
प्रमुख घटकांमध्ये जलस्थल व हवाई उतरणी, थेट गोळीबार प्रात्यक्षिके, आणि उच्च तीव्रतेच्या युद्ध परिस्थितीचे अनुकरण करणारे समन्वित सैनिकी हालचाली यांचा समावेश आहे.
“हा सराव अमेरिकेसोबतच्या आपल्या दृढ आघाडीचा पुरावा आहे आणि Indo-Pacific मधील भागीदारांसोबतचा आपल्या सहकार्याचा विस्तार दर्शवणारा आहे,” असे संयुक्त ऑपरेशन्सचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल जस्टिन जोन्स यांनी सांगितले.
“यातून हे सिद्घ होते की, आपण एकत्र समन्वय साधून मोठ्या प्रमाणात कार्य करू शकतो आणि प्रत्यक्ष लष्करी परिणाम साध्य करू शकतो,” असेही ते म्हणाले.
हा सराव ऑस्ट्रेलियातील विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये पार पडणार आहे — क्वीन्सलँड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, नॉर्दर्न टेरिटरी, न्यू साउथ वेल्स आणि ख्रिसमस आयलंड. यामध्ये संरक्षण आणि इतर प्रशिक्षण क्षेत्रांचा समावेश असलेली विस्तृत आखणी करण्यात आली आहे.
प्रदेशिक संबंध अधिक दृढ करणे
या सरावातील काही भाग प्रथमच पापुआ न्यू गिनीमध्ये आयोजित केला जाणार आहे, जो पॅसिफिक भागीदारांशी संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या व्यापक रणनीतीचा भाग आहे.
“हा पापुआ न्यू गिनी सोबतच्या आमच्या भागीदारीतील एक मोठा टप्पा आहे,” असे व्हाइस अॅडमिरल जोन्स यांनी सांगितले. “सरावाचा काही भाग तिथे पार पडणे हे आमच्या संरक्षण दलांमधील वाढत्या समन्वयाचे प्रतिबिंब आहे,” असेही ते म्हणाले.
नियोजन आणि एकत्रीकरणाचे लॉजिस्टिकल कौशल्य
सरावाचे संचालक ब्रिगेडियर डॅमियन हिल, यांनी ‘Talisman Sabre 2025’ सराव आयोजित करण्यामागील गुंतागुंतीचे स्वरूप अधोरेखित केले, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि उपकरणांची हालचाल अद्वितीय आहे.
“आम्ही सुरळीत, समन्वित आणि प्रभावी प्रशिक्षण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून नियोजन करत आहोत,” असे हिल म्हणाले.
“मी पारंपरिक भूमीधारक, जमीन मालक, राज्य यंत्रणा आणि स्थानिक समुदायांचे आभार मानतो, ज्यांच्या सहकार्यामुळे हा जागतिक स्तरावरील उपक्रम शक्य झाला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
जगभरातील वाढते तणाव आणि Indo-Pacific क्षेत्रातील वाढती धोरणात्मक स्पर्धा पाहता, ‘Talisman Sabre 2025’ हा सराव सहयोग, क्षमता आणि सामूहिक उद्दिष्टांचे सशक्त सादरीकरण असेल.
टीम भारतशक्ती