इशारा देणारे गोळीबार
इस्रायली लष्कराने म्हटले आहे की त्यांच्या सैन्याने “वादी गाझा परिसरात पुढे जाणाऱ्या आणि सैन्यासाठी धोका निर्माण करणाऱ्या संशयितांवर” इशारा देण्यासाठी गोळीबार केला.
त्यात असेही म्हटले आहे की अनेक जण जखमी झाल्याच्या वृत्तांची त्यांना जाणीव होती, परंतु स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली संख्या त्यांच्याकडे आलेल्या माहितीशी जुळणारी नाही.
“मदत वितरण स्थळापासून शेकडो मीटर अंतरावर, त्याच्या सुरुवातीच्या वेळेपूर्वी आणि सैन्यासाठी धोका निर्माण करणाऱ्या संशयितांवर इशारा देणारा गोळीबार करण्यात आला,” असे लष्कराने म्हटले आहे.
यापूर्वी हमासच्या अतिरेक्यांनी जाणूनबुजून मदत वितरणात व्यत्यय आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“ही घटना आमच्या वितरण केंद्राबाहेर कार्यवाही सुरू करण्याच्या काही तास आधी घडली,” असे अमेरिकेच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनने (GHF) एका निवेदनात म्हटले आहे, ज्यामध्ये इस्रायली सैन्याला काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.
GHF ने यापूर्वी म्हटले होते की मंगळवारी दक्षिण आणि मध्य गाझामधील तीन ठिकाणी कोणत्याही अनुचित घटनेशिवाय मदत वाटप करण्यात आले.
‘अपमानास्पद व्यवस्था’
GHF ने मे महिन्याच्या अखेरीस गाझामध्ये अन्न पॅकेजेसचे वितरण सुरू केले. मदत वितरणाच्या एका नवीन मॉडेलचे निरीक्षण करत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार हा गट निष्पक्ष किंवा तटस्थ नाही.
“दिवसेंदिवस, इस्रायल आणि खाजगी सुरक्षा कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वितरण केंद्रांवर मृतांची संख्या आणि अनेक जखमींची नोंद होत आहे,” असे संयुक्त राष्ट्र पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सीचे (UNRWA) प्रमुख फिलिप लाझारिनी यांनी एक्सवर लिहिले.
“ही अपमानास्पद व्यवस्था हजारो भुकेल्या आणि हताश लोकांना सर्वात असुरक्षित आणि खूप दूर राहणाऱ्यांना दहा मैल चालण्यास भाग पाडणारी आहे,” असे ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात लष्कराने पॅलेस्टिनींना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान GHF च्या ठिकाणांकडे जाणाऱ्या मार्गांवर जाऊ नये असा इशारा दिला होता, या रस्त्यांचे वर्णन बंद लष्करी क्षेत्र म्हणून करण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्रांची बाजू मांडण्यासाठी लाझारिनी सरसावले
GHF ने म्हटले आहे की त्यांच्या वितरण स्थळांवर कोणतीही अनुचित घटना घडली नाही, परंतु मदत मागणाऱ्या पॅलेस्टिनींसमोर असणारी अव्यवस्था आणि स्थळांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग अराजक आणि प्राणघातक हिंसाचाराने वेढलेले असल्याचे सांगितले आहे.
“मी पहाटे 2 वाजता तिथे अन्न मिळवण्याच्या आशेने गेलो होतो, तिथे जाताना मला लोक रिकाम्या हाताने परतताना दिसले, त्यांनी सांगितले की मदत पॅकेजेस पाच मिनिटांत संपली आहेत. हे वेडेपणाचे आहे आणि पुरेसे नाही,” असे दोन मुलांचे वडील 40 वर्षीय मोहम्मद अबू अम्र म्हणाले.
“मध्य भागातून आणि उत्तरेकडील भागातूनही डझनभर लोक येतात, त्यापैकी काही २० किमीपेक्षा (१२ मैल) जास्त अंतर चालत आले, परंतु निराशेने घरी परतले,” असे त्यांनी चॅट ॲपद्वारे रॉयटर्सला सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांनी गोळीबार ऐकला पण नेमके काय झाले ते पाहिले नाही.
लाझारिनी म्हणाले की अन्न मदतीच्या कामावर संयुक्त राष्ट्रांनी देखरेख करावी. “मदत वितरण मोठ्या प्रमाणात व्हायला हवे ते आणि सुरक्षित असले पाहिजे. गाझामध्ये, हे केवळ संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातूनच करता येते… आमच्याकडे कौशल्य, ज्ञान आणि समुदायाचा विश्वास आहे,” असे ते म्हणाले.
UNRWA चे हमासशी संबंध असल्याचा आरोप करत इस्रायलने वारंवार ते बरखास्त करण्याची मागणी केली आहे. त्याचे आरोप UNRWA ने नाकारले आहे.
20 हून अधिक मृत्युमुखी
स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की मध्य गाझा पट्टीतील देईर अल-बलाह येथील एका घरावर इस्रायली हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मंगळवारी मृतांची संख्या किमान 25 झाली.
इस्रायली लष्कराने सांगितले की त्यांनी उत्तर गाझा येथून इस्रायली प्रदेशांवर डागण्यात आलेला एक रॉकेट रोखले आहे, ज्यामुळे इस्रायलींनी त्यांच्या शस्त्रागारांचा नाश करूनही हमास आणि इतर दहशतवादी गट शस्त्रे डागण्यास सक्षम असल्याचे संकेत मिळाले.
2.3 दशलक्ष लोकांच्या एन्क्लेव्हमध्ये 11 आठवड्यांच्या नाकेबंदीनंतर, जिथे तज्ज्ञांनी दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे, 19 मे रोजी इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील मर्यादित मदतकार्य पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गाझामध्ये परवानगी असलेल्या मदतीचे वर्णन संयुक्त राष्ट्रांनी “समुद्रातील थेंब” असे केले आहे.
गाझा शहरातील कोस्टल रोडवरील नबुलसी चौकात हताश विस्थापित पॅलेस्टिनींनी तसेच चोरांनी संयुक्त राष्ट्रांच्या गोदामांसाठी पीठ घेऊन जाणारे किमान 40 ट्रक लुटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हल्ल्यात हमासच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांनी 251 जणांना ओलीस ठेवले तर बाराशेजणांना ठार मारले, त्यापैकी बहुतेक नागरिक होते. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात प्राणघातक दिवस होता.
गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या लष्करी मोहिमेत आतापर्यंत 54 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक नागरिक होते. याशिवाय किनारी भागातील बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)