बुधवारी रशियाने, युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्कीव्हमध्ये ड्रोन हल्ला केला. सलग नऊ मिनिटे सुरु असलेल्या या हल्ल्यात, किमान 2 लोकांचा मृत्यू झाला तर 5 लहान मुलांसह 38 जण जखमी झाले, अशी माहिती प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिली.
‘खार्कीव्ह शहराच्या सीमेजवळ असलेल्या, एका पाच मजली इमारतीतील 15 युनिट्समध्ये या हल्ल्यामुळे आगी लागल्या तसेच शहरात इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,’ असे खार्कीव्हचे महापौर इगोर टेरेखोव्ह यांनी सांगितले.
“इमारती, खाजगी घरे, खेळाची मैदाने, दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक यावर थेट हल्ले झाले, ज्यामुळे अनेक फ्लॅट्स जळून खाक झाले, छप्परे उद्ध्वस्त झाली, गाड्या जळाल्या, खिडक्यांच्या-घरांच्या काचा फुटल्या..” असे टेरेखोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर सांगितले.
रॉयटर्सच्या एका साक्षीदाराने सांगितले की, “आपत्कालीन बचावपथकांनी इमारतींत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले, त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि अग्निशामक दलांनी रात्रीच्या अंधारात आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.”
हल्ल्याला वारंवार बळी ठरणारे खार्कीव्ह
खार्कीव्ह प्रांताचे गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह यांनी सांगितले की, “जखमींपैकी 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यात एक दोन वर्षांची मुलगी आणि पंधरा वर्षांचा मुलगाही आहे.”
हल्ल्यांत शहरातील ट्रॉलीबस डेपो आणि अनेक निवासी इमारतींना लक्ष्य करण्यात आल्याचेही, त्यांनी सांगितले.
रशियाकडून या हल्ल्यावर तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. युक्रेनच्या ईशान्य भागातील हे खार्कीव्ह शहर, युद्धाच्या सुरुवातीस रशियन आक्रमणाला रोखण्यात यशस्वी झाले होते, परंतु त्यानंतर ते वारंवार हवाई हल्ल्यांचे लक्ष्य ठरत आहे.
प्रतिहल्ल्याची तयारी
या हल्ल्याआधी याच आठवड्यात, रशियाने युक्रेनवर दोन सर्वात मोठे हल्ले केले, जे कीवने रशियावर केलेल्या अलीकडील हल्ल्यांचे प्रत्युत्तर असल्याचा दावा मॉस्कोने केला.
दोन्ही बाजूंनी सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याचे नाकारले आहे. मात्र, फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेल्या या युद्धात, हजारो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यातील बहुसंख्य नागरिक युक्रेनियन आहेत.
“खार्कीव्ह म्हणजेच युक्रेन आणि त्यांना कुणी तोडू शकत नाही, आम्ही तग धरून आहोत. आम्ही एकमेकांना मदत करत आहोत आणि पुढेही एकमेकांसोबत राहू,” असे टेरेखोव्ह म्हणाले.
युरोपीय युनियनची निर्बंध कारवाई
मंगळवारी, युरोपियन कमिशनने रशियावर 18व्या फेरीतील निर्बंध लागू करण्याचे सुचवले. यामध्ये रशियातील उर्जा उत्पन्न, बँकिंग क्षेत्र आणि लष्करी उद्योगाला लक्ष्य करण्यात आले आहे.
या नवीन प्रस्तावात, नॉर्ड स्ट्रीम गॅस पाइपलाइन्ससह अशा बँकांशी व्यवहार करण्यास बंदी घालण्याचा विचार आहे.
युरोपियन देश या प्रस्तावावर या आठवड्यात चर्चा सुरू करतील.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)