नेपाळमध्ये 5 मार्च रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी, द काठमांडू पोस्टने केलेल्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की फेसबुकचा अल्गोरिथम लोकप्रिय सोशल मीडिया पेजवर राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाशी (RSP) संबंधित सामग्रीचे प्रमाण असंतुलितपणे वाढवत आहे.
विश्लेषणात सुमारे सहा दशलक्ष वापरकर्त्यांच्या एकत्रित फॉलोअर्ससह 24 फेसबुक पेजवरील 4 हजार 754 पोस्ट तपासल्या गेल्या. यामध्ये “रूटीन ऑफ नेपाळ बंदा” सारखे व्यापकपणे फॉलो केलेले प्लॅटफॉर्म तसेच “ट्रोल पोखरा” आणि “नेपाळगंज गॅलरी” सारखे स्थानिक समुदाय पेज समाविष्ट होते.
निष्कर्षांनुसार, या कालावधीत अर्ध्याहून अधिक राजकीय पोस्ट RSP वर केंद्रित होत्या, जे नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट (CPN-UML) सारख्या स्थापित पक्षांच्या कव्हरेजपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होते.
वृत्तात उद्धृत केलेल्या नेपाळमधील तज्ज्ञांनी या ट्रेंडचे वर्णन ऑनलाइन एक उदयोन्मुख “कथनात्मक युद्ध” (narrative war) म्हणून केले आहे, जिथे अल्गोरिथम-चालित दृश्यमानता मतदानाच्या दिवसापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतदारांना काय आढळते यावर प्रभाव पाडते. पारंपरिक पक्ष लहान संघ आणि लघु-स्वरूपातील व्हिडिओ सामग्रीद्वारे त्यांची डिजिटल उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे, अर्थात त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांच्या नेतृत्वाखालील असून पोहोच मात्र मर्यादित आहे.
संशोधकांनी असे नोंदवले की फेसबुकच्या अल्गोरिथमकडून तटस्थ किंवा माहितीपूर्ण सामग्रीपेक्षा राग, उत्साह किंवा सहानुभूती यासारख्या तीव्र भावनिक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या पोस्टला प्राधान्य देण्याच्या संदर्भात हे निरीक्षण केले आहे.
वृत्तात असेही नमूद केले आहे की सप्टेंबर 2025 मध्ये जेन झीच्या नेतृत्वाखालील निदर्शने एकत्रित करण्यात भूमिका बजावणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता निवडणुकीच्या काळात राजकीय एकत्रीकरणाचे केंद्रबिंदू आहेत. अनेक तरुण मतदारांसाठी, ऑनलाइन सामग्री राजकीय प्रदर्शनाचा एक प्राथमिक स्रोत बनली आहे, जी रॅली आणि पक्षाच्या जाहीरनाम्यांची जागा घेत आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या फेसबुक फाइल्स तपासणीत हायलाइट केल्याप्रमाणे, 2021 मध्ये व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी लीक केलेल्या अंतर्गत संशोधनात असे आढळून आले की “राग” या भावनेला उत्तेजन देणाऱ्या पोस्टना जास्त अल्गोरिथमिक दृश्यमानता मिळते, ज्यामुळे ध्रुवीकरण वाढते.
विश्लेषणात असे आढळून आले की RSP, त्याचे नेते बालेंद्र शाह आणि रबी लामिछाने आणि पक्षाच्या निळ्या घंटा चिन्हाचे समर्थन करणारी सामग्री दोन प्रमुख पारंपरिक पक्षांशी संबंधित सामग्रीपेक्षा जास्त वेळा दिसून आली. बहुतेक सामग्री धोरणात्मक मुद्द्यांऐवजी व्यक्तिमत्त्वे आणि भावनिक अपीलवर केंद्रित होती.
या निवडणुकीत गगन थापा आणि जेन झी कार्यकर्ते सुदान गुरुंग यांच्यासारख्या तरुण नेत्यांसह के. पी. ओली आणि माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्यासारख्या प्रस्थापित व्यक्तींसह नेपाळच्या सर्व राजकीय क्षेत्रातील उमेदवारांचा समावेश आहे.
अनुकृती



























