इराणी नेत्याच्या संभाव्य हत्येच्या कटाबाबत बोलण्यास पुतिन यांचा नकार

0

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, यांनी गुरुवारी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येच्या, इस्रायल आणि अमेरिका करत असलेल्या संभाव्य कटाबाबत कोणताही टिप्पणी करण्यास नकार दिला. ‘इराणमधील जनतेचे सहानुभूतिपूर्ण समर्थन आता तेहरानच्या नेतृत्वाच्या बाजूने वाढले आहे,’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे की, “इस्रायली सैन्याच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये सत्ताबदल होऊ शकतो.” तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, “वॉशिंग्टनला खामेनेई कुठे लपले आहेत हे माहीत आहे, पण सध्या तरी त्यांना ठार मारणार नाहीत.”

खामेनेई यांच्या संभाव्य हत्येबाबत विचारले असता, पुतिन म्हणाले की : “मी याबाबत ऐकून आहे पण या मुद्द्यावर चर्चा करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये.”

पुतिन यांनी पुढे सांगितले की, “आम्ही पाहतो आहोत की, इराणमध्ये सध्याच्या गुंतागुंतीच्या अंतर्गत राजकीय प्रक्रियांमध्ये, समाज देशाच्या राजकीय नेतृत्वाभोवती एकवटत आहे,” असे पुतीन यांनी, उत्तरेकडील रशियन शहर सेंट पीटर्सबर्गमध्ये वरिष्ठ मीडिया संपादकांशी बोलताना सांगितले.

पुतिन म्हणाले की, “सर्व पक्षांनी युद्ध संपवण्यासाठी अशा उपाययोजना शोधल्या पाहिजेत ज्या इराणच्या शांततेच्या अणुउर्जेच्या अधिकाराचे आणि इस्रायलच्या संपूर्ण सुरक्षिततेच्या हक्काचे संरक्षण करतील.”

हे विधान, ट्रम्प अजूनही जगाला संभ्रमात ठेवत असताना करण्यात आले आहे. अमेरिकेने इराणच्या अणुउपक्रम आणि क्षेपणास्त्र केंद्रांवर हल्ला करावा का, याबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय न घेतल्याने, इराणच्या राजधानीत सलग सहाव्या दिवशीही हवाई हल्ले होत आहेत, ज्यामुळे नागरिकांनी शहर सोडण्यास सुरुवात केली आहे.

पुतिन म्हणाले की, “त्यांनी ट्रम्प आणि नेतन्याहू दोघांशी संवाद साधला आहे आणि मॉस्कोने या संघर्षाच्या शांततेने तोडग्याबाबत आपली मते मांडली आहेत, ज्यात इराणला नागरी अणुऊर्जेचा वापर करण्याचा अधिकार कायम ठेवण्यात यावा.”

इराणची अणु केंद्रे

इराणमधील सत्ताबदलाबाबत विचारले असता, पुतिन म्हणाले की: “कोणताही कृती आरंभ करण्याआधी हा विचार करायला हवा, की तो निर्णय अंतिम हेतू साध्य करेल का.”

“इराणची अणुउर्जा केंद्रे जी गुप्त भूमिगत प्रकल्प आहेत, ती अजूनही सुरक्षित आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“माझ्या मते, सर्व संबंधित पक्षांनी एकत्र बसून शांततेचा मार्ग शोधावा आणि संवादाच्या माध्यमातून याचा तोडगा काढावा. माझ्या मते, एक समाधानकारक मार्ग निश्चितच सापडू शकतो,” असे पुतिन म्हणाले.

इराणला इस्रायली हल्ल्यांपासून संरक्षणासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे देणार का, या प्रश्नावर पुतिन म्हणाले की, जानेवारीमध्ये हस्ताक्षरित केलेल्या सामरिक भागीदारी करारात लष्करी सहकार्याचा समावेश नाही, आणि इराणकडून कोणतीही अधिकृत विनंती आलेली नाही.

मॉस्कोचा ‘इराणवर हल्ला न करण्याचा’ अमेरिकेला इशारा

रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह बुधवारी म्हणाले की, “मॉस्कोने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले आहे की इराणवर हल्ला करू नये. अशा कृतीमुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील स्थिरता कोलमडून पडेल.”

रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही सांगितले की, “इराणच्या अणुउपक्रम केंद्रांवरील इस्रायली हल्ल्यांमुळे आण्विक आपत्तीचा धोका निर्माण होतो.”

पुतिन यांनी असेही सांगितले की, “इस्रायलने मॉस्कोला खात्री दिली आहे की इराणच्या बुसहर अणुऊर्जा प्रकल्पात अतिरिक्त दोन रिअ‍ॅक्टर्स बांधणाऱ्या रशियन तज्ज्ञांना हल्ल्यांमध्ये इजा होणार नाही.”

पुतिन म्हणाले की, रशियाचे इराणशी “अतिशय चांगले संबंध” आहेत आणि रशिया इराणच्या अणुऊर्जेच्या नागरी वापराच्या हिताचे रक्षण करू शकतो.

रशियाने इराणकडून समृद्ध युरेनियम घ्यायची आणि नागरी ऊर्जेसाठी इंधन पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.

“शांततेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी, इराणच्या अणुऊर्जेच्या क्षेत्रातील हितसंबंधांचे रक्षण शक्य आहे आणि त्याचवेळी इस्रायलच्या सुरक्षिततेविषयीच्या चिंतांना देखील उत्तर देता येऊ शकते. आम्ही आमचे प्रस्ताव अमेरिकन, इस्रायली आणि इराणी भागीदारांना सादर केले आहेत,” असे पुतिन यांनी स्पष्ट केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleआता आव्हान बांगलादेशच्या दिशेने होऊ शकणाऱ्या TB2 ड्रोन हल्ल्यांचे
Next articleभारताचा AMCA प्रकल्प खाजगी क्षेत्रासाठी खुला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here