भारताने नुकताच, 26 राफेल-मरीन (Rafale-M) फायटर जेट्ससाठीचा ₹64,000 कोटींचा ऐतिहासिक करार केला असून, भारत आता पुढील पिढीची लढाऊ विमाने – अॅडव्हान्स्ड मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) च्या, इंजिन निवडीच्या दिशेने जलदगतीने वाटचाल करणार असल्याची शक्यता आहे.
फ्रान्सची Safran कंपनी, अमेरिकेची General Electric (GE) कंपनी आणि ब्रिटनची Rolls Royce कंपनी, हे जगभरातील तीन प्रमुख ओरिजिनल इक्विपमेंट उत्पादक (OEMs) – भारताला पाचव्या पिढीच्या लढाऊ विमान प्रकल्पासाठी इंजिन पुरवण्याकरिता किंवा सह-उत्पादनाकरिता आपापसांत स्पर्धा करत आहेत.
भारत आणि फ्रान्स यांच्यात, AMCA साठी 110KN क्षमतेच्या इंजिनचा संयुक्त सह-विकास करण्याबाबत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या जुलै 2023 मधील पॅरिस भेटीत या सह-उत्पादनाची घोषणा झाली होती. DRDO च्या Aeronautical Development Agency (ADA), Gas Turbine Research Establishment (GTRE) आणि Safran यांनी अद्याप तांत्रिक तपशील व इतर बाबी अंतिम केलेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे, Rolls Royce देखील स्वतंत्र मार्गावर सक्रिय आहे. भारत-UK ‘2030 रोडमॅप’ चा भाग म्हणून, Rolls Royce ने भारताला संपूर्ण बौद्धिक संपदा (IP) अधिकारांसह इंजिन सहनिर्मितीचे मॉडेल सुचवले आहे. अलीकडेच संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी Rolls Royce च्या सुविधांना भेट दिली, आणि या दरम्यान या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. यामुळे लंडनच्या राजकीय पाठिंब्याचे संकेत मिळतात, विशेषतः लढाऊ इंजिन तंत्रज्ञानाच्या जलद परवाना प्रक्रियेबाबत. या चर्चांमध्ये नौदलासाठी MT30 आणि MT7 मरीन गॅस टर्बाइन्सबाबतही चर्चा झाली, जी नौदल सहकार्याची व्याप्ती वाढवत असल्याचे दाखवते.
दरम्यान, याच महिन्यात एक उच्चस्तरीय भारतीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसला गेले होते. Safran बरोबर इंजिन सहकार्य हे चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. ही चर्चा भारत-फ्रान्स डिफेन्स इंडस्ट्री रोडमॅप अंतर्गत होत असून, अत्याधुनिक एरोनॉटिकल तंत्रज्ञानातील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या करारांशी संलग्न आहे.
Safran चे इंजिन आधीपासूनच भारतीय लष्करी प्लॅटफॉर्म्सवर वापरले जात असून, जर AMCA साठी यांची निवड झाली, तर हे भारताच्या एअरोस्पेस क्षेत्राला महत्त्वपूर्ण कलाटणी देऊ शकते. विशेष म्हणजे Safran ने भारताला डिझाइन, विकास, प्रमाणन आणि उत्पादन यांमध्ये संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT) देण्याची तयारी दर्शवली आहे, जी स्वदेशी क्षमतांच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरू शकते.
या घडामोडींचा मागोवा घेतल्यास, 2023 मध्ये भारत-फ्रान्सने पुढील पिढीच्या लढाऊ विमान इंजिनचा सह-विकास आणि HAL च्या IMRH प्रकल्पांतर्गत Heavy-Lift Helicopter Engine वर सहकार्य करण्याचा निर्णय घेतला होता.
दुसरीकडे, GE ही LCA Tejas MK IA साठी F404 इंजिन पुरवते. मात्र, दोन वर्षांहून अधिक काळाची उशीर आणि F414 इंजिन पुरवठ्यासाठीचा अपूर्ण करार यामुळे GE ला एक अविश्वसनीय आणि अनिच्छुक पुरवठादार मानले जात आहे. हे Tejas MK II च्या प्रकल्पासाठी धोका निर्माण करू शकते.
याशिवाय, Hindustan Aeronautics Ltd (HAL) सोबत, एक खासगी भारतीय संरक्षण कंपनी निवडण्याचा निर्णयही लवकरच घेतला जाणार आहे, जेणेकरून भारतातच जेट इंजिनचे विकासकार्य करता येईल.
भारतीय संरक्षण धोरणात पारंपरिक भागीदारांपासून दूर जात, भारत नवीन इंजिन विकास धोरण तयार करत आहे. येत्या काही महिन्यांत होणारे महत्वाचे निर्णय, भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान आणि नौदल जहाजनिर्मितीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकतात.
– रवि शंकर