भारताची IOS SAGAR मॉरिशसमध्ये दाखल, सागरी संबंधांचे मजबूतीकरण

0

भारतीय नौदलाचे जहाज ‘INS Sunayna‘, ज्याचे नाव एका विशेष मोहिमेसाठी IOS SAGAR असे ठेवण्यात आले आहे, ते रविवारी मॉरिशसच्या पोर्ट लुईस बंदरात दाखल झाले. हे जहाज मॉरिशसच्या नॅशनल कोस्ट गार्ड (NCG) सोबत, संयुक्त विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) देखरेख मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण करून आले आहे. या भेटीमुळे भारताच्या प्रादेशिक सागरी सुरक्षेसाठी वचनबद्धतेचा आणि मैत्रीपूर्ण देशांसोबत क्षमतावाढीच्या भागीदारीचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.

5 एप्रिल रोजी, कारवारहून निघालेल्या सुनयना जहाजावर सध्या 9 हिंद महासागर प्रदेशातल्या (IOR) देशांमधील, एकूण 44 नौदल कर्मचारी तैनात आहेत, ज्यामध्ये मॉरिशसचे दोन अधिकारी आणि सहा खलाशींचाही सहभागी आहेत. एकत्रित कार्यक्षमतेत वाढ, परस्पर शिक्षणाचा प्रसार आणि सामूहिक सागरी प्रगती साधण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांचे प्रतीक म्हणून, जहाजावर बहुराष्ट्रीय अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

पोर्ट लुईस येथे, युद्धनौकेचे आणि त्यावरील कर्मचाऱ्यांचे अत्यंत उत्साहाने स्वागत करण्यात आले, जे भारत व मॉरिशस यांच्यातील दीर्घकालीन संबंधांचे बळकटीकरण दर्शवते. दोन दिवसांच्या या बंदर भेटीदरम्यान, IOS SAGAR चे कमांडिंग ऑफिसर- नॅशनल कोस्ट गार्डचे कमांडंट, पोलीस कमिशनर आणि भारताचे उच्चायुक्त यांची सदिच्छा भेट घेणार आहेत, असे भारतीय नौदलाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या भेटीदरम्यान, अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये मॅरिटाईम एअर स्क्वॉड्रन, स्पेशल मोबाईल फोर्स स्क्वॉड्रन, आणि पोलीस हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनच्या भेटींचा समावेश आहे. पोलीस मुख्यालयात पोलीस कमिशनर बहुराष्ट्रीय दलाशी संवाद साधतील. 27 एप्रिल रोजी जहाज सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवले जाणार आहे. तसेच यावेळी ट्रेकिंग, संयुक्त योगा सत्र आणि मैत्रीपूर्ण खेळांचे आयोजन केले गेले आहे, जे सहकार्य भावना वृद्धिंगत करतील.

मॉरिशस भेटीनंतर, सुनयना जहाज NCG मॉरिशससोबतच्या, संयुक्त EEZ देखरेखीच्या दुसऱ्या टप्प्यावर निघणार आहे, ज्यानंतर ते सेशेल्सच्या पोर्ट व्हिक्टोरिया येथे पोहोचेल.

INS सुनयना, भारतीय नौदलाच्या सरयू-श्रेणीतील ऑफशोर गस्त नौका (NOPV) असून – चाचेगिरी विरोधी मोहिमा, सागरी देखरेख, आपत्ती निवारण आणि मानवतावादी सहाय्य (HADR) मिशन्ससाठी सज्ज आहे. हे जहाज प्रगत तोफखाना प्रणाली, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर उपकरणे आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणानी सुसज्ज असून, त्यावर एक हेलिकॉप्टरही तेनात असते, असे नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे.

ही मोहिम, भारताच्या हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) सुरक्षा आणि स्थिरतेसाठीच्या दृढ वचनबद्धतेचे आणि सहकार्य, क्षमतावाढ, आणि प्रादेशिक संवाद यांच्यावरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articlePakistan: मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला दिली अणवस्त्र हल्ल्याची धमकी
Next articleIran: अब्बास बंदरातील स्फोटात 40 जणांचा मृत्यू, 1,200 हून अधिक जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here