इराणमधील सरकारविरोधी आंदोलनांचा जोर देशभरात वाढत असताना, इराणच्या धार्मिक व्यवस्थेसमोर वैधतेचे मोठे संकट उभे राहिले आहे, मात्र ही आंदोलने महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर 2022-23 मध्ये उसळलेल्या असंतोषाइतकी मोठी नाहीत.
तेहरानच्या ग्रँड बाजारातील दुकानदार, जे रियाल चलनाच्या तीव्र घसरणीमुळे संतप्त झाले होते, त्यांना या आंदोलनांची सुरूवात केली. मात्र आता ही आंदोलने देशभरात पसरली असून, यात इतर अनेकजण जोडले गेले आहेत, यामध्ये अमिनी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला आणि मुलींऐवजी, तरुण पुरुषांचा सहभाग अधिक आहे.
अमेरिकेतील ‘ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सी’ (HRANA) ने दिलेल्या अहवालानुसार, या अस्थिरतेदरम्यान किमान 34 आंदोलक आणि सुरक्षा दलाचे 4 कर्मचारी मारले गेले आहेत, तर 2,200 जणांना अटक करण्यात आली आहे. विश्लेषकांच्या मते, हे शिया ‘स्टेटस को’ म्हणजे स्थितिशील व्यवस्थेविषयीच्या सखोल असंतोषाचे द्योतक आहे.
सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनांना हाताळण्यासाठी दुहेरी दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित आंदोलने वैध असल्याचे सांगत, आंदोलकांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे, तर काही हिंसक आंदोलनांमध्ये रस्त्यावर झालेल्या संघर्षांदरम्यान अश्रुधुराचा वापर केला आहे.
इस्लामिक क्रांतीनंतर सुमारे पाच दशकांनंतर, इराणचे धार्मिक राज्यकर्ते त्यांच्या प्राधान्यक्रमांमध्ये आणि तरुण समाजाच्या अपेक्षांमधील दरी भरून काढण्यासाठी झगडताना दिसत आहेत.
आंदोलक रस्त्यावर उतरले
सत्तास्थापनेच्या सुधारक गटातील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इस्लामिक प्रजासत्ताकाचे मूलभूत वैचारिक स्तंभ, उदा. अनिवार्य पोशाख नियमांपासून ते परराष्ट्र धोरणात्मक निर्णयांपर्यंत, 30 वर्षांखालील तरूणांना (जे लोकसंख्येच्या जवळपास निम्मे आहेत) पटत नाहीत.
‘हिजाब’, जो अमिनी आंदोलनादरम्यान संघर्षाचा केंद्रबिंदू होता, आता त्याची अंमलबजावणी निवडक पद्धतीने केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या आंदोलनांमधील, अनेक आंदोलक या प्रदेशातील अतिरेक्यांना तेहरानकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. “गझा नाही, लेबनॉन नाही, माझा जीव इराणसाठी,” अशा घोषणा दिल्या जात आहेत, ज्या त्तास्थापनेच्या प्राधान्यक्रमांविषयी नाराजी व्यक्त करत आहेत.
गझामधील हमासपासून ते लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुथी आणि इराकमधील मिलिशिया यांसारख्या इराणच्या छुप्या शक्तींवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे, तसेच इराणचा जवळचा मित्र असलेला सीरियन हुकूमशहा बशर अल-असाद याची सत्ता उलथवून लावल्यामुळे तेहरानचा प्रादेशिक दबदबा कमकुवत झाला आहे.
इराणच्या सर्वोच्च नेत्यासमोर कठीण पेच
आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीतील सर्वात अनिश्चित टप्प्यांपैकी एकाचा सामना करत असलेले, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांनी प्रत्युत्तर देताना “इराण शत्रूला शरण जाणार नाही,” अशी शपथ घेतली आहे.
माजी इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 86 वर्षीय नेत्यासाठी यातून बाहेर पडण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही, कारण त्यांचे दशकानुदशकांचे धोरण, ज्यामध्ये छुप्या शक्ती निर्माण करणे, निर्बंध टाळणे आणि अणू व क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढे नेणे यांचा समावेश आहे, ते आता कोलमडताना दिसत आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या आंदोलनांची प्रशंसा केली असून, “हा एक निर्णायक क्षण आहे, ज्यामध्ये इराणी लोक त्यांचे भविष्य स्वतःच्या हातात घेत आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.
इराणमध्ये, परकीय लष्करी हस्तक्षेप तातडीने होईल का किंवा तो शक्य आहे का, याबाबत मतभेद आहेत; आणि सरकारचे कट्टर टीकाकार देखील, हा हस्तक्षेप योग्य आहे की नाही यावर शंका व्यक्त करत आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)



























