अहवालानुसार, इस्रायली मंत्रिमंडळाची गाझावरील व्यापक कारवाईला मंजुरी

0

इस्रायली प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा पट्टीतील लष्करी मोहिमेचा विस्तार करण्याच्या योजनांना पाठिंबा दिला आहे. ही हालचाल सूचित करते की, संघर्ष थांबवण्याचे आणि हमासकडून ओलिसांना सुखरुप सोडवण्याचे प्रयत्न सध्या निष्फळ ठरत आहेत.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झमीर, यांनी याच आठवड्यात दिलेल्या वक्तव्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, ज्यामध्ये इस्रायल गाझामधील कारवाई वाढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले गेले होते.

मार्चमध्ये पूर्वीचा युद्धविराम करार मोडल्यापासून, इस्रायली सैन्य गाझातील विस्तृत बफर झोन तयार करत आहे, २.३ दशलक्ष लोकसंख्येला एन्क्लेव्हच्या मध्यभागी आणि किनाऱ्यालगतच्या एका अरुंद झोनमध्ये दाबत आहे आणि मदत ट्रकचा प्रवेश बंद करत आहे.

“जोपर्यंत हमास आमच्या ओलिसांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही आमची लष्करी कारवाई लक्षणीयरीत्या वाढवू,” असे इस्रायलच्या मुख्य वृत्तसंस्थांपैकी एक असलेल्या ynet ने एका अनामिक इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे.

नेतान्याहूच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने या वृत्तांवर भाष्य करण्यास नकार दिला, ज्यामध्ये म्हटले आहे की रविवारी संपूर्ण मंत्रिमंडळ या निर्णयाला मान्यता देईल.

गुरुवारी, नेतान्याहू म्हणाले की, “इस्रायल त्यांच्या बंधकांना परत करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यापैकी 24 जण जिवंत असल्याचे मानले जाते, परंतु गाझामधील त्यांचे अंतिम ध्येय हमासला पराभूत करणे हेच राहिले आहे.”

मध्यस्थांचे प्रयत्न व्यर्थ

इजिप्त व कतारच्या मध्यस्थांनी, शस्त्रसंधी पुन्हा लागू करण्याचे प्रयत्न केले असले तरी, इस्रायल व हमास दोघेही त्यांच्या मुख्य मागण्यांपासून माघार घेण्यास तयार नाहीत. दोन्ही बाजूंनी अपयशासाठी एकमेकांना दोष दिला आहे.

इस्रायलला अजूनही गाझामध्ये असलेल्या 59 बंदकांची सुटका करवायची आणि त्यांनी हमासला निःशस्त्रीकरण व गाझाच्या भविष्यातील प्रशासनातून वगळण्याची अट ठेवली आहे, जी हमासने नाकारली आहे.

2007 पासून गाझाच्या ताब्यात असलेल्या या गटाने, लढाईचा कायमस्वरुपी अंत आणि इस्रायली सैन्याची माघार ही कराराची अट असल्याचे सांगितले आहे, ज्यामध्ये ओलिसांची सुटका होईल.

यापूर्वी, नेतान्याहू यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करून, इजिप्शियन मध्यस्थांनी मांडलेला युद्धबंदीचा प्रस्ताव नाकारल्याचे आणि लढाई थांबवण्याच्या कराराच्या मार्गात हमास अडथळा आणत असल्याचे म्हटले आहे.

इस्रायली कमांडर्सनी म्हटले आहे की, “सैन्य अल्पावधीत गाझामध्ये आपल्या कारवाया वाढवण्यास तयार आहे.”

“आम्ही आमच्याकडे असलेली सर्व शक्ती वापरू, आम्ही कारवाईचा वेग आणि तीव्रता वाढवू आणि गरज पडल्यास आम्ही ते लवकरच सुरु करू,” असे गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात झमीर यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी, गाझाच्या विविध भागात इस्रायली हल्ले सुरूच राहिले, ज्यामध्ये किमान 25 पॅलेस्टिनी ठार झाल्याचे गाझा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

7 ऑक्टोबर 2023 रोजी, हमासने केलेल्या विनाशकारी हल्ल्यामुळे इस्रायलची ही मोहीम सुरू झाली, ज्यामध्ये दक्षिण इस्रायलमध्ये 1,200 लोक मारले गेले आणि 251 जणांना ओलिस ठेवले गेले. आतापर्यंत 50,000 हून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा बळी गेला आहे आणि गाझा उद्ध्वस्त झाले आहे. दरम्यान, बचाव गटांनी इशारा दिला आहे की, ‘इस्रायली नाकाबंदीमुळे मानवीय आपत्तीचा धोका निर्माण होऊ शकतो.’

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)


+ posts
Previous articleभारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेत क्रांती घडवून आणण्यासाठी UAS सज्ज
Next articleIsraeli Strike: सीरियाच्या राष्ट्रपती भवनाजवळ इस्रायलचा हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here