Thursday, July 23, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिका हस्तक्षेप करणार नाही – व्हॅन्स यांची स्पष्टोक्ती

भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिका हस्तक्षेप करणार नाही – व्हॅन्स यांची स्पष्टोक्ती

0
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या शत्रुत्वाच्या या संघर्षात अमेरिका थेट सहभागी होणार नाही, “याच्याशी अमेरिकेचे काहीही देणेघेणे नाही” (“none of America’s business.”) असे म्हणत दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे त्यांनी आवाहन केले.

 

व्हान्स यांनी तणाव कमी करण्याचे आवाहन केले

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्हान्स म्हणाले, “आम्ही दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन करू शकतो, परंतु ज्या युद्धाचा आमच्याशी काहीही संबंध नाही आणि जे आमच्या नियंत्रणाबाहेर आहे अशा युद्धात उतरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. भारत किंवा पाकिस्तानला माघार घेण्यास सांगणे ही अमेरिकेची भूमिका नाही.”

त्यांनी पुढे म्हटले की अमेरिका राजनैतिक उपायांचा पाठपुरावा करत राहील. याखेरीज परिस्थिती मोठ्या प्रादेशिक संघर्षात, विशेषतः अण्वस्त्रांशी संबंधित संघर्षात, रूपांतरित होणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

“आमची अपेक्षा अशी आहे की हे युद्ध व्यापक युद्धाकडे वाटचाल करणार नाही आणि निश्चितच अण्वस्त्र युद्धातही रूपांतरीत होणार नाही,” असे ते म्हणाले.

वाढता तणाव

दरम्यान, गुरुवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्याने तणावात तीव्र वाढ झाली. याशिवाय नागरी आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून तोफांचा जोरदार मारा करण्यात आला.

 

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत. भारताने होणाऱ्या हल्ल्यांना निष्प्रभ केले आणि पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AWACS विमान पाडले.

ट्रम्प यांनी व्यक्त केली चिंता

यापूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या संपूर्ण प्रकाराबाबत दुःख व्यक्त करत या संघर्षावरही चिंता व्यक्त केली.

 

“हे भयानक आहे. मी दोन्ही देशांना चांगले ओळखतो आणि मला त्यांना थांबवायचे आहे. जर मी कोणत्याही प्रकारे मदत करू शकलो तर मी करेन,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

भारत-पाकिस्तान शत्रूत्व

ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान शत्रूत्वाच्या दीर्घकालीन स्वरूपाचा पुनरुच्चार करत म्हटले की, “ते दशकांपासून लढत आहेत – शतकांपासूनही.”

 

दोन्ही देशांसाठी त्यांचा काही विशिष्ट संदेश आहे का असे विचारले असता, ट्रम्प म्हणाले, “मला आशा आहे की ते खूप लवकर संपेल.”

टीम स्ट्रॅटन्यूज

 

+ posts
Previous articleड्रोन युद्धाचा विस्तार: पाकच्या प्रमुख हवाई संरक्षण केंद्रांवर भारताचा हल्ला
Next article30 दिवसांचा युद्धविराम प्रगतीच्या दिशेने एक पाऊल: Zelenskyy