तैवानमधील सरकारी वकिलांनी शुक्रवारी पहिल्यांदाच, एका चिनी जहाजाच्या कॅप्टनवर आरोप केला, की ‘त्यांनी फेब्रुवारी महिन्यात जाणूनबूजून तैवानच्या समुद्राखालील केबल्सचे नुकसान केले.’ समुद्रातील केबल्सच्या वाढत्या बिघाडांमुळे तैवानच्या अधिकाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
वकिलांच्या म्हणण्यानुसार, सदर कॅप्टन हा टोगोमध्ये नोंदणीकृत असलेल्या, ‘Chinese-crewed Hong Tai 58’ या जहाजाची धुरा सांभाळत होता. या जहाजाने नैऋत्य तैवानच्या आसपास समुद्राखालील केबलजवळ नांगर टाकल्याचा संशयावरुन, तैवानच्या अधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेतले.
दक्षिण तैवानच्या ताईनान शहरातील सरकारी वकिलांच्या कार्यालयाने सांगितले की, “याप्रकरणी त्यांनी जहाजाच्या चिनी कॅप्टनवर, ज्याचे नाव वांग असल्याची ओळख पटली आहे, त्याच्यावर केबलचे नुकसान केल्याबद्दल आरोप लावला आहे.”
“परंतु, वांगने तो निर्दोष असल्याचे म्हटले आहे आणि त्याने जहाजाच्या मालकाची माहिती देण्यासही नकार दिला. त्याचे वर्तन खराब होते,” असे सरकारी वकिलांनी निवेदनात म्हटले आहे.
‘त्याचवेळी ताब्यात घेतलेल्या इतर सात चिनी नागरिकांवर आरोप लावले जाणार नाहीत आणि त्यांना चीनला नेले जाईल,’ असे प्रॉसिक्युटर्सनी सांगितले. तसेच समुद्री केबल्सचे नुकसान केल्याबद्दल हा तैवानचा पहिला खटला असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, रॉयटर्सला जहाजाचा मालक कोण आहे हे निश्चित करता आले नाही, तसेच कॅप्टनचा कायदेशीर प्रतिनिधी कोण आहे हे देखील त्वरित शोधता आले नाही.
चीनच्या तैवान व्यवहार कार्यालयाने, यासंदर्भात त्वरित प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. चीनने यापूर्वी, या प्रकरणात संभाव्य चिनी सहभागाचा “फेरफार” केल्याचा तैवानवर आरोप केला आहे आणि प्रत्यक्ष तथ्य समोर येण्याआधीच ते संशय व्यक्त करत आहेत.
संबंधित केबलचे नुकसान, हे तैवानभोवतीच्या चीनच्या लष्करी हालचालींमध्ये भर घालणारे आहे. यात युद्धसरावांचाही समावेश आहे, ज्यापैकी शेवटचा युद्धसराव बीजिंगने गेल्या आठवड्यात आयोजित केला होता.
शुक्रवारी, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ‘त्यांनी बेटाजवळ 21 चीनी लष्करी विमानांची हालचाल नोंदवली असून, ती विमाने चीनी युद्धनौकांसोबत “संयुक्त लढाई तयारी सराव” करत होती. तैपेई अशा घटनांची नियमित माहिती देत असते.’
यावर्षी तैवानने, समुद्राखालील केबल बिघाडाच्या पाच घटना नोंदवल्या आहेत, तर 2024 आणि 2023 मध्ये प्रत्येकी तीन अशाच घटना घडल्याचे, डिजिटल मंत्रालयाने सांगितले.
तैवानच्या तटरक्षक दलाने अलीकडच्या महिन्यांत, आपल्या समुद्राखालील केबल्सच्या सुरक्षेसाठी प्रयत्न वाढवले आहेत. त्यात सुमारे 100 चिनी संबंधित जहाजांची “ब्लॅकलिस्ट” तयार करून, त्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. ही जहाजे मालकापेक्षा वेगळ्या देशात नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात आले.
जानेवारी महिन्यात तैवानने, आपल्या उत्तर किनाऱ्याजवळील अंडर सी केबल खराब होण्यामध्ये एक चिनी जहाज कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, जहाजाच्या मालकाने या आरोपांना फेटाळले होते.
चीन तैवानला आपलाच प्रांत मानतो, तर तैवान सरकारन बीजिंगच्या सार्वभौमत्वाच्या दाव्यांना कायमच नकारत आली आहे. तैवानने वेळोवेळी चीनकडून “ग्रे झोन” पद्धतीने केलेल्या हालचालींचा निषेध केला आहे, ज्या थेट संघर्ष न करता दबाव टाकण्याचे माध्यम असतात, जसे की बलुन ओव्हरफ्लाईट्स पाठवणे किंवा वाळू उपसणे (sand dredging) इत्यादी.
यावर्षी, आणखी एका चीन-संबंधित जहाजाकडून दुसऱ्या अंडर सी केबलच्या नुकसानीचा संशय व्यक्त केल्यावर तैपेईमध्ये सतर्कता वाढली आगे. यामुळे नौदल आणि इतर एजन्सींनी समुद्राखालील संवादसंपर्क यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकचे प्रयत्न सुरू केले आहेत, कारण या केबल्स तैवानच्या जागतिक संपर्कासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
तैवानने असेही सांगितले की, ‘युरेनियन युद्धानंतर बाल्टिक समुद्रात झालेल्या अंडर सी केबल्सच्या नुकसानीप्रमाणेच त्यांच्या अनुभवामध्ये साम्य आढळते. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि त्यामुळे तैवानच्या जागतिक संवादयंत्रणेस मोठा धोका निर्माण होत आहे.’
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)