रशियन क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात कीवमध्ये 9 ठार, 70 हून अधिक जखमी

0

रशियन सैन्याने रात्रीच्या वेळी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांचा हल्ला केल्याने तिथे आगी लागल्या, इमारती कोसळल्या आणि रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले. गुरुवारी युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनुसार, या हल्ल्यात नऊ जण ठार झाले असून 70 हून अधिक जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये सहा मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे.

“विध्वंस झाला आहे. ढिगाऱ्याखालील लोकांचा शोध सुरू आहे,” असे राज्य आपत्कालीन सेवेने टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर  लिहिले आहे.

सर्वात गंभीर घटना शहरातील मध्यभागाच्या पश्चिमेस स्विआटोशिन्स्की जिल्ह्यात उद्ध्वस्त झालेल्या एका रहिवासी इमारतीमध्ये घडली आहे.

टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये बचाव पथके फ्लडलाइट्ससह काम करताना, ढिगाऱ्याखालून सावधपणे पुढे जाताना आणि इमारतींच्या दर्शनी भागांवर पसरलेल्या शिड्यांवर चढताना दिसत आहेत. या इमारतीमधील रहिवासी सुरक्षित आहेत की नाही हे बघण्यासाठी पोलीस घराघरांमध्ये फोन करत होते.

लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन दलाने रात्रभर काम केले. शोधमोहीम अद्यापही सुरू असल्याने मृतांची संख्या वाढू शकते असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

बचाव पथके कार्यरत

राजधानीतील 13 ठिकाणी गिर्यारोहण तज्ञ आणि स्निफर कुत्र्यांसह बचाव पथके कार्यरत असल्याचे आपत्कालीन सेवेने सांगितले. चाळीस ठिकाणी आगी लागल्या होत्या.

“ढिगाऱ्याखाली मोबाईल फोन वाजताना ऐकू येतात. त्यांना सर्व रहिवाशांचा शोध लागेपर्यंत हे तपासकार्य सुरू राहील,” असे त्यांनी म्हटले आहे.

गॅरेज, प्रशासकीय इमारतींनाही आग लागली होती आणि धातूचे तुकडे वितळून खाली पडत असल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.

राजधानीत सहा तास हवाई हल्ल्याचा इशारा लागू करण्यात होता.

युक्रेनचे महापौर इहोर तेरेखोव्ह यांनी टेलिग्रामवर लिहिले की, ईशान्येकडील युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किववर रात्रभरात रशियन क्षेपणास्त्रांचा दोनदा मारा झाला, ज्यात दोन लोक जखमी झाले असून या हल्ल्यांत अनेक तावदानांचे नुकसान झाले.

कीवच्या पश्चिमेस असलेल्या झायटोमिर प्रदेशात देखील मोठे नुकसान झाले आहे. आपत्कालीन सेवांनी सांगितले की रशियन सैन्याने लावलेल्या आगी विझविण्याचे काम करण्यात गुंतलेल्या  बचाव पथकांवर पुन्हा हल्ला झाला, ज्यात एक कामगार जखमी झाला.

युक्रेनियन राज्य रेल्वे उक्रझालिझ्नित्सियाने सांगितले की रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर देखील हल्ला झाला असून दोन रेल्वे कर्मचारी जखमी झाले आहेत.

कीव आणि खार्किव प्रदेशात हल्ल्यांमुळे रुळ आणि प्रशासकीय तसेच तांत्रिक इमारतींचे नुकसान झाले आहे. मात्र गाड्यांची नेहमीप्रमाणेच येजा सुरू होती.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articlePahalgam: काश्मीरमध्ये ALH ‘Dhruv’ ची सेवा पुन्हा सुरु करण्याचे आदेश
Next article‘Milipol India 2025’ मध्ये भारत-फ्रान्स सुरक्षा संबंधांचे मजबूतीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here