“संपूर्ण सुरक्षा चाचणीच्या पुनरावलोकनानंतर, ‘ALH Dhruv’ हेलिकॉप्टर्सना, भारतीय लष्कर (Indian Army) आणि भारतीय हवाई दलाच्या (IAF) मधील ऑपरेशन्ससाठी परवानगी देण्यात आली आहे,” असे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने बुधवारी जाहीर केले. ही परवानगी, दोष तपासणी समिती (Defect Investigation Committee) च्या शिफारशींनंतर देण्यात आली असून, सशस्त्र दलांशी समन्वय साधून टप्प्याटप्प्याने आणि निश्चित वेळेत, ‘अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (ALH) ध्रुव‘ची ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
“11 एप्रिल 2025 रोजी देण्यात आलेल्या स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने, आता हे कळविण्यात येते की, ALH ध्रुवच्या लष्करी आणि हवाई दलातील प्रकारांना, दोष तपासणी समितीच्या शिफारशींच्या आधारे ऑपरेशन्ससाठी परवानगी देण्यात आली आहे. ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्यासाठी निश्चित वेळेचा आराखडा वापरकर्त्यांशी सल्लामसलत करून तयार करण्यात आला आहे,” असे HAL च्या निवेदनात म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला उड्डाणाची परवानगी
संरक्षण मंत्रालयाने, भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीरमध्ये – विशेषतः श्रीनगर व आजूबाजूच्या परिसरात ALH हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी दिली आहे. ही परवाना पाहलगाममध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, वाढवण्यात आलेल्या दहशतविरोधी ऑपरेशन्सच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. “जमिनीवर कार्यरत अधिकाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार, श्रीनगर आणि आजूबाजूच्या भागांत ALH ध्रुव हेलिकॉप्टर चालवण्यासाठी भारतीय लष्कराला परवानगी देण्यात आली आहे,” असे संरक्षण मंत्रालयाने अधिकृतरित्या सांगितले.
5 जानेवारी रोजी, पोरबंदरजवळ झालेल्या ALH Dhruv च्या अपघातानंतर हा मोठा निर्णय घेतला गेला आहे. त्या अपघातानंतर, सुमारे 330 हून अधिक ALH ध्रुव हेलिकॉप्टर्सचा ताफा वापराकरिता स्थगित करण्यात आला होता. या दुर्घटनेमुळे लष्करी कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम झाला होता आणि ध्रुव हेलिकॉप्टरच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते.
HAL च्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या विश्लेषणानंतर असे स्पष्ट झाले की, अपघाताच्या क्षणी हेलिकॉप्टरने वैमानिकांच्या आदेशांना प्रतिसाद दिला नव्हता. यामागचे मूळ कारण इंटिग्रेटेड डायनॅमिक सिस्टीम (IDS) मधील स्वॅश प्लेट असेंब्ली मध्ये झालेली तडा असल्याचे आढळून आले, ज्यामुळे HAL ने संपूर्ण ताफा जमिनीवर उतरवण्याची शिफारस केली होती.
या दुर्घटनेनंतर आणि संपूर्ण ताफा जमिनीवर उतरवल्यानंतर HAL वर गुणवत्ता नियंत्रण आणि उत्तरदायित्वाच्या अभावाबाबत व्यापक टीका झाली. माजी प्रशिक्षणार्थी वैमानिक, निवृत्त लष्करी अधिकारी आणि संरक्षण विश्लेषक यांनी HAL च्या प्लॅटफॉर्मच्या विश्वासार्हतेबाबत दीर्घ काळापासून असलेली चिंता व्यक्त केली.
10 एप्रिल रोजी, HAL ने याविषयी एक ठाम उत्तर जाहीर करत, ALH कार्यक्रमाचे समर्थन केले आणि स्वदेशी बनावटीच्या 5.5 टन वजनाच्या, बहुपर्यायी हेलिकॉप्टरवरील विश्वास पुन्ह:प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हे विधान माध्यमांकडून होणाऱ्या तीव्र चौकशीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते, जिथे दोष तपासणी समितीचा अंतिम अहवाल अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नव्हता. त्यावेळी अहवालांमध्ये असे सूचित करण्यात आले होते की, तपास अजून पूर्ण न झाल्यामुळे ध्रुव हेलिकॉप्टर्सचे ग्राउंडिंग अजून किमान तीन महिने वाढू शकते.
– टीम भारतशक्ती