होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यासाठी योजल्या जाणाऱ्या योग्य प्रयत्नांमध्ये सामील होण्यास आपण तयार असल्याचे प्रमुख युरोपीय राष्ट्रे, जपान आणि कॅनडा यांनी गुरुवारी एक संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे. ते ऊर्जा बाजारपेठा स्थिर करण्यासाठी देखील पावले उचलणार आहेत.
या निवेदनात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, जपान आणि कॅनडा यांचा समावेश आहे.
संपूर्ण निवेदन: आम्ही आखातातील निःशस्त्र व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या अलीकडील हल्ल्यांचा, तेल आणि वायू प्रतिष्ठापनांसह नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा आणि इराणी सैन्याद्वारे होर्मुझची सामुद्रधुनी प्रत्यक्षात बंद केल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
वाढत्या संघर्षाबद्दल आम्ही तीव्र चिंता व्यक्त करतो. आम्ही इराणला आवाहन करतो की त्यांनी आपल्या धमक्या, सुरुंग पेरणी, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले, आणि व्यापारी जहाजांसाठी सामुद्रधुनी रोखण्याचे इतर प्रयत्न तात्काळ थांबवावेत आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव 2817 चे पालन करावे.
नौवहन स्वातंत्र्य हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे एक मूलभूत तत्त्व आहे, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्र सागरी कायदा अधिवेशनाचाही समावेश आहे.
इराणच्या कृतींचे परिणाम जगभरातील लोकांना, विशेषतः सर्वात असुरक्षित प्रदेशातील लोकांना जास्त जाणवतील.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव 2817 नुसार, आम्ही यावर जोर देतो की आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीतील असा हस्तक्षेप आणि जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीतील व्यत्यय हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका आहे. या संदर्भात, आम्ही तेल आणि वायू प्रतिष्ठापनांसह नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांवर तात्काळ आणि व्यापक बंदी घालण्याची मागणी करतो.
सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यासाठी योग्य प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची आमची तयारी आम्ही व्यक्त करतो. पूर्वतयारीच्या नियोजनात सहभागी असलेल्या राष्ट्रांच्या वचनबद्धतेचे आम्ही स्वागत करतो.
सामरिक पेट्रोलियम साठ्यांच्या समन्वित विमोचनास (release) अधिकृत करण्याच्या ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थे’च्या (International Energy Agency) निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. ऊर्जा बाजारपेठा स्थिर करण्यासाठी आम्ही इतर पावले उचलू; ज्यामध्ये, उत्पादन वाढवण्यासाठी काही उत्पादक राष्ट्रांसोबत काम करण्याचाही समावेश असेल.
सर्वाधिक प्रभावित झालेल्या राष्ट्रांना साहाय्य पुरवण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू; ज्यामध्ये संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या (IFIs) माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीचाही समावेश असेल.
सागरी सुरक्षा आणि नौवहनाचे स्वातंत्र्य यांमुळे सर्वच राष्ट्रांचा लाभ होतो. आम्ही सर्व राष्ट्रांना आवाहन करतो की, त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करावा आणि आंतरराष्ट्रीय समृद्धी व सुरक्षेच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करावे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)



























