
गेल्या महिन्यात जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एअर फ्रान्स, जर्मनीची लुफ्थांसा आणि अन्य जागतिक विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र (Pakistani Airspace) टाळण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी, विमान कंपन्यांनी आणि फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सनी याची पुष्टी केली.
भारत सरकारने, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले असून, पाकिस्ताननेही भारतीय मालकीच्या किंवा भारतीय ऑपरेटरद्वारे चालविल्या जाणाऱ्या विमानांना, आपल्या हवाई क्षेत्रात बंदी घातली आहे. याशिवाय पाकिस्तानने भारताशी व्यापार थांबवला असून, भारतीयांसाठी खास व्हिसा योजनाही रद्द केली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Lufthansa चा Pakistani Airspace टाळण्याचा निर्णय
लुफ्थांसा ग्रुपच्या विमान कंपन्यांनी, “पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील,” असे त्यांनी रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात सांगितले. या निर्णयामुळे एशियाकडे जाणाऱ्या काही मार्गांवरील उड्डाण वेळ वाढणार आहे.
उदाहरणार्थ, लुफ्थांसा फ्लाइट LH760 (फ्रँकफर्ट ते दिल्ली) च्या रविवारीच्या उड्डाणात, सामान्यपेक्षा जवळपास एक तास अधिक वेळ लागला, कारण त्याने पाकिस्तान हवाई क्षेत्राऐवजी लांबचा मार्ग निवडला.
ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल एअर लाइन्स आणि एमिरेट्सच्या काही फ्लाइट्सनी अरबी समुद्रावरून उड्डाण करून पाकिस्तान हद्द टाळत दिल्लीकडे वळ घेतला, असे ट्रॅकिंग डेटावरून दिसून आले.
ब्रिटिश एअरवेज आणि एमिरेट्सने या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एअर फ्रान्सने पाकिस्तान ओव्हरफ्लाइट निलंबित केले
एअर फ्रान्स कंपनीने म्हटले आहे की, “भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानवरील ओव्हरफ्लाइट निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
त्यांनी दिल्ली, बँकॉक आणि हो ची मिन्ह यांसारख्या गंतव्यांसाठीच्या उड्डाण वेळापत्रकांमध्ये बदल केला असून, प्रवास वेळ वाढण्याची शक्यता आहे.
लुफ्थांसा ग्रुपच्या मालकीच्या स्विस एअरलाइनने सांगितले की, “कनेक्टिंग फ्लाइट्स चुकलेल्या प्रवाशांचे पुन्हा आरक्षण मोफत केले जाईल.”
याच वेळी, येमेनच्या हूथी बंडखोरांनी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाजवळ क्षेपणास्त्र डागल्यामुळे, युरोपीय आणि अमेरिकन विमान कंपन्यांनीही काही दिवसांसाठी फ्लाइट्स रद्द केल्या आहेत.
पाकिस्तानला ओव्हरफ्लाइट महसूलाचा धोका
जागतिक विमान कंपन्यांच्या बदलांमुळे, विमान कंपन्यांचे इंधनखर्च आणि प्रवास वेळ वाढेल, पण पाकिस्तानलाही मोठा आर्थिक फटका बसू शकतो, कारण प्रत्येक ओव्हरफ्लाइटवर ते विमान प्रकार आणि अंतरानुसार शेकडो डॉलर्स वसूल करतात.
पाकिस्तानचे रिझर्व्ह फक्त 10.2 अब्ज डॉलर्स इतके आहेत, जे फक्त दोन महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसे आहेत.
“पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावर अवलंबून असलेल्या परदेशी विमान कंपन्यांवर त्याचा परिणाम होईलच, पण पाकिस्तानलाही ओव्हरफ्लाइट महसूल गमवावा लागू शकतो,” असे स्वतंत्र विमान वाहतूक विश्लेषक ब्रेंडन सोबी यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)